अशाच प्रकारे बोलणे झाल्यावर अखेरीस त्यांनी मला विचारले, की -
'शासकीयदृष्ट्या द्वैभाषिक मुंबई राज्य चांगले चालले आहे, पण राजकीय दृष्ट्या तसे ते चाललेले नाही, हाच तुझा निष्कर्ष आहे ना? हे तुझ्या मनातले आहे, हे खरे काय?'
मी होकार दिला व माझे हे स्पष्ट मत असल्याचेही म्हणालो.
त्यावर -
'तू तुझे मन बोलून दाखविलेस, हे चांगले झाले', असा अभिप्राय देऊन आमच्या संभाषणाबद्दल कोणापाशीही न बोलण्याचा सल्ला त्यांनी मला दिला.
हे संभाषण १९५८च्या मध्यास झाले. नेहरूंच्या सल्ल्याप्रमाणे मी या संभाषणाची गंधवार्ता कोणालाच लागू दिली नाही. नेहरू या सा-या प्रश्नाचा फेरविचार करण्याच्या मन:स्थितीत आहेत, याचा अंदाज मला या वेळी लागला.
नेहरूंनी हा विषय त्यांच्या काही निकटवर्तीयांपाशी नंतर काढला असेल. राजकीय परिस्थितीचे मी केलेले विश्लेषण त्यांनी पं. पंत यांना सांगितल्याचेही मला नंतर कळले.
नेहरू ५८ साली नोव्हेंबर-डिसेंबरच्या सुमारास मुंबईत आले होते. त्यांचे उपनगरांत कार्यक्रम होते. या कार्यक्रमांनंतर दुपारच्या भोजनासाठी राजभवनावर येण्याऐवजी आरे वसाहतीत खास अतिथिगृह आहे आणि तेथे जेवणाची व्यवस्था होऊ शकते, असे मी म्हणालो, तेव्हा नेहरूंनी ते लगेच मान्य केले. भोजनानंतर आपण एखादी डुलकी घेऊ, असेही ते म्हणाले. पण कोणत्याही कारणाने असो, त्यांना झोप आली नाही व त्यांनी बोलावणे धाडले. त्यांची भाची नयनतारा सहगल बरोबर होती. तिला हे माहीत नव्हते. म्हणून या वेळी मी नेहरूंची झोपमोड कशासाठी करतो? असे तिने विचारले. नेहरूंनीच बोलावणे धाडल्याचे मी तिला सांगितले.
मी खोलीत गेलो तेव्हा पंडितजी आडवे झाले होते. त्यांनी बसावयाला सांगितले व लगेच हैदराबादच्या संभाषणाची त्यांनी आठवण दिली आणि विचारले, की द्वैभाषिक तोडून दोन स्वतंत्र राज्ये केली, तर काँग्रेसला बहुमत मिळेल काय? महाराष्ट्रात ५७ साली काँग्रेसला कमी जागा मिळाल्या होत्या, त्याचाही त्यांनी उल्लेख केला. मी त्यांना सांगितले, की मी याचा विचार केलेला नाही आणि मी याबद्दल कोणाशी बोललो नाही; पण तुम्हाला याचे उत्तर पुढील बैठकीत देऊ शकेन. त्यांनी ते मान्य केले. काँग्रेसच्या बहुमताविषयी त्यांना खात्री हवी होती.