• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

ऋणानुबंध (39)

असे ते छंदाचे आणि काही तरी करावे, हे वातावरण बदलत्या परिस्थितीने सुटले आणि पूर्णपणाने राजकीय वातावरणात प्रवेश केला असला, तरी छंद सुटल्याचे दु:ख नाही. राजकीय वातावरणात राहूनही माझा स्वत:शी संघर्ष नाही. अशी मन:शांती दुर्मिळ असते, म्हणतात. सध्याच्या माझ्या मनाच्या अवस्थेला 'शांती' म्हणता येईल का, हे व्याख्येच्या रूपाने कदाचित सिद्ध होणारे नसेल; पण माझा स्वत:शी संघर्ष मात्र नाही. माणसाचे जीवन बहुरूप्याचे असते आणि प्रत्येक रूपात काही तरी वेगळा आनंद असतो, हेच खरे.

कवी बनण्याचा छंद जसा मनाला लागला, तसा कथा-कादंबरी लिहिण्याचाही छंद लागला. काही कथा मी लिहिल्या आणि त्या वेळी 'लोकक्रांती'त एक - दोन प्रसिद्धही झाल्या. एक कादंबरीही मनामध्ये योजिली पण छंदाचा सांधा बदलून गाडी दुस-या मार्गावर धावू लागली तेव्हा ती कादंबरी कुठे तरी मागल्या स्टेशनवरच राहिली असावी. कुणी सांगावे, क्लोक-रूममध्ये ती कुठे गवसली, तरी हातात येईलही कधी तरी !

एक मात्र खरे, की तरुणपणातील ते छंद करण्यास आणि वाढविण्यास राजकारणाच्या रगाड्यात वेळ मिळत नसला, तरी त्या सर्वांचा मनावरचा परिणाम कायम आहे. माणसाचे छंद, त्याच्या स्वभावाचे निदर्शक असतात, असे म्हणतात. माझ्या आजवरच्या छंदांचा माझ्या स्वभावावर परिणाम झाला आहे, की माझे ते आणि आजचे छंद हे स्वभावत:च आहेत, हे सांगणे कठीण आहे; परंतु माझा असा एक स्वतंत्र स्वभाव बनला आहे. तो स्वभाव आहे मिळते घेऊन पुढे जाण्याचा आणि पुढे नेण्याचा ! मुद्दाम दु:ख द्यावे, कोणाचा अवमान करावा, हे माझ्या स्वभावात नाही. कोणी अवमान करण्याचा प्रयत्न केला, तरी त्यासाठी उगाच शत्रुत्व करावे, असे वाटत नाही. पण काही माणसे तसे करतात, याचे दु:ख होते. मला कोणावर सूड घेता येत नाही, हा माझा दोष आहे, असेही कोणी म्हणतात; परंतु मैत्रीचा भाव जिथे असेल, तिथेच माझे मन रमते. मैत्रीचा अभाव असेल, तर दु:ख होते. मैत्रीच्या वातावरणातच काम करायला मला आनंद वाटतो, आणि काम हे महत्त्वाचे असल्याने मैत्री राखण्यावर माझा नेहमीच कटाक्ष असतो. सत्तेकरिता, स्वार्थाकरिता वापर करून घेणारेही मित्र असतात. त्याचाही मला पुष्कळ अनुभव आहे; पण मी ते सारे विसरतो, कसे विसरायचे, ते मनाला शिकवतो, म्हणण्यापेक्षा येणारे अनुभवच शिकवतात. कटुता न ठेवणे, आणि कटुता नसणारे वातावरण वाढविणे हा माझा स्वभावधर्म आहे. तसा तो बनला आहे.

या स्वभावधर्मामुळेच राजकारणापासून अलिप्त होऊन विचार करण्याचा प्रयत्न करणे मला शक्य होते. माझ्यावरील टीकेकडेही मी त्यामुळेच अलिप्तपणे पाहू शकतो. एखाद्या समस्येसंबंधात विचार केला, विनिमय केला आणि मग निर्णय केला, तर मग त्या वैयक्तिक निर्णयामुळे पश्चात्ताप करण्याची, दु:ख करण्याची मला सवय नाही. विचारावरील माझी श्रद्धा पूर्वीपासूनची आहे. विचाराबद्दल मला अभिमानही वाटतो; पण या अभिमानाला अहंकाराचे स्वरूप देण्यापासून कटाक्षाने दूर राहिले पाहिजे.