• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

ऋणानुबंध (40)

एखाद्याच्या विचाराविरुद्ध खंडन करण्याची वृत्ती माझ्या ठिकाणी आहे; पण त्याच्याबद्दल विद्वेष नाही. विचार मांडणे अपरिहार्यच असते. त्यातून प्रसंगी वादातही ओढला जाण्याची शक्यता असते. विचारासंबंधी अभिनिवेश असणे वेगळे आणि अहंकारी बनणे वेगळे. विचार चांगला असेल, तर त्याचा अभिमान वाटण्यातही काही गैर नसते. विचाराची दिशा बरोबर असेल, तर त्याचा परिणाम प्रगतीमध्येच होतो. या अभिमानाचा संबंध अखेर प्रगतीशी जाऊन मिळतो आणि म्हणूनच तो वाजवीही ठरतो.

लोक मला मोठे म्हणतात किंवा लोकमताच्या आरशात मी जेव्हा मोठेपणाचे प्रतिबिंब पाहतो, त्या वेळी मी अधिकच अंतर्मुख बनतो. तो माझ्या स्वभावधर्माचाही परिणाम असू शकेल. परंतु मोठेपणाच्या व्याख्येत वैयक्तिक मोठेपण याला काही अर्थ नाही, असे मला नेहमी वाटते. समाजाची काही मूल्ये असतात. अधिकारावर असलेल्याला सामान्य माणसे 'मोठे' म्हणतात. पण हे खरे मूल्य नव्हे. खरेपणा त्यात कमी असतो. त्याला भलावण म्हणता येईल. मला वाटते, खरा मोठेपणा हा विचारांचा, प्रगत परिणामांचा असतो. मनुष्याचे मोठेपण हे त्याने केलेल्या आणि नंतर शिल्लक उरलेल्या परिणामाच्या मोठेपणाशीच प्रामुख्याने निगडित आहे. मी स्वत: कधी मोठेपणाचा विचार करीत नाही. मोठेपणाचा शोध माणसे नंतर घेतात आणि तसाच तो घेतला पाहिजे. नंतर, म्हणजे मनुष्य नजरेसमोरून दूर झाल्यानंतर ! तेव्हा त्याचे जे मूल्यमापन होईल, ते खरे मोठेपण. समाजासाठी, समाजाचे जीवन बदलण्यासाठी केलेल्या कामात त्याला यश किती आले, त्याने कोणते ध्येय स्वीकारले होते आणि त्यात त्याला किती यश मिळाले, त्याने किती मार्गदर्शक विचार मागे ठेवले, या मोठेपणाच्या कसोटया असल्या पाहिजेत.

आजकाल नेतृत्व याचा अर्थ फारच मर्यादितपणे केला जातो. राजकारणात एखादे पद प्राप्त झाले, की त्याला नेता म्हणायचे, ही सवय जितक्या लवकर दूर होईल, तितकी त्याची गरज आहे. राजकारणातला प्रमुख, म्हणजे समाजाचाही नेता, ही चुकीची व्याख्या आहे. नेतृत्व हा शब्द व्यापक अर्थाचा आहे. वेगवेगळ्या शास्त्रांत प्रगती घडत आहे. वेगळे आदर्श निर्माण होत आहेत. त्यांचा काही सामूहिक परिणाम घडत आहे. हा सामूहिक परिणाम घडविणारे त्या त्या क्षेत्रातील जे कोणी आदर्श असतील, ते खरे नेते. नव्या आदर्शाचा संपूर्ण समाजजीवनावर परिणाम करण्यासाठी, त्याचा वापर करणारी जी माणसे असतात, त्यांच्या ठिकाणीही नेतृत्व असतेच. नेतृत्वात शहरी आणि ग्रामीण असा भेदभाव करण्याचेही कारण नाही. ग्रामीण भागातील एखादा प्रगतिशील शेतकरीही शेतीचा नवा आदर्श निर्माण करून शेती क्षेत्रातील नेतृत्व खेचू शकतो. शहरातील एखादा समाजकारणी विचारवंत, समाजसुधारणेचे अद्ययावत मार्गदर्शन करून नेतृत्व मिळवू शकतो. विचारांची, माणसांच्या मनाची मशागत करणे आणि त्याचे आदर्श परिणाम घडवून आणणे या नेतृत्वाच्या कसोट्या मानल्या, तर टिळक, गांधी, नेहरू यांनी त्या अर्थाने खरे नेतृत्व केले. त्यांच्या नेतृत्वाला काही एक वेगळा अर्थ आहे. टिळक, गांधी यांच्या हाती सत्ता कधीच नव्हती. त्या दृष्टीने सरकारचे नेतृत्व म्हणजे समाजाचे नेतृत्व, असे मानणे अपुरे आणि अशास्त्रीय आहे. याचा अर्थ राज्याचे नेतृत्व करणारे समाजाचे नेतृत्व करू शकत नाहीत, असा नव्हे. तेसुद्धा समाजाचे नेतृत्व करू शकतात. मात्र ते लोकांच्या मान्यतेतून !