• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

ऋणानुबंध (31)

कुलसुम दादी

परवा माझ्या आजोळचे - देवराष्ट्राचे कार्यकर्ते मला भेटले, तेव्हा सांगू लागले, की गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात मामांचे तिथले ते जुने घर एका मुसळधार पावसात पडून गेले. अक्षरश: खाली बसले, म्हणे.
मातीच्या जुन्या घराचे दुसरे काय होणार?
'काही तरी केले पाहिजे.' कुणी तरी सांगू लागले.
मी म्हटले,
'हां. पाहू.'
- आणि दुस-या भेटणा-यांकडे वळलो.

मी लागोपाठ इतरांना भेटत होतो. त्यांच्याशी बोलत होतो. त्यांचे ऐकत होतो. पण कान त्यांच्याकडे होते आणि मन होते देवराष्ट्राच्या त्या जुन्या घराच्या अवतीभोवती.

एका छोट्या गावच्या सामान्य वस्तीतील एक मातीचे घर. घराच्या म्हणून अशा काय आठवणी असावयाच्या? आठवणी आहेत घरातल्या आणि शेजारच्या माणसांच्या. तिथे अधूनमधून काढलेल्या लहानपणातील दिवसांच्या. सकाळच्या कोवळ्या उन्हात सर्वच सुंदर दिसते. लहानपणीच्या आठवणींचेही तसेच असेल कदाचित. सर्व बरेवाईट अनुभव आपापले कंगोरे टाकून देऊन हस-या मुखाने समोर येऊ लागतात.

माझ्या आठवणींतील या घराच्या चतु:सीमा आजही मला स्पष्टपणे सांगता येतात. घराच्या पूर्वेस सणगरांचे घर, पश्चिमेस रामोश्याचे घर, उत्तरेस घराच्या कुसवाच्या भिंतीपलीकडे निवडुंगाच्या फण्यांची गर्दी व पलीकडे पाटील मंडळींची उत्तम शेतीची जमीन. दक्षिणेकडून शाळेतून गावात जाणारा रस्ता व रस्त्याच्या पलीकडे एक जुना, मोठा, ओसाड वाडा. याला वाडा एवढ्याचसाठी म्हणावयाचे, की पूर्वेकडे तोंड करून एक मोठा दरवाजा व दरवाजाच्या दोन्ही बाजूंस दोन शोभेचे कठडे याला होते, म्हणून. रस्त्यापासून दरवाजापर्यंत पोहोचणा-या घाटासारख्या दिसणा-या बंदिस्त पाय-या व चारी बाजूंनी उभ्या असलेल्या उंच भिंती. आत सर्व पडझड झालेली. तिथे काहीच नव्हते, म्हटले, तरी चालेल. याला पूर्वी कोणी मालक असेल कदाचित. पण या वेळी गावातले काही महत्त्वाचे लोक, सुगीनंतर आपल्या कडब्याच्या गंजी रचण्यासाठी त्याचा उपयोग करीत असत.

या वाड्याच्या आमच्या घरासमोरील उंच भिंतीला चिकटून एका खोलीचे असेच छोटे झोपडीवजा घर होते. त्यात राहत होते एक मुसलमान कुटुंब. कुटुंबाची प्रमुख होती कुलसुमदादी. माझ्या आजीच्याच वयाची होती ती. कुलसुमदादीला एक मुलगा होता. त्याचे नाव अबदुल्ला. तिला एक मुलगी पण होती. ती देवाघरी गेल्यावर तिची दोन मुले तिने आपल्याकडेच ठेवली होती. अबदुल्ला मोठा संथ माणूस. कष्टाला भारी होता. पण बोलायचे म्हटले, म्हणजे त्याला संकट वाटे. आपण दहा शब्द बोलावेत, तेव्हा तो कदाचित एक शब्द बोले. कुलसुमदादीचा एक नातू माझ्या वयाचा. गुलाब त्याचे नाव. आम्ही सर्व गुलबू म्हणायचो आणि त्याला ते फार शोभे. निमगोरा, फुगीर गालांचा, मोठ्या डोळ्यांचा, वाटोळा-चंद्राच्या चेह-याचा. त्याचा मोठा भाऊ त्याच्यापेक्षा चार वर्षांनी मोठा असावा. त्याचे नाव युसुफ - यासीन असेच काहीसे होते. मला आता नक्की आठवत नाही. पण होता मोठा चलता पुरजा.