आयुष्यातली बरीच वर्षे दु:खाशी सोबत करूनही दिलाचा दिलदारपणा राहणे हे देणे देवाचे असावे लागते. माझ्या आईचे जीवन मला नेहमीच दीपज्योतीसारखे वाटले. दिवा जळत असतो. त्याच्या प्रकाशात माणसे वावरत असतात. पण आपण लोकांच्या उपयोगी पडत आहोत, हे त्या ज्योतीला, त्या प्रकाशाला माहिती नसते. ते दीपज्योतीचेच जळणे आईचे होते.
माझ्या विवाहाच्या पहिल्या वर्षी - बेचाळिसात सून घरी आली, म्हणून तिला केवढा आनंद झाला. पण जूनमध्ये विवाह होऊन ऑगस्टमध्ये मी तुरुंगात गेलो. त्या वर्षीच्या पहिल्याच संक्रांतीच्या दिवशी पोलीस जेव्हा तिच्या सुनेला पकडायला आले, त्या दिवशी तिला फार दु:ख झाले. सुनेला माहेरची आठवण होऊ देणार नाही, ही तिची प्रतिज्ञा होती ना !
कराडहून मी तिला मुंबईस आणले, त्या वेळी ती बरीच वृद्ध झाली होती. मुंबईत आपला मुलगा काही कर्तबगारी करतो आहे, हे तिचे शेवटी शेवटीचे सुख होते. परंतु त्यातही, आपले पहिले दोन मुलगे असते, तर ... या दु:खाची मनात कातर होती.
बावन्न सालात मंत्री होऊन मी नमस्कारास गेलो, त्या वेळी 'आत्ता तुझे दोन भाऊ असते तर...' असेच शब्द तिच्या पाणावलेल्या नेत्रांवाटे बाहेर पडले.
बासष्ट सालात मी मुंबई सोडून दिल्लीला निघालो, त्या वेळीही तिला अतिशय दु:ख झाले. दिल्लीसाठी मला आशीर्वाद देताना तिच्या शब्दांत कारुण्य होते. शेवटच्या क्षणी मी जवळ असावे, अशी तिची तळमळ होती. शेवटच्या क्षणी मी जवळ असणार नाही, अशी जणू तिला धास्ती असावी... आणि पासष्ट साली घडलेही तसेच !
आई गेली, त्या रात्री मी दिल्लीत होतो.
पासष्टच्या लढाईच्या ऐन धुमश्चक्रीत मी असताना ती गेली.
तिच्या अस्थी घेऊन पुढे मी अलाहाबादला गेलो. गंगेत उभा राहिल्यावर माझ्या हातातून जेव्हा तिच्या अस्थी सुटल्या, तेव्हा भूतकाळाचा एकमेव धागा झट्दिशी तुटला, असे मला वाटले. घरातला मी मोठा झालो, या कल्पनेने काहीसा गोंधळलो. कारण जगातले मोठेपण चालते, पण घरातले लहानपण फार मोठे असते, हा माझा अर्धशतकाचा अनुभव होता.
लहानपणी, आठ-नऊ वर्षांचा असताना आईने मला पहिल्यांदा पंढरपूरला नेले होते. बैलगाडीने आम्ही गेलो होतो. मला आठवते... तुळशीचा हार हातात घेऊन विठ्ठलाच्या पायांवर मस्तक ठेवण्यासाठी आम्ही चाललो होतो, त्या वाटेवर 'विठाई माऊली'च्या नामघोषाने राऊळ दुमदुमून गेले होते. कुणीतरी मागून ओरडले, 'विठाईआक्का, यशवंताचे बोट धर.'
बोट धरूनच मी विठ्ठलाच्या पायांवर मस्तक ठेवले होते.
आता मी जेव्हा पंढरीला जाण्याचा विचार करतो, त्या वेळी सारखे जाणवते...
बोट मोकळे आहे... आणि मग मला गलबलल्यासारखे होते.