• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

ऋणानुबंध (136)

साहित्य कोणत्याही रंगाचे असले तरी चालेल, पण आजूबाजूच्या परिस्थितीचा डोळसपणे अभ्यास करून समाजात सर्व थरांत निर्माण झालेल्या अस्वस्थतेची जाणीव असणारे समाजचिंतन त्यात असले पाहिजे. आचार्य विनोबा भावे यांनी एकदा म्हटले होते, की लोकशाही हे प्रज्ञेचे राज्य असते. ही प्रज्ञा समाजाभिमुख असली पाहिजे. तरच ती समाजाचे परिवर्तन घडवून आणील, त्याला मार्गदर्शन करीत राहील. बुद्धीची कुवत वाढविणे, मने व्यापक करणे, जगातील नव्या प्रवाहांची समीक्षा करणे, स्वत:च्या संस्कृतीचा व परंपरेचा बुद्धिनिष्ठ अभ्यास करून नव्या परिस्थितीला सुसंगत अशा मूलभूत परिवर्तनासाठी जनमानसाला तयार करणे ही पुढच्या पिढीतील चिंतनशील साहित्याची उद्दिष्टे असू शकतात. गेल्या शतकात मार्क्सने इतिहासाकडे पाहण्याची नवी दृष्टी सांगून एक प्रचंड विचारप्रवाह सुरू केला. या शतकातील टॉयनबीसारख्या इतिहासपंडिताने मानवी संस्कृतीचा अभ्यास करून सर्जनशील चिंतनाचा आणखी एक नमुना आपल्यापुढे ठेवला. आज समाजशास्त्र, अर्थशास्त्र, मानववंशशास्त्र अशा अनेकविध ज्ञानशाखांचा उपयोग करून आपल्या इतिहासाचे, आपल्या समाजाचे पुनरध्ययन करणे शक्य आहे. मराठीमध्ये अशा अभ्यासाची गरज आहे.

सामाजिक प्रबोधनाच्या दृष्टीने ललित साहित्याची सामाजिकताही अत्यंत महत्त्वाची आहे. कलाबाह्य निकष लावून हेतुवादी साहित्य श्रेष्ठ ठरवावे, अशा मताचा मी नाही. पण समाजाच्या प्रबोधनासाठी, त्याचा भावपिंड घडविण्यासाठी ललित साहित्याचा निश्चित उपयोग होतो. समाजक्रांतीविषयी अनुकूल मनोभूमी तयार करावयाची असेल, तर प्रस्थापित समाजातील विसंगती, अंतर्विरोध आणि त्यांमुळे निर्माण होणारी कोंडी यांच्या कलात्मक आविष्कारातून समाजावर संस्कार करता येतात. उपहास किंवा विनोद ही शस्त्रे साहित्यिक शस्त्रक्रियेत समाजपरिवर्तनासाठी वापरली गेली आहेत; हे जगातील सर्व साहित्यांच्या इतिहासाने सिद्ध केले आहे. मला वाटते, आता जे आपले सामाजिक प्रश्न आहेत, ते सर्व पुनर्रचनेचे प्रश्न आहेत, त्याचे संशोधन करून प्रकट चर्चा व चिंतन करणारे समाजचिंतक आणि त्यातील तत्त्वांचा व समाजक्रांतीचा ध्यास घेतलेले समर्थ ललित लेखक या दोघांचेही कार्य एकमेकांस पूरक आहे. या प्रयत्नांची गरज आहे. मला वाटते, ही अपेक्षा मराठी साहित्यिकांकडून करणे गैर होणार नाही.

या वैचारिक प्रबोधनाचे स्वरूप काय असावे, हा प्रश्न स्वाभाविकत: उपस्थित होतो. याबाबत मतैक्य अशक्य आहे. पण प्रकट चिंतन करणे शक्य आहे; नव्हे, आवश्यक आहे. एकोणिसाव्या व विसाव्या शतकांतील वैचारिक जागृतीचे श्रेय, बरेचसे पाश्चात्त्य विचारांना आहे. इंग्रजी हा त्याचा आधार होता. यापुढे प्रादेशिक लोकभाषा याच ज्ञानभाषा झाल्या पाहिजेत. त्यांच्यातच चिंतनशील साहित्य निर्माण झाले पाहिजे. ही आजची महत्त्वाची गरज आहे. दुसरे कारण आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे आहे. आतापर्यंत आपल्या बौद्धिक जीवनावर पश्चिमेचा ठसा उमटला आहे. एक तर आशिया, आफ्रिका यांतील साम्राज्यशाही बव्हंशी गेलेली आहे; आणि त्यांच्या सामाजिक प्रश्नांचा, सांस्कृतिक वैशिष्ट्यांचा स्वतंत्र विचार करण्याची गरज आहे. आता हे कार्य भारतीय साहित्यिकांना करता येईल.