• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

ऋणानुबंध (98)

अलौकिक नेता

पं. नेहरूंना मी १९३१ मध्ये प्रथम पाहिले कराडला. मी शाळेत शिकत होतो आणि विद्यार्थ्यांच्या चळवळीत थोडाबहुत भागही घेत होतो. एके दिवशी आम्हाला कुणकुण लागली, पं. नेहरू बंगलोर मेलने जाणार आहेत. बंगलोर मेल कराड स्टेशनवर मध्यरात्रीनंतर येते. अशा आडवेळी पं. नेहरूंना उठवावे की उठवू नये, अशा द्विधा मन:स्थितीत स्थानिक नेते होते. पण या चर्चेत मला काहीच रस नव्हता. माझ्या मनाचा निश्चय केव्हाच झाला होता. पं. नेहरूंच्या दर्शनाची ओढ मला व माझ्या सहकारी मित्रांना लागली होती. आम्ही पं. नेहरूंना उठवून विद्यार्थ्यांसमोर उभे करावयाचे ठरविले होते.

ठरल्याप्रमाणे त्या मध्यरात्री आम्ही पाचशे विद्यार्थ्यांचा तांडा घेऊन कराड स्टेशनच्या फलाटावर जमलो. गाडी यावयाची वेळ जसजशी जवळ येत होती, तसतसे आमचे औत्सुक्य शिगेला पोचत होते. अखेर शेवटी तो क्षण जवळ येऊन ठेपला. बंगलोर मेल कराड स्टेशनवर उभी राहिली. पंडितजींचा डबा आम्ही शोधून काढला व डब्याच्या भोवती आम्ही उभे राहिलो. धडधडत्या अंत:करणाने डब्याचे दार आम्ही वाजविले. क्षणार्धातच पंडितजी जागे झाले. दार उघडून बाहेर आले. काहीशा रागीट मुद्रेनेच त्यांनी आमच्याकडे पाहिले; पण हा राग लगेच मावळला. गाडी सुटण्याची वेळ होईपर्यंत या पाच मिनिटांत पंडितजी आम्हा बालगोपाळांच्या मेळाव्यात होते. पं. नेहरू हुबळीला निघाले होते. त्यांच्याबरोबर, मला आठवते त्याप्रमाणे, हिंदुस्थानी सेवा दलाचे डॉ. हर्डीकर आणि श्रीमती कमलादेवी चट्टोपाध्याय ही मंडळी होती.

पं. जवाहरलाल नेहरू यांचे हे पहिले दर्शन झाल्यावर प्रत्यक्षत: त्यांना पाहण्याचा योग पुढे कित्येक वर्षेपर्यंत आला नसला, तरी विचाराने त्या काळातील आम्ही तरुण मंडळी त्यांच्या आसपासच वावरत होतो. त्यांच्या व्याख्यानांचे वृत्तान्त आवडीने वाचत होतो, त्यांच्यासंबंधीचे लेख, आठवणी मिळवीत होतो, वाचत होतो.

- आणि अशा त्यांच्यासंबंधीच्या औत्सुक्याने भरलेल्या काळात आणि संस्कारक्षम वयात त्यांची आत्मकथा माझ्या वाचनात आली. १९३४-३५ साल असेल ते. कॉलेजमध्ये असताना मी त्या ग्रंथाचे वाचन केले. आज अनेक वर्षांनंतरसुद्धा तो ग्रंथ, त्याचे त्या काळी केलेले वाचन या सर्व गोष्टी अजून ताज्या वाटतात. मला वाटते, आत्मकथेच्या वाचनानंतर आपला नेता हाच, ही भावना अधिक दृढ झाली. राष्ट्रीय चळवळीतील एक आकर्षक नेता म्हणून आम्ही त्यांच्या जवळ गेलो होतो, पण वैचारिकदृष्ट्या त्यांचे नेतृत्व मी आत्मकथेच्या वाचनानंतर स्वीकारले. विचाराने त्यांच्याजवळ जो गेलो, तो शेवटपर्यंत कधी दुरावा निर्माण झाला नाही. त्यांच्यासंबंधीचे वाचन, मनन पुढे चालूच राहिले. मेळावे, अधिवेशने, जाहीर सभा यांतून लाखो श्रोत्यांतील एक म्हणून त्यांना पाहतही होतो. पण त्यांची प्रत्यक्ष भेट मात्र १९५२ पर्यंत कधी झाली नाही.