• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

ऋणानुबंध (97)

सचिंत चेह-याने माझ्याशी हस्तांदोलन करून तो गृहस्थ स्वागत-समारंभाच्या गर्दीत मिसळूनही गेला.

मी मात्र काही क्षण तेथेच उभा होतो. ज्याने कधी गंगा पाहिली नाही, त्याला
डॉ. राधाकृष्णन् यांच्या ओघवत्या वाणीने गंगौघ कसा असेल, याचे दर्शन झाले. या अनुभवाने मी काहीसा अंतर्मुख झालो; आणि हृषीकेशजवळ पर्वतराजीतून खाली उतरून हरिद्वारकडे जाणारा गंगेचा प्रशान्त प्रवाह आणि बोलण्यासाठी उभी राहिलेली डॉ. राधाकृष्णन् यांची मूर्ती माझ्या डोळ्यांपुढे उभी राहिली.

दिल्लीतील डॉ. राधाकृष्णन् यांच्या वास्तव्यात उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती ही दोन सर्वोच्च पदे त्यांनी भूषविली. या सर्व काळात अनेक महत्त्वाच्या राजकीय घटना घडल्या, अनेक वादळी प्रसंगांतून देशाला जावे लागले. या प्रसंगी त्यांचे मौलिक मार्गदर्शन राज्यकर्त्यांना लाभले. त्यांच्याशी चर्चा करणे ही एक बौद्धिक मेजवानी असे. राष्ट्रपती झाल्यानंतर भारतीयांना एका अर्थाने पितृछत्रच मिळाले होते. तत्त्वज्ञ राज्यकर्ते व्हावेत, अशी ग्रीक तत्त्वज्ञ प्लेटोची मनीषा होती. भारतात ती पूर्ण झाली हाती. डॉ. राधाकृष्णन् राजकारणात वावरत होते. त्यांच्यांत स्थितप्रज्ञता होती, ती तत्त्वज्ञाची होती. पण त्याचबरोबर त्यात पित्याची आस्था होती आणि जिज्ञासा होती, ती प्राध्यापकाची. राज्यसभेचे सभापती म्हणून त्यांनी आपला दबदबा निर्माण केला, तो त्यांच्या समतोलपणामुळे.

डॉ. राधाकृष्णन् यांचे विचारधन फार मोठे आहे. भारतीय तत्त्वज्ञानाचे भाष्यकार म्हणून त्यांनी लिहिलेले ग्रंथ जगन्मान्य झाले आहेत. युरोप-अमेरिकेत गांधीजी, रवींद्रनाथ टागोर यांच्याइतकेच डॉ. राधाकृष्णन् यांचे नाव या त्यांच्या विचारधनामुळेच लोकांना माहिती आहे. डॉ. राधाकृष्णन् हे आस्तिक होते. त्यांची आस्तिकता शास्त्रपूत होती. भारतीय संस्कृती हा सर्वसमावेशक असा गतिमान प्रवाह आहे, अशी त्यांची धारणा होती.

परिवर्तनशीलता व गतिशीलता ही नव्या विश्वसंस्कृतीची वैशिष्ट्ये आहेत. या संस्कृतीशी भारतीय संस्कृती आपला सांधा बेमालूमपणे जोडू शकेल, असा त्यांचा विश्वास होता.
डॉ. राधाकृष्णन् यांचे विचारमंथन याच सूत्रानुसार चालत असे. त्यामुळे ते सतत काळाबरोबरच राहिले. प्राचीनतेवर श्रद्धा ठेवूनही आधुनिक राहिले. ते आधुनिक भारतीयतेचे सूक्तकार होते. म्हणूनच राजनैतिक क्षेत्रात त्यांना मान होता आणि तत्त्वज्ञांच्या व बुद्धिमंतांच्या जगामध्ये क्रियावान पंडित म्हणून त्यांच्याकडे सारे जागतिक दर्जाचे बुद्धिवंत पाहत असत. असे दुहेरी श्रेष्ठत्व क्वचितच मिळते. तो मान डॉ. राधाकृष्णन् यांना मिळाला. म्हणून त्यांच्याबद्दल भारतीयांना अभिमान वाटत राहील.