• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

ऋणानुबंध (9)

मी शाळेत असताना उपरिनिर्दिष्ट चळवळ जोराला लागलेली होती. लोकमान्य टिळकांच्या विरोधी लिहिणे, बोलणे ही एक चळवळ त्या वेळी सुरू होती. जाणती माणसे हिरिरीने ती चळवळ करीत होती. तेही मी सारे वाचीत असे, पण हे सारे काय चालले आहे, कशासाठी चालले आहे, हे समजून घेण्याचा प्रयत्न करूनही मला समजत नव्हते. जे चालले होते, त्यापेक्षा अनेक महत्त्वाचे प्रश्न देशात आहेत, त्यांच्याकडे ही जाणती माणसे लक्ष देत नाहीत, अशी एक हुरहुर मनाला चिकटलेली असे; आणि या हुरहुरीतूनच आपण काही केले पाहिजे, या विचाराचा जन्म झाला. पण करायचे म्हणजे तरी काय; आणि ते कसे, हा प्रश्न होताच. तथापि, या प्रश्नाचे उत्तर शोधण्यास मला फार काळ काढावा लागला नाही. कारण या गंभीर विचारातूनच माझे गंभीर वाचन सुरू झाले होते.

त्या वेळी मी जे वाचले, त्यात राष्ट्र-पुरुषांची चरित्रे होती, टिळकांचे राजकारण होते, स्वातंत्र्ययुद्धातील क्रांतिकारकांचे ज्वलंत विचार होते, काँग्रेसच्या नेत्यांची शिकवण होती, समाज-नेत्यांचा आदर्श होता... आणखी पुष्कळ होते. मी विचार करून वाचीत होतो आणि या दोन्हींची सांगड अनुभवाशी लावीत होतो. पुढे पुढे तो एक माझा स्वभावच झाला. विचार करून, अनुभवातून प्रतिक्रिया व्यक्त करावयाची हा माझ्या स्वभावाचा स्थायिभाव त्या वेळपासूनचा आहे. गेल्या अनेक वर्षांच्या माझ्या राजकीय जीवनात त्या वेळच्या त्या संयमी विचारांची सोबत मला अनेकदा उपयोगी पडत आली आहे.

वाचनाला आणि विचाराला अनुभवाचे कोंदण लाभावे, अशी त्या वेळी कराडची स्थिती होती. आमचा कराड भाग नेहमीच जागृत ! सत्यशोधकांच्या चळवळीमुळे समाजाचे मन बदलत चालले होते, बदललेही होते. मी अनुभवीत होतो. माझे अंत:करण मात्र दुसरेच काही तरी धुंडाळत होते. मोठीमोठी माणसे तुरुंगात जातात, हालअपेष्टा भोगतात, देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलाढ्य इंग्रजांना तरुण मने आव्हाने देतात, जिवाची कुर्बानी करतात, हसत हसत फासाची दोरी स्वत:च स्वत:च्या गळ्याभोवती आवळून घेतात आणि 'जय भारत' म्हणून पंचत्वात विलीन होतात, हेही माझ्या वाचनात होते. सत्यशोधक मंडळी यासंबंधी का बोलत नाहीत, असे मला नेहमी वाटे. स्वातंत्र्याचा शोध हाच खरा सत्याचा शोध असू शकतो, याविषयी माझ्या मनात तिळमात्र शंका नव्हती. समाजात वावरताना मला मात्र जो अनुभव मिळत होता, तो खटकणारा होता. तथापि, अनुभव कोणता का असेना, तो कधी व्यर्थ जात नाही, अशी माझी धारणा असल्याने तसलाही अनुभव गाठी बांधून मी पुढे चाललो होतो.