• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

ऋणानुबंध (166)

माडगूळकरांच्या गीतरामायणातील सीतेशी संबंधित अशी जी गीते आहेत, ह्याचे मला स्वत:ला फार आकर्षण वाटत राहिले आहे. खरोखर रामायणाला 'रामायण' का म्हणतात? त्या कथेला 'सीतायन' का म्हणू नये, असे सीतेला भोगावे लागलेले भोग पाहून वाटते. अण्णांच्या काव्यातून 'लीनते, चारुते, सीते' या ओळी ऐकू लागले, की सीतेच्या जीवनाचे सारे करुण काव्य डोळ्यांसमोर उभे राहते.

माडगूळकरांच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर नित्याचे व्यवहार चालू असताना मन:पटावर उमटत होते, ते गीतरामायणाचे शब्द. असाच एका क्षणी सहज गुणगुणून गेलो, 'पापण्यांत गोठवली मी नदी आसवांची'. सीतेच्या अग्निप्रवेशाच्या वेळी रामाने काढलेले हे उद्गार अण्णांच्या अकाली निधनाचा शोकभार सहन करताना आठवावे, हा त्या शब्दांचा प्रभाव म्हटला पाहिजे.

ग. दि. माडगूळकर यांच्या सहित्यकृतीचे मूल्यमापन साहित्यसमीक्षक कसे करायचे, ते करोत; मला तरी त्यांच्या साहित्यिक व्यक्तिमत्त्वाचा एक विशेष जाणवतो, तो म्हणजे त्यांची शब्दसिद्धी. शब्दसृष्टीचे ईश्वर, असे कवीला म्हणतात. माडगूळकरांचे शब्दसृष्टीतील कर्तृत्व अफाट होते. केव्हा केव्हा असे वाटते, की अण्णा गीतरचना करू लागले, की अनेक सुंदर सुंदर रसाळ शब्द आणि कल्पना त्यांच्यासमोर 'मला घ्या, मला घ्या' असे म्हणत गर्दी करीत असल्या पाहिजेत.

त्यांच्या लेखणीत सहजता, प्रसाद हे गुण निर्विवाद होते. पण मला जाणवणारा आणखी एक गुण म्हणजे त्यांच्या लेखनातील अकृत्रिमता. अनुभवाशी संबंधित नाही, असे रोमँटिक, किंवा कृत्रिम असे त्यांनी काहीही लिहिले नाही. म्हणून त्यांचे साहित्य जीवनस्पर्शी झाले आहे.

माडगूळकर हे मध्यमवर्गाचे खरेखुरे प्रतिनिधी होते. जुन्या परंपरेबद्दल अभिमान ठेवत असतानाही नव्या परिस्थितीची जाणीव ठेवणे; आपल्या कौटुंबिक जबाबदा-या आस्थेने व निष्ठेने पार पाडत असतानाही सामाजिक जबाबदारी ओळखून शक्य तेवढे सामाजिक कार्य करणे, अशी मध्यमवर्गीय समाजाची काही ठळक वैशिष्ट्ये मानली, तर माडगूळकरांमध्ये ही सर्व वैशिष्ट्ये प्रकर्षाने होती. कोल्हापूरमधल्या तरुण माडगूळकरांचे जीवन कसे खडतर होते, ते त्यांनीच एकदा सांगितले होते. प्रसंगी अर्धपोटी राहावे लागत होते, पण त्याही अवस्थेत त्यांनी स्वातंत्र्य-संग्रामाला साथ दिली होती.

असे हे माडगूळकर मध्यमवर्गाचे प्रतिनिधी असून सुद्धा त्यांची ग्रामीण जीवनाविषयीची सहानुभूती व संवेदना जिवंत होती. त्या वातावरणात त्यांचे बालपण गेले होते, हे खरे; पण केवळ अनुभवाच्या पलीकडे असलेला हृदयाचा ओलावा शहरात येऊन आटला नाही, वाळला नाही; म्हणून माणुसकीचा गहिवर त्यांच्या साहित्याचे एक प्रमुख वैशिष्ट्य झाला आहे.

सिनेमाच्या लखलखत्या दुनियेत राहूनही ज्याने आपली शालीनता, संस्कृती सोडली नाही, राजकारणात असूनही ज्याने पक्षबाजी केली नाही, आपत्तींना तोंड देतानाही ज्याने कटुता येऊ दिली नाही, धार्मिक परंपरांचा अभिमान बाळगूनही ज्याने गायन, संगीत, सिनेमा, आदी कलाक्षेत्रांतून मानाने संचार केला, असा एक श्रेष्ठ साहित्यिक, निखळ आनंद देणारा मित्र गेला. फार लवकर गेला. न सांगता-सवरता गेला. त्याचे दु:ख न संपणारे, न ओसरणारे आहे.