• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

ऋणानुबंध (138)

एक स्त्रीच आपल्या या संमेलनाची अध्यक्षा आहे, एक स्त्री भारताच्या पंतप्रधान आहेत. इतरही अनेक क्षेत्रांत स्त्रियांना मानाचे स्थान मिळाले आहे. पण स्त्रियांना समाजात काही स्थान आहे का, यापेक्षा स्त्रीचा समान समाजघटक म्हणून समाजात किंवा आपल्या कौटुंबिक जीवनात स्वीकार झाला आहे का, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. कायद्यातील समानता आणि न्यायालयातील समानता यांना महत्त्व आहेच. पण ती समानता समाजाच्या दैनंदिन व्यवहारात प्रतिबिंबित झाली नाही, तर ती विसंगती दु:सह होते. प्रत्येक वेळी न्याय मिळविण्यासाठी न्यायालयात जाता येत नाही किंवा कायद्यावर बोट ठेवता येत नाही. म्हणून सामाजिक हक्क हे समाजमनाच्या उदारतेवर, त्याच्या समंजसपणावर अवलंबून असतात. मला वाटते, हा तात्त्विक सामाजिक उदारमतवाद व आपल्या मनात मूळ धरून बसलेली जुनी मूल्ये यांच्यांतील संघर्षाचे पडसाद प्रत्येकाच्या जीवनात उमटतात. तुमच्या-आमच्या प्रत्येकाच्या जीवनातही हे घडते. आणखी असे, की स्त्रियांचे किंवा दलितांचे समाजातील न्याय्य स्थान केवळ मानवतेच्या किंवा कारुण्याच्या भूमिकेतून आपण स्वीकारले, तर ते एक ढोंग ठरेल. समाजघटक म्हणून या दोघांना आपण स्वीकारले पाहिजे. त्यांच्या कर्तृत्वाला स्थान दिले पाहिजे आणि या त्यांच्या नव्या सामाजिक स्थानाशी अनुकूल अशी समाजाची व व्यक्तीची मानसिक जडणघडण झाली पाहिजे.

या दृष्टीने दलित समाजातून आलेल्या नव्या मराठी साहित्यिकांनी जे साहित्य निर्माण केले आहे, ती मराठीतील एक मोलाची भर आहे, असे मी मानतो. उच्चभ्रू साहित्याचे किंवा त्यांच्या संकल्पनांचे मानदंड लावून त्याला जोखणे चुकीचे आहे. उच्चभ्रू साहित्यात पाश्चात्त्य वळणाची अश्लीलता आपणांला चालते, दलित समाजातून येणा-या साहित्यिकाच्या भाषेस मात्र आपण नाके मुरडतो. हा नैतिक भेदभाव आहे, दुहेरी मानदंडाची भावना त्यामागे आहे, असे मला वाटते. म्हणून ज्या सामाजिक थरातून लेखक आलेला असेल, त्याची भाषा त्याच्या साहित्यात आली, तर ती स्वागतार्ह मानली पाहिजे. शेवटी भाषेचे माध्यम अभिव्यक्तीसाठी वापरावयाचे असेल, तर तिचा सामाजिक अभिव्यक्ती हाही एक अविभाज्य भाग आहे. हजारो वर्षे दडपल्या गेलेल्या समाजाचा पहिला उद्गार रूढ कल्पनेप्रमाणे असावा, असे मानणे चुकीचे आहे. तो 'उद्गार' निघाला, हेच सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. तो असेल तसा आला पाहिजे. आपण त्याचे स्वागत केले पाहिजे. मला वाटते, आपले हजारो वर्षांचे संस्कार अशा अभिव्यक्तीतून बाहेर पडले, तर सामाजिकदृष्ट्या आरोग्यदायक ठरेल. आदिवासी व उपेक्षित जाती यांची भाषा आता नव्या मराठी भाषेत येणार आहे. हे सामुदायिक चयन किंवा देवाण-घेवाण भाषेच्या दृष्टीने उपयुक्त आहे. त्याने मराठी भाषा समृद्ध होईल. म्हणून दलित साहित्याची भाषा कदाचित वेगळी वाटली, तरी तिचा कस, तिच्यातील रग, जर नव्या मराठीत उतरली, तर ती हवीच आहे. पण यासाठी जाणकारांनी व सामान्य वाचकांनी स्वागतशील वृत्ती ठेवली पाहिजे.