• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

ऋणानुबंध (130)

महाराष्ट्राच्या भोवताली अनेक भाषांचे वर्तुळ आहे आणि या भाषांशी नेहमीच संबंध येत राहिल्याने त्याचा मराठीवर परिणाम होणे साहजिकच आहे. इ. स. पूर्वकाळात आर्यांचा दक्षिणापथ प्रदेशाबरोबर संबंध होता. त्याचा असा परिणाम झाला, की मुसलमानांचे आक्रमण होण्यापूर्वी, महाराष्ट्रातील जनतेचा संस्कृत, प्राकृत आणि अपभ्रंश ह्या आर्य भाषांशी संबंध आला व त्याचा त्यांच्यावर प्रभाव पडून त्यांना या भाषांचा परिचय झाला.

मराठी भाषेला इतिहासाने वस्त्र दिले, तर भूगोलाने ते शिवून मराठी भाषेच्या अंगावर घातले व तिच्या रूपात भर टाकली, असे म्हणावे लागेल. प्राचीन काळापासून या प्रदेशाची अशी भौगोलिक स्थिती होती, की उत्तर भारत आणि दक्षिण भारत या दोघांमध्ये एका सेतूची भूमिका या प्रदेशाने पार पाडली. उत्तरापथमधील रहिवासी ह्या प्रदेशाला दक्षिणापथ म्हणत असत, तर दक्षिणेकडील लोक या प्रदेशाला उत्तरेकडील अंतिम ठाणे समजून ह्या प्रदेशाकडे एक जवळचा शेजारी या नात्याने पाहत असत. अशा परिस्थितीत, उत्तर आणि दक्षिणेकडील विचारप्रवाह, तसेच बोलभाषा ह्यांचा संगम ह्या प्रदेशात होणे स्वाभाविकच होते. जवळजवळ एक हजार वर्षे असाच क्रम व उपक्रम चालू राहिल्यानंतर मुसलमानांचे पाय या भूमीला लागले. जुन्या विचारप्रवाहात एक तिसरा प्रवाह येऊन मिळाला. महाराष्ट्राच्या पश्चिम किना-यावरील सागर-वाहतुकीच्या वर्दळीनेही विविध संस्कारांची भर या भाषेच्या विकासामध्ये पडत आली आहे. येथील गृहस्थाश्रमी लोकांनी आपल्या दैनंदिन जीवनात, शब्दांचा जितका उपयोग केला नाही, त्यापेक्षा किती तरी पट कोलाहल येथील मैदानात आणि पर्वतश्रेणीत भटकणा-या आणि संघर्ष करणा-या सेनांनी केला. महाराष्ट्राच्या विशिष्ट भौगोलिक परिस्थितीची ही देन आहे.

या सर्व कारणांमुळे मराठी भाषेवर आणि कालांतराने मराठी साहित्यावर असाधारण सर्वांगीणतेची तसेच सर्वसंग्राहकतेची छाप पडली. ह्याचा परिणाम असा झाला, की आर्य कुटुंबात निर्माण झालेल्या ह्या भाषेत काही द्रविड भाषेतील विशेष गुणांनी तसेच शब्दांनी प्रवेश केला. संस्कृत, तसेच भिन्न भिन्न प्राकृत आणि अपभ्रंश भाषांशिवाय अरबी आणि फारसी भाषांना मराठीत स्थान मिळाले. ह्या प्रक्रियेची कारणमीमांसा आणि त्याचा परिणाम यावर विशेष प्रकाश टाकणे हे भाषाशास्त्रज्ञांचे काम आहे. मी एवढेच म्हणेन, की मराठीच्या या सर्वसंग्राहक स्वरूपाचा मला खरोखर अभिमान आहे आणि मराठी भाषेच्या ह्या विशेष गुणांमुळेच ह्या भाषेबद्दलची माझी श्रद्धा वाढते आहे.