• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

ऋणानुबंध (128)

हे सर्व आकड्यांचे अर्थकारण करीत असताना डॉ. गाडगीळांना बदलत्या सामाजिक व राजकीय प्रवाहांचे भान असे. त्यांचे  सामाजिक प्रक्रियेकडे, दैनंदिन जीवनात घडणाऱ्या क्रांतीकडे लक्ष असे. त्यामुळे गाडगीळ हे कधीही स्थितिशील झाले नाहीत. लोकशाहीवर ठाम निष्ठा, गरिबांच्या प्रश्नांची कणव आणि लोकहिताची साक्षेपी जपणूक करण्याचे त्यांचे धोरण या गाडगीळांच्या जीवनकार्याच्या मूलभूत निष्ठा मानता येतील.

या सर्व निष्ठांमुळेच गाडगीळांचे जीवन व्रतस्थ झाले, त्यामुळे कडक आचरण व स्वनियमन आले. म्हणूनच लौकिक अर्थाने प्रसिद्धीच्या प्रकाशात न वावरता गोखले अर्थसंशोधन संस्थेचे काम सतत छत्तीस वर्षे त्यांनी एकाग्रतेने केले.

सहकारी चळवळीप्रमाणेच गाडगीळांचे शैक्षणिक कार्य व त्यांचे संयुक्त महाराष्ट्राच्या वेळी झालेले अमोल साहाय्य महत्त्वाचे आहे. कर्मवीर भाऊराव पाटलांच्या रयत शिक्षण संस्थेचे गाडगीळ कार्याध्यक्ष झाले आणि आपल्या नेहमीच्या निष्ठेने, शिस्तीने व पद्धतशीरपणे त्यांनी ते काम केले. शिक्षण-प्रसाराच्या क्षेत्रात गाडगीळांची ही कामगिरी मोलाची आहे.

संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाला जी तात्त्विक व शास्त्रशुद्ध बैठक गाडगीळांनी दिली, ती फार मोलाची म्हणावी लागेल. ज्या वेळी भाषिक प्रश्नात लक्ष घालण्यास उच्च कोटीचे विद्वान तयार नव्हते, त्या वेळी गाडगीळांनी अत्यंत स्पष्ट शब्दांत आपले विचार मांडले. किंबहुना गाडगीळांची भारतीय संघराज्याविषयीची संकल्पना स्पष्ट असल्याने त्यांनी संयुक्त महाराष्ट्राला पाठिंबा दिला.

डॉ. गाडगीळ यांचे महाराष्ट्राच्या व भारताच्या राष्ट्रीय जीवनातील स्थान स्वयंनिर्मित होते. त्यांचे कार्य अनेक विचारवंतांना व कार्यकर्त्यांना स्फूर्ती देत राहील, यात शंका नाही.