• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

ऋणानुबंध (115)

सेवाव्रती महर्षी

पुणे विद्यापीठातर्फे महर्षी अण्णासाहेब शिंद्यांचा जन्ममहोत्सव आपण साजरा करीत आहोत. यामध्ये एक प्रकारचे औचित्य आहे. कारण कर्मवीरांचा जन्म जरी आजच्या कर्नाटकात झाला असला, तरी त्यांनी मराठीची अमोल सेवा केली आहे आणि त्यांच्या आयुष्यातील कर्तृत्वाचा फार मोठा काळ त्यांनी या पुणे शहरामध्ये काढला आहे. पुण्यामध्ये असताना हृदय हलवून सोडणारे प्रसंग त्यांच्यावर आले. पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणून जमखिंडीसारखे लहानसे गाव सोडून ते या शहरामध्ये विद्या प्राप्त करण्याकरिता आले; अक्षरश: मित्रांच्यापुढे पदर पसरून शिक्षणाला मदत करावी, अशी अपेक्षा करीत ते आले. विद्येसाठी याचना करण्यात काही कमीपणा आहे, असे मानण्याचे काही कारण नाही. त्यांच्या चरित्रामधील त्या गोष्टीचा उल्लेख वाचताना हृदय भरून येते. मदतीसाठी ते प्रिन्सिपॉल आगरकरांकडे गेले. न्यायमूर्ती रानड्यांकडे गेले.

रानड्यांच्या हातून शिक्षणाकरिता मदत मिळण्याचा योग या माणसाला लाभला, हे मी एका अर्थाने भाग्यच समजतो. ज्या काळात हे घडत होते, ते एकोणिसाव्या शतकाचे शेवटचे दशक होते. त्या काळचे या देशातील बहुतेक सगळे मोठे पुरुष पुणे शहरामध्येच काम करीत होते, असे म्हटले, तरी चालेल. हिंदुस्थानच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक प्रश्नांची ते सर्वजण मूलभूत चर्चा करीत होते. हिंदुस्थानच्या अगतिकतेची, मागासलेपणाची, पारतंत्र्याची ते मीमांसा करीत होते. त्यांच्यामध्ये मतभेद होते. त्या मतभेदांची सार्वजनिक चर्चा व्याख्यानांच्या व वृत्तपत्रांतील लेखांच्याद्वारे चालू होती. अशा एका वैचारिक आंदोलनाच्या काळात पुणे शहरामध्ये विद्यार्थी म्हणून अण्णासाहेब आले आणि त्या वातावरणात त्यांनी स्वत:चे वैशिष्ट्यपूर्ण असे व्यक्तिमत्त्व घडविले.

अत्यंत प्रभावशाली नेत्यांचे आदर्श समोर ठेवून, कुणाची नक्कल न करता, स्वत:चे एक वेगळे व्यक्तिमत्त्व त्यांनी घडवले. विठ्ठल रामजी शिंदे एवढे ध्येयवादी, सेवाव्रती जीवन जगल्यानंतरसुद्धा सार्वजनिक जीवनाच्या झगझगाटात असे कधी आले नाहीत, ही एक मोठी आश्चर्य वाटण्यासारखी, कुतूहल करण्यासारखी पण महत्त्वाची गोष्ट आहे. ज्यांचे कार्य मोठे, तो पुरुष ख-या अर्थाने मोठा होय. परंतु अंगुलीएवढे ज्यांचे काम; अशी माणसेही प्रसिद्धीच्या झगझगाटाने योगायोगाने मोठी होतात. पण सबंध जीवनभर ज्याने सेवेशिवाय, त्यागाशिवाय दुसरे काही केले नाही आणि केवळ कार्यनिष्ठेतून स्वत:चे व्यक्तिमत्त्व साकार केले, असा माणूस विरळा ! पुणे येथे विद्याभ्यास पूर्ण केल्यानंतर ते परदेशात गेले. तिथे तर माणसे आय्. सी. एस्. होण्याकरिता, बॅरिस्टर होण्याकरिता किंवा काही लोक रँग्लर होण्याकरिता हिंदुस्थानमधून जात होती.