• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

ऋणानुबंध (111)

लोकमान्य राजर्षी

महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासात राजर्षी श्री शाहू महाराजांचे स्थान फार वरच्या दर्जाचे आहे. इतर अनेक राज्यांत बहुसंख्य समाज हा दीर्घकाळ शिक्षण, राजकीय सत्ता, सामाजिक स्थान व प्रतिष्ठा यांपासून वंचित राहिला. महाराष्ट्रात हे झाले नाही. त्याबाबतची जागृती महात्मा फुले यांनी केली. त्यानंतर या समाजाचे परिवर्तन घडवून आणण्याच्या कामात महत्त्वाची कामगिरी बजावणारे म्हणजे कर्मवीर शिंदे, राजर्षी शाहू महाराज व कर्मवीर भाऊराव पाटील. यांपैकी शाहू महाराज हे छत्रपती होते आणि आपल्या राजसत्तेचा उपयोग त्यांनी वंचित अशा समाजात जागृती निर्माण करण्यासाठी केला. यामुळे सामान्य लोकांतही जागृती झाली व म्हणून महाराष्ट्रात सरंजामशाहीचे दोष फारसे दिसत नाहीत. सामाजिक परिवर्तनाच्या या कार्यामुळेच मराठी समाज हा त्यांतल्या त्यांत या देशातला आधुनिक समाज बनला आहे.

राजर्षी शाहू महाराज हे ब्रिटिशांच्या राजवटीतील संस्थानिक होते आणि याच्या मर्यादा त्यांच्या काही धोरणांना पडणे स्वाभाविक होते. पण देश, काल, परिस्थितीच्या मर्यादा सर्वांनाच पडतात. त्यांपलीकडे जाऊन त्यांचे कार्य दूरगामी परिणाम घडवून आणते, त्यांचे नाव इतिहासात अजरामर हाते. शाहू महाराजांचे नाव या कारणास्तव अजरामर झाले. तसे पाहिले तर संस्थानिक अनेक होते, पण शाहू महाराज हे केवळ संस्थानाधिपती म्हणून मोठे ठरत नाहीत. त्यांच्या राजसत्तेला सामान्य जनतेच्या कळवळ्याचे लेणे चढले होते. कोल्हापूर संस्थानात त्यांनी विद्या, कला, व्यापार, उद्योग, इत्यादी क्षेत्रांत जे नवे चैतन्य निर्माण केले, ते स्वत:चा बडेजाव वाढविण्यासाठी नव्हे; तर या अनेकविध क्षेत्रांतील गुणिजनांना प्रोत्साहन देऊन आपल्या राज्यात विद्या, कला, व्यापार, क्रीडा यांची भरभराट व्हावी आणि त्यायोगे आपल्या प्रजाजनांचे भले व्हावे, ही प्रेरणा त्यामागे होती. यामुळे गुणिजनांना, अनाथ व एकाकी लोकांना फार मोठा आधार होता.

राजर्षी शाहू महाराजांनी घडविलेल्या सामाजिक परिवर्तनाचे रहस्य आणि वैशिष्ट्य हे, की त्यांनी जे विविध उपक्रम केले, ते चिरस्थायी ठरतील, अशी त्यांची बांधणी केली. कित्येक वेळा मोठी माणसे काही उपक्रम सुरू करतात आणि त्यांच्यानंतर त्यांचे कार्य नष्ट होते. आपल्याकडे कोणत्याही कार्याला संस्थारूप देण्यात आपण अयशस्वी ठरतो. यामुळे ज्या व्यक्तीने एवढे कार्य उभारले, ती बाजूला झाली, की त्या कार्याचा मागमूस राहत नाही. ज्या समाजाचे संस्थात्मक जीवन भरभक्कम असते, तोच समाज पराक्रम गाजवू शकतो. शाहू महाराजांनी हे ओळखले होते. याबाबतीत त्यांची दृष्टी शास्त्रशुद्ध आणि आधुनिक होती.