• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

ऋणानुबंध (110)

स्तिमित होतो. पण त्यांच्या लष्करी मोहिमांत सैनिकी प्रतिभा होती. प्रज्ञा हाती, नियोजन होते, हे समजून घ्यायला पाहिजे. शिवाजी महाराजांमध्ये वैयक्तिक साहस तर होतेच. त्यांना ईश्वरी वरदानही होते. पण त्याहीपेक्षा नियोजन होते, लष्करी युक्त्या होत्या, शत्रूला अचानक घेरण्याचे तंत्र होते. चपळाई करून निसटण्याचे कौशल्य होते. त्यामागे लष्करी माणसाला आवश्यक असणारे भौगोलिक ज्ञान होते. अफजलखानाच्या वधाच्या वेळी शिवाजी महाराजांनी वैयक्तिक साहस तर दाखविलेच, पण त्या वेळी आपल्याला अनुकूल अशा प्रदेशात लढाईसाठी शत्रूला खेचून आणण्याचे लष्करी कसबही दाखविलेच. प्रतिकूल घडले, तर काय करावयाचे, हा आराखडाही तयार होताच. मिर्झा राजे जयसिंग यांच्याशी तह केला, ती पराभवाची काळोखी रात्र हाती. पण माघार घ्यावयास लागणारे धैर्य सेनापतीजवळ असावे लागते, ते धैर्यही त्यांनी दाखविले. तात्कालिक पराभवाने ते खचले नाहीत, म्हणून अंतिम विजय मिळाला.

सागरी सीमेला फिरंग्यांकडून धोका आहे, हे ओळखून त्याची तयारी महाराजांनी केली, हे त्यांच्या दूरदृष्टीचे आणखी एक उदाहरण. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, आपल्या शत्रूला त्यांनी ओळखले. एका प्राचीन चिनी सेनापतीने म्हटले आहे, 'शत्रूला ओळखा, स्वत:ला ओळखा. म्हणजे शंभर लढाया झाल्या, तरी शंभर विजय मिळतील.' शिवाजी महाराजांनी अशीच युद्धनीती अवलंबिली. स्वत:चे युद्धतंत्र निर्माण केले. सर्वंकष व्यूहरचना केली. ही व्यूहरचना एका साम्राज्याशी लढावयाच्या महायुद्धाची होती. तिची उद्दिष्टे मर्यादित नव्हती. उदंड राजकारण तटले होते, ते करावयाचे होते. स्वत: आयुष्यात त्यांनी स्थापन केलेले स्वराज्य ही केवळ त्याची आधारशिला होती. संकल्पित वर्धमान स्वराज्याचा तो पाया होता. शत्रूची जाण असलेली स्वराज्यनीती होती. काळाची पावले ओळखणारे सत्ताकारण होते आणि हे सर्व ईश्वरचरणी वाहिलेले होते. असा 'अनासक्त राजयोगी' भारतातच निर्माण होऊ शकतो, याचा आपल्याला राष्ट्र म्हणून अभिमान वाटला पाहिजे.

अशा पुरुषाचा राज्याभिषेक उत्सव म्हणूनच आपण इतमामाने साजरा केला. अशी राज्यस्थापना ही इतिहासाला कलाटणी देणारी घटना असते. इतिहासातील नव्या राजकीय प्रवाहाचा आरंभबिंदू असतो. शिवाजी महाराजांनी त्या प्रवाहाला जन्म दिला. कारण शिवाजी ही प्रवृत्ती होती. अनेक पिढ्यांचे ते वांछित होते.

शिवाजी हे इतिहासाचे मागणे होते. समर्थांच्या भाषेत 'ऐसा पाहिजे राजा । कैपक्षी परमार्थी ।' हे ते मागणे होते. ते नियतीने पुरे केले, म्हणून त्या काळी आनंदोत्सव साजरा झाला. त्या आनंदोत्सवाचे स्मरण म्हणजे कृतज्ञतेचे स्मरण असते. या कृतज्ञतेतच आपली कृतार्थता आहे.