या सर्व युद्धकाळात शास्त्रीजींचे जे मला दर्शन घडले, ते खरोखर अविस्मरणीय आहे. युद्धात नेहमीच चढउतार होतात. परिस्थिती क्षणाक्षणात बदलते. पण युद्धनेत्याला आपले मन खंबीर ठेवावे लागते. शास्त्रीजींनी हा खंबीरपणा, हे मनोधैर्य या सर्व काळात दाखविले. मनाशी त्यांनी पक्के ठरविले होते, की हा प्रसंग लेचेपेचे धोरण ठेवण्याचा नाही. प्रतिटोला हाणण्याची तयारी ठेवण्याचा आहे. त्यांचे हे मन आम्ही रोजच्या चर्चेतून पाहत होतो. त्यामुळे अनेक निर्णय घेणे सोपे गेले. पार्लमेंटला धीर आला. जनतेलाही या खंबीरपणाचा प्रत्यक्ष प्रत्यय आला, तो लाहोरच्या दिशेने आपले सैन्य घुसले, तेव्हा शास्त्रीजींनी जनतेला आकाशवाणीवरून आवाहन केले. त्यांचे ते भाषण, त्यांचे ते ‘Come what may’ हे शब्द म्हणजे त्यांच्या दृढ निर्धाराची, भारताच्या अशरण वृत्तीची ऋचा होती. त्यांच्या शब्दांना त्या काळी धार आली होती. युद्धमान भारताची ती प्रतिमा आणि भारतीयांना लाभलेले शास्त्रीजींचे त्या काळातील खंबीर नेतृत्व हे आपल्या आधुनिक इतिहासाचे एक सोनेरी पान आहे.
युद्ध थांबले आणि ताश्कंदच्या वाटाघाटींची तयारी सुरू झाली. शास्त्रीजींच्या कर्तृत्वाची वेगळी कसोटी आता लागणार होती. तेथेही शास्त्रीजी पूर्वीइतकेच खंबीर राहिले. वाटाघाटींचा प्रश्न परराष्ट्र खात्याच्या कक्षेतला. पण तरीही शास्त्रीजींनी मला बरोबर नेले. त्यातही त्यांची माझ्याविषयीची आपुलकी दिसली; विश्वास दिसला. ताश्कंदला रात्रंदिवस चर्चा होई. एक वेगळेच पर्व सुरू झाले होते. शास्त्रीजींचे पुन्हा वेगळे दर्शन मला त्या वेळी घडले. खंबीरपणाने, पण सौम्य शब्दांत ते आपला मुद्दा मांडत. दिवस जात होते. १० जानेवारीची गोष्ट आहे. रात्री थाटाचा स्वागत-समारंभ झाला होता. लोकनृत्य-संगीताच्या स्वरांनी वातावरण भरले होते. तो कार्यक्रम संपला. शास्त्रीजी परत जावयास निघाले. बाहेर कडाक्याची थंडी होती. धुक्यामुळे सारे धूसर दिसत होते. शास्त्रीजी आपल्या मोटारकडे जात असताना मला त्या धूसर प्रकाशात दिसले. तेच त्यांचे शेवटचे दर्शन ! त्यांची ती मूर्ती मनश्चक्षूंनी मी नेहमी पाहतो. त्यांना त्या वेळी पाहताना कल्पनाही नव्हती, की हा मनुष्य आपणांस पुन्हा भेटणार नाही.
शास्त्रीजी गेले आणि मला वाटले, एका फार मोठ्या नेत्याला हा देश मुकला. शास्त्रीजींचे हे मोठेपण अनेकरूपी होते. ते फार कुशल संघटक होते. त्यांच्यावर काँग्रेस संघटनेतील अनेक समस्या सोडविण्याचे काम सोपविले जाई. शास्त्रीजी अवघड वाटणा-या समस्या आपल्या रेशमी स्पर्शाने व मुलायम वागणुकीने सहज सोडवीत. माणसाचे मन जिंकण्याचे, ते उकलण्याचे त्यांच्याजवळ अपूर्व कौशल्य होते, तडजोडीचा मार्ग सुचवून, ती घडवून आणण्याचे कसब त्यांना साधले होते.
माणसांचा गराडा त्यांच्याभोवती सदैव असे. तासन् तास कार्यकर्त्यांशी बोलणे त्यांना जमे. त्यांच्या अडचणी, त्यांचे प्रश्न ते न कंटाळता समजून घेत. त्यामुळे कार्यकर्त्यांना शास्त्रीजी नेहमीच प्रिय असत. इतक्या मोठ्या पदावर राहूनही सामान्य कार्यकर्त्याला भेटणे हे नेहमीच त्यांना आवश्यक वाटे. सहकारी मंत्र्यांशीही ते असेच वागत. त्यांच्यावर एखादे काम सोपवले, की त्यांवर पूर्ण विश्वास टाकत. त्यांना हवे ते अधिकार देत, त्यांच्या या उमदेपणाने, मोकळेपणाने कामाला हुरूप येई. माझ्यासारख्या दरबारी वृत्ती नसलेल्या माणसालाही काम करणे सोयीचे होई.
पंतप्रधान म्हणून त्यांच्याशी आलेल्या संबंधांमुळे मला जे शास्त्रीजी दिसले, ते असे होते. त्यांचा माणुसकीचा गहिवर दिसला. त्यांचे खंबीर मन दिसले. पोलादी वृत्ती अनुभवली. अंत:करणाचा पीळ पाहिला.
आता कधी सुगंधाने मन भरावे, कधी स्नेहाने ते आर्द्र व्हावे, कधी त्यांच्या सहवासाच्या आठवणींनी उमाळा यावा, अशी ही शास्त्रीजींची मला होणारी आठवण आहे - ती मी जपून ठेवतो अत्तराच्या कुपीसारखी.