• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

ऋणानुबंध (105)

पुढे एप्रिल १९६५ पासून कच्छ-प्रकरण सुरू झाले. संरक्षण खात्याच्या धोरणाशी निगडित असे अनेक प्रश्न त्यातून उद्भवले. शास्त्रीजींचे मन कळावे, असे मला वाटत होते. याच काळात त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलणे होऊ लागले. ऑगस्ट १९६५ मध्ये परिस्थिती धोक्याच्या वळणापर्यंत पोहोचली होती. शास्त्रीजींशी केलेल्या विचार-विनिमयातून त्यांची संरक्षणविषयक मते वास्तव आहेत, देशाच्या हितासाठी धोका पत्करण्याची त्यांची मानसिक तयारी आहे आणि त्याला लागणारी कणखर मनोवृत्ती त्यांच्याजवळ आहे, याचा अनुभव मला येऊ लागला. विचारांची देवाण-घेवाण मोकळेपणाने होऊ लागली. स्वाभाविकच मी त्यामुळे निश्चिंतही झालो आणि समाधानही वाटले. कारण वेळ फार आणीबाणीची आली होती. संरक्षणमंत्री या नात्याने देशाच्या जीवनावर दूरवर परिणाम करणारे निर्णय घेण्याचे ते दिवस होते. अशा वेळी आपल्यावर पंतप्रधानांचा संपूर्ण विश्वास असणे ही त्या वेळची माझी गरज होती.

प्रत्यक्ष संघर्षाच्या काळातील आमच्या भेटी-गाठी मला नेहमी आठवतात. त्या वेळी बहुधा रोज दोनदा तरी शास्त्रीजींना मी भेटत असे, त्यांना परिस्थितीची कल्पना देत असे. आलेल्या अडचणींची, प्रश्नांची चर्चाही होई. त्यांचे मार्गदर्शन मोलाचे वाटे. 'सावधपण' (सर्वांविषयी) हे शास्त्रीजींचे वैशिष्ट्य. त्यांचा माणसांचा अनुभव मोठा, पारखही तशीच अचूक. त्यामुळे शास्त्रीजींच्या अनेक बारीक सूचना उपयोगी ठरत, त्या काळातल्या सगळ्याच आठवणी सांगणे शक्य नाही. पण एक सांगतो.

काश्मीर आघाडीवर परिस्थिती गंभीर झाली होती. मी माझ्या सचिवालयातील कचेरीत होतो. तिथे हवाई व सेना दलाचे अधिकारी माझ्याकडे घाईने आले आणि त्यांनी सांगितले,

'प्रसंग बाका आहे. शत्रू पुढे सरकतो आहे. त्याचा वेगही काळजी उत्पन्न करणारा आहे. आता त्याला अटकाव करण्याचा मार्ग एकच - आणि तो म्हणजे विमानातून बॉम्ब-फेक सुरू करणे. त्यासाठी आपली व पंतप्रधानांची संमती हवी आहे.'

ती वेळ संध्याकाळची होती. सेनापतींना माझा निर्णय अक्षरश: पाच-दहा मिनिटांत हवा होता.
क्षणभर विचार केला. निर्णय घेणे तर आवश्यक होते. पंतप्रधानांची भेट घेऊन, चर्चा करून, सर्व करावयाचे, म्हणजे त्यात अर्धा तास तरी गेला असता. तेवढा वेळही नव्हता. शेवटी विचार केला आणि सेनापतींना सांगितले.
‘Go ahead.’

हा आदेश देऊन झाल्यानंतर काही वेळाने शास्त्रीजींना भेटायला गेलो. त्याच दिवशी सकाळी मी परिस्थिती बिकट आहे, हे सांगितलेच होते. संध्याकाळी गेलो, तेव्हा मी म्हटले,
'काश्मीर आघाडीवर परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. मी आपल्या हवाई दलाला बॉम्ब-हल्ल्याचा हुकूम दिला आहे', हे सांगितले आणि शास्त्रीजींची प्रतिक्रिया पाहू लागलो.
एकच वाक्य त्यांनी उच्चारले. ते म्हणाले,
'अच्छा किया.'

मला अर्थातच फार बरे वाटले - मनावरचे मोठे ओझेही हलके झाले. कारण एक फार महत्त्वाचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मंत्रिमंडळाच्या समितीची बैठक घेऊन शास्त्रीजींनी त्यांची संमती मिळविली.