यशवंतराव चव्हाण यांचे समीक्षा लेखन आणि भाषणे ६३अ प्रकरण ७

प्रकरण ७ - शैक्षणिक व सामाजिक आशयनिष्ठ भाषणे

निबंध हा मराठी वाङ्मयप्रकार आधुनिक काळात साधारणत: इ.स. १९२६-२७ च्या जवळपास उदयाला आला. इतर वाङ्मयप्रकारांप्रमाणे हाही वाङ्मयप्रकार इंग्रजीतून मराठी आला. या प्रकारात एखाद्या विषयासंबंधी स्पष्टीकरणात्मक, विवरणात्मक लेखन केले जाते. किंवा एकाद्या विषयासंबंधी माहितीपूर्व केलेले विवेचन म्हणजे निबंध असेही म्हणता येईल. अशा स्वरुपाच्या लेखनात मतप्रचार, चर्चा, मत प्रतिपादन, माहिती विवरण, विवेचन, खंडन-मंडन इ. विविध अंगे असून निष्कर्ष काढणे व मांडणे यासारखे विविध उद्देश असतात. निबंध म्हणजे नियमांनी बद्ध असणारा लेख किंवा ज्याच्यामध्ये विषय गोवला आहे अशी रचना, असा हा मराठी गद्याचा एक उपप्रकार आहे.

निबंधात तर्कशुद्ध पद्धतीने, बुद्धीला आवाहन करणारी मते मांडली जातात. तसेच कल्पना, भावना आणि विचार यांचा स्वप्रकृतीप्रमाणे स्वच्छंद विलास निबंधात केला जातो. त्याचप्रमाणे कथित विचारांची साधार व समप्रमाणात मांडणी केली जाते. तेव्हा इतिहास, अनुभव व अवलोकन यांच्या आधारावर अशा विचारप्रधान वाङ्मयाची निर्मिती होते. म्हणून 'निंबध' हा वाङ्मयप्रकार मनोरंजनाशी कधीच निगडीत नव्हता. विचारांचे वेगवेगळे पैलू प्रकट करून वाचकांच्या जीवनादृष्टीला प्रगल्भता आणण्यासाठी निदान त्यांना विचार प्रवृत्त करण्यासाठी निर्माण झालेला हा वाङ्मयप्रकार आहे." असे डॉ. निर्मलकुमार फडकुले यांनी निबंधाबाबत आपले मत नोंदविले आहे. अशा या वाङ्मयात माहितीपर, वर्णनात्मक, निरूपणात्मक किंवा विवरणात्मक, वैचारिक, समीक्षात्मक, विश्लेषणात्मक अशआ कितीतरी रुपांचे मिश्रण असू शकते.

निबंध हा लिखित स्वरुपातील वाङ्मयप्रकार असला तरी निबंधाच्या व्याख्यांत यशवंतरावांची भाषणे चपखलपणे बसतात. कारण जसे निबंधाचे स्वरुप 'कोणालातरी उद्देशून बोलण्यासारखे' असते किंवा वाचकाला उद्देशून लेखक बोलत असतो, विचार सांगत असतो, तसे यशवंतराव हे सुद्धा श्रोत्यांना व समाजाला आपले विचार सांगतात.  निबंधात, आत्माविष्कारापेक्षा विचार प्रकटीकरणाला अधिक महत्त्व असते. यशवंतरावांच्या भाषणातूनसुद्धा 'विचारप्रकटीकरण' हा मुख्य मुद्दा व्यक्त झाला आहे. त्यामुळे या अर्थाने यशवंतरावसुद्धा मराठी साहित्यातील 'निबंधकार' ठरतात. त्यांचे निबंध साहित्य वाचताना मुळात ही भाषणे होती याची आठवणही वाचकाला येत नाही. म्हणून या भाषणांना निबंधाचा दर्जा प्राप्त झाला असे म्हणता येईल. कारण यशवंतरावांच्या वक्तृत्वशैलीत दिसणारे गुण हे निबंध लेखनासही आवश्यक असतात. उदा. आरंभ, प्रस्तावना किंवा सुरुवात, विषयाची व्याप्ती स्पष्ट करणे, विषयाचे उद्दिष्ट सांगणे, मुख्य विषयाचे विवरण करणे व त्याचे विभाग पाडणे, विषयाला पूरक असे मुद्दे उदाहरणांसह मांडत जाणे, विषयाच्या अनुरोधाने घेतल्या जाणा-या संभाव्य आक्षेपांचे खंडन करणे, आणि शेवटी निष्कर्ष काढणे, इत्यादी साम्यस्थळे दाखविता येतील. शिवाय अवतरणे, वचने, कथा, दंतकथा, इतिहासातील दाखले, विनोद, आख्यायिका यांचाही वापर निबंध व वक्तृत्वात केला जातो. साधारणत: १९५० नंतरच्या निबंधाच्या व वक्तृत्वाच्या स्वरुपात वरील मुद्दयांचा अंतर्भाव केलेला दिसतो.  मुळात वक्तृत्व शास्त्राच्या शैलीच प्रभाव निबंध रचनेवर झालेला आढळतो. याचे कारण असे असावे की, वक्तृत्वाला महत्त्व देणारी ग्रीकांची लोकशाही राज्यव्यस्था जेव्हा इंग्लंडने स्वीकारली तेव्हा विचारांच्या तर्कशुद्ध मुद्देसूद व सुस्पष्ट मांडणीला प्राधान्य मिळाले. यातूनच निबंध या वाङ्मयप्रकाराला बहर आला असावा. विशेषत: इंग्लंडमध्ये सतराव्या शतकाच्या उत्तरार्धानंतर भाषणास्वातंत्र्याची संकल्पना दृढमूल झाली. संसदेतील भाषणांवरील निर्बंध उठवले व ती भाषणे प्रभावी ठरू लागली. तसतसे वक्तृत्वशैलीतील मुद्देसूद मांडणीचे गद्यलेखन प्रभावी ठरू लागले. यशवंतरावांच्या या स्वरुपाच्या लेखनातसुद्धा मुद्देसुद मांडणी, अंत:करणाला भिडणारी भाषा, राजकीय दूरदृष्टी यांचा संगम दिसतो.