यशवंतराव चव्हाण यांचे समीक्षा लेखन आणि भाषणे-२१

नाटयविषयक विचार

यशवंतराव चव्हाण ललित लेखक म्हणून जेवढे प्रसिद्ध आहेत तेवढेच नाटककार म्हणून ख्यातनाम नाहीत. किंबहुना नाटयक्षेत्रात नाट्यकलाकृतीची निर्मिती ते करु शकले नाहीत. एवढे मात्र खरे आहे की साहित्याचे बहुतेक सगळे प्रकार त्यांनी आस्वादक पातळीवर हाताळले होते. यशवंतरावांची लोकप्रियता, विलोभनीय सामर्थ्यांचा प्रत्यय त्यांच्या वैचारिक साहित्यातून, आत्मकथनपर लेकनातून, निबंधांतून प्रामुख्याने होतो. नाटककार म्हणून ते यशस्वी झाले नसले तरी नाटकाचे रसिक, वाचक, प्रेक्षक, आणि टीकाकार या नात्याने त्यांनी केलेली कामगिरी मौलिक स्वरुपाची आहे.

यशवंतरावांच्या बालपणी अनेक श्रेष्ठ नाटककाराच्या नाटकांचा बहराचा काळ होता. रा. ग. गडकरी, श्री. कृ. कोल्हटकर हे दोघेही त्यांच्या अगोदरच्या पिढीतले श्रेष्ठ नाटककार होते. तर समकालीन नाटककारांमध्ये भा. वि. वरेरकर, मो. ग. रांगणेकर, प्र. के. अत्रे, पु. ल. देशपांडे, वि. वा. शिरवाडकर, वसंत कानेटकर, विजय तेंडुलकर असे कितीतरी दिग्गज नाटककार नाट्यलेखन करीत होते. याचा परिणाम असा झाला की यशवंतरावांच्या नाट्य अभिरुचीत वाढ झाली.

यशवंतरावांना नाट्यवाङ्मयाचे आकर्षण शालेय जीवनापासून होते ते त्यांनी 'कृष्णाकाठ' मध्ये नमूद केले आहे. नाट्यकलेला त्यावेळी त्या शहरात अगदी पोषक वातावरण होते. एक वेगळी परंपरा त्या शहराला होती. गणेश उत्सवाच्या निमित्ताने ऐतिहासिक, सांस्कृतिक नाटके सतत होत असत. या संदर्भात ते आठवण सांगतात, "नाटक कंपनीची नाटके मी मोठ्या हौसेने पाहत असे. आनंदविलास नाटक मंडळी ही आमच्या कराडला वर्ष दीड वर्षाने भेट देत असे. मास्टर दीनानाथ मंगेशकर व रघुवीर सावरकर या प्रसिद्ध नटांच्या नाटक कंपन्यांची नाटकेही कराडला होत. पिटातल्या स्वस्त तिकीटांच्या जागेत बसून मी ती सगळी नाटके मनमुराद पाहिली आहेत." यशवंतरावांना नाट्यवाङ्मयाबद्दल ममत्व कसे होते हे त्यांच्या वरील उद्घारावरुन स्पष्ट होते. यशवंतरावांनी मराठी रंगभूमीवर सुरुवातीपासून होत आलेली स्थित्यंतरे मोठ्या जिज्ञासू वृत्तीने आणि डोळसपणे पाहिली आहेत. यशवंतरावांना मराठी नाटकाविषयी, मराठी रंगभूमीविषयी कमालीची आस्था होती. आत्मीयता होती. मोठ्या अभ्यासू वृत्तीने आणि जिव्हाळ्याने मराठी नाटकांचे त्यांनी केलेले चिंतन महत्वपूर्ण आहे. यशवंतरावांना गडक-यांची नाटके अधिक आवडत होती. त्यांच्या काही नाटकांचे उतारे, संवाद, यशवंतरावांना तोंडपाठ होते.  तसा नाटकाचा जन्म मुळी नाट्य पंढरी सागंलीमध्ये झाला. यशवंतरावांचे आजोळ देवराष्ट्र हे सांगली जिल्ह्यातले.  त्यांच्या वडिलांची नोकरी विटा व नंतरचे वास्तव्य कराडमध्ये झाल्याने तेव्हाच्या विशाल सातारा जिल्ह्यात सांगली शहर होते. कृष्णकाठी नाटकाचा जन्म झाल्याने यशवंतरावांना नाटकाचा आणि आपला सुप्त संबंध असावा असे वाटते. म्हणूनच की काय त्यांना नाटकाची गोडी लागली असावी.
नाटक पाहता पाहता  नाटकात काम करावे अशी इच्छा मात्र झाली. "आमच्या शाळेच्या संमेलनातील 'माईसाहेब' या नाटकात किर्लोस्करवाडीला एक प्रयोगात मी काम केल्याचे आठवते." ही आवड यशवंतरावांनी शेवटपर्यंत टिकवून ठेवली होती. पुढे नाटक पाहण्यासाठी यशवंतराव कराडहून कोल्हापूरला जात असत. गंधर्व मंडळी, पेंढारकरांची ललित अकादमी मंडळी यासारख्या नामवंत नाटक मंडळीची नाटके त्यांनी पाहिली. पण राजकारणात सक्रिय प्रवेश केल्यानंतर वेळेअभावी त्यांचा हा छंद कमी झाला. या संदर्भात ते म्हणतात, "परंतु तोंडाला रंग लावून रंगभूमीवर येण्याची माझी इच्छा मात्र तशीच राहून गेली आहे. माझ्यासाठी परमेश्वराने कदाचित राजकारणाच्या रंगभूमीवरील भूमिका नेमून दिली असावी." पण जेव्हा जेव्हा संधी, वेळ मिळेल तेव्हा ते आवर्जून नाटक पाहात. कलेचा आस्वाद हा मानवी जीवनातील श्रेष्ठ प्रतीचा विरंगुळा असल्याचे ते सांगतात. कार्य बाहुल्यामुळे मनातील अनेक गोष्टी त्यांना पूर्ण करता आल्या नाहीत. तरीही गायन ऐकणे, नाटक पाहाणे, मित्रांच्या बरोबर गप्पागोष्टीत रात्र घालविणे यातील आनंद हा वेगळा असतो. या संदर्भात ते म्हणतात, "एखाद्या जुन्या नाटकातील पडदा वर जाऊन पेटीचे सुमधुर स्वर वातावरणात घुमू लागले किंवा सारंगीचे मृदू सूर कानी पडले की एका निराळ्या जगात आपण प्रवेश करतो. त्यावेळी आपल्या भावना कशी दोलायमान होतात त्यांचे वर्णन शब्दांनी करता येणार नाही. बालगंधर्वांची ती जुनी गाणी आठवली किंवा त्या काळातील नटश्रेष्ठांच्या अभिनय कौशल्याची नुसती आठवण आली की गोड स्मृती चाळविल्या जातात. केशवराव दाते यांच्यासारख्या कसलेल्या नटांच्या भूमिका आणि जुन्या काळातील ती भारदार नाटके, यांच्या आठवणी देखील किती सुखद वाटतात." त्या त्यांच्या वरील विचारांवरून त्यांना नाट्यवाङ्मयाचे व रंगभूमीचे किती आकर्षण होते हे स्पष्ट होते. याशिवाय जनसमुदायात बसून नाटक अथवा तमाशाची गोडी मनमुराद लुटल्याचे ते सांगतात. प्रत्यक्ष लोकांच्यामध्ये जाऊन लोकनाट्याची मौज लुटणे, नाटक पाहणे, क्रिकेटची मॅच पाहणे, कुस्त्यांची दंगल अवलोकणे यातील मौज वेगळीच असल्याचे ते सांगतात.