• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण यांचे समीक्षा लेखन आणि भाषणे- २७

साहजिकपणे उत्कट देशभक्ती हा त्यांच्या नाट्यकृतींचा स्थायीभाव झाला. त्यामुळे सहेतुकता किंवा जनजागृती हा त्यांचा अविभाज्य घटक आहे. राष्ट्रनिष्ठा व दिव्यत्वाचे दिग्दर्शन यांचा परिणाम साधणे हा त्यांच्या लेखनाचा हेतू होता. पुढे ते लिहितात, "खाडिलकर हे ध्येयवादी होते. उदात्त गुणांचे त्यांना आकर्षण होते. काही जीवनमूल्यांवर त्यांची निष्ठा होती. एक प्रकारे त्यांच्या मनाची घडण आध्यात्मिक होती. त्यांच्या नाटकातील अनेक पात्रे या गुणांचे दर्शन घडवितात. तसेच खाडिलकरांच्या सगळ्या नाटकात कै. तात्यासाहेब केळकरांनी म्हटल्याप्रमाणे 'ओज' हा गुण आहे. त्यांचे शृंगार आणि करूण रससुद्धा ओज गुणान्वित असतात व त्यामुळे त्या रसाभोवती एक प्रकारचे उदात्त वातावरण निर्माण होते." खाडिलकरांनी मुख्यत: शृंगार व करुण हे रस वापरले. प्रमुख पात्रांच्या ध्येयवादावरुन वीर रसाचा उदय आणि कांचनगड, कीचकवध, विद्याहरण, सवाई या स्वभाव व परिस्थितीप्रधान शोकांतिकेतून करुणरसांचा उत्तम हृदयस्पर्शी परिणाम साधलेला आहे, तर 'स्वयंवर' व 'मानापमाना'तील मुग्ध शृंगाररस यांची खुलावट विलक्षण आहे. महाभारताप्रमाणेच मराठ्यांच्या इतिहासातही सर्व व्यक्तिरेखांना युद्धाची पार्श्वभूमी आहे.  त्यातील शृंगार हा वीरांचा शृंगार आहे. त्यातील कारुण्य हे युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या घटनांचे आहे. युद्धामुळेच मानवी जीवनात निर्माण झालेल्या तणावांचे चित्रण करण्याचे युयुत्सूक व प्रतिभाशआली नाटककाराला वाटलेले आकर्षणच अशा नाट्यविषयांची निवड करण्यामागे असू शकते. हे यशवंतरावांचे स्पष्टीकरण फारच मार्मिक आहे. रेखीव व रसपरिपोषक नाट्यसृष्टी हीच त्यांची सर्वात मोठी शक्ती होती.

खाडिलकरांच्या एकूण पंधरा नाटकांपैकी नऊ पौराणिक, दोन ऐतिहासिक, एक कल्पनारम्य अशी आहेत. आठ नाटके संगीत व नऊ गद्य आहेत. त्यांच्या या काही नाट्यर्निर्मितीमागील हेतू व अभिप्राय यशवंतराव मोजक्या शब्दांत असा व्यक्त करतात, "कांचनगडच्या मोहनेसारखे मातृभूमीकरिता सर्वस्वाचा त्याग करण्याचा संदेश देणारे प्रभावी नाटक घ्या. जुलमी इंग्रजी सत्तेमुळे मातृभूमीची होणारी विटंबना रुपकात्मक रीतीने दाखविणारे 'कीचकवध' पहा किंवा दुफळीचे दुष्परिणाम रंगविणारे 'भाऊबंदकी' हे नाटक घ्या. सर्व नाटकांची प्रेरणा उत्कट देशभक्तीची होती हे कोणाच्याही सहज लक्षात येईल." सर्वसाधारणत: हा कालखंड मराठी रंगभूमीचा भरजरी वैभवाचा काळ मानला जातो. एक वैभवशाली कालखंड म्हणून यशवंतरावांनी या कालखंडाचा उल्लेख केला आहे. खाडिलकरांच्या काही नाटकांतील प्रमुख पात्रांचा देखील ते उल्लेख करतात.  आनंदीबाई-राघोबा, धैर्यधऱ-भामिनी, कृष्ण-रुक्मिणी यांच्यातील शूरांचा शृंगार, कौटुंबिक जीवनातील नाट्य व खलपुरुषाशी संबंध याची उदाहरणासह चर्चा यशवंतरावांनी केली आहे.

यशवंतरावांनी मराठी रंगभूमीचा इतिहास अगदी मोजक्या शब्दांत वर्णन केला आहे. महाराष्ट्रात १८८२ ते १८९८ या सोळा वर्षांच्या काळात मराठी नाटकांची वाढ झपाट्याने झाली. १८९० ते १९२० या तीस वर्षांमध्ये देवल, खाडिलकर, कोल्हटकर व गडकरी यांच्या उत्कृष्ट नाट्यकृती रंगभूमीवर आल्या. सर्वस्वी नवीन व या मातीतला असा संगीतनाटक हा नाट्यप्रकार मराठी रंगभूमीने या काळात विकसित केला. 'शारदा', 'भाऊबंदकी', 'कीचकवध', 'एकच प्याला', 'भावबंधन' अशा वेगवेगळ्या प्रकृतीची पण कसदार नाटके या काळात निर्माण झाली आणि नंतरच्या इतिहासात मानदंड ठऱली असे यशवंतराव म्हणतात. या काळात बहुजन समाजाला नाटकाशिवाय दुसरी बौद्धिक करमणूक उपलब्ध नव्हती. रंजनाचे व उद्बोधनाचे नाटक हे एकमेव असे सर्वस्पर्शी साधन होते त्यामुळे त्यावेळी विविध अभिरुचीच्या प्रेक्षकांचे रंजन करणा-या विविध दर्जाची नाटकमंडळी अस्तित्वात होती. साहजिकच कोणत्याही नव्या नाटकाला रंगभूमीवर येण्याच्या कामी फारसा प्रयत्न करावा लागत नसे. त्यांना नाटकाची गोडी लहानपणापासूनच होती. राम गणेश गडकरी या नाटककाराबद्दल व त्यांच्या नाट्यकृतीबद्दल लिहितात, "गडकरी म्हणजे मराठी रंगभूमीवरील तेजाचा तारा. 'एकच प्याला'तील सुधारकच्या पश्चातापाचा प्रवेश किंवा 'भावबंधना'तील सूडाने पेटलेल्या घनश्यामाचे पाय लतिकेला धरावे लागतात तो प्रवेश एकदा पाहिल्यावर विसरणे शक्यच नाही. गडक-यांच्या भडक पण भावपूर्ण नाटकाने लोक वेडावून गेले. मराठी रंगभूमीचा एक वैभवशाली कालखंड म्हणून याचा निर्देश करावा लागेल." गडकरी नाटककार होते. तसेच विनोदी लेखकही ( बालकराम) होते व कवीही ( गोविंदाग्रज) होते. गडक-यांची सामाजिक आणि ऐतिहासिक नाटके लिहून पुढे चालविली असा उल्लेख यशवंतराव करतात.