• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण यांचे समीक्षा लेखन आणि भाषणे- २६

रंगभूमीवर विलक्षण चैतन्य होते अशा या कालखंडातील नाटककारांबद्दल व नाटकांबद्दल यशवंतरावांनी ठळक अशा नोंदी केल्या आहेत. देवलांच्या बाबतीत ते म्हणतात, "गोविंद बल्लाळ देवल हे या काळातील नाटकांचे मुकुटमणी ! त्यांच्या सात नाटकापैकी 'झुजाररव', 'मृच्छकटिक', 'शारदा', 'संशयकल्लोळ' ही चार नाटके म्हणजे मराठी रंगभूमीवरील देदीप्यमान रत्नेच ! त्यांची बहुतेक नाटकेही भाषांतरित व रुपांतरित होती. असे असले तरी देवलांच्या प्रतिभेची ठेवण ही वास्तववादी स्वरुपाची होती. पुरोगामी विचारसरणीची, प्रभावी सामाजिक नाटकांची मूहूर्तमेढ रोवण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी केले. शारदा हे नाटक स्वतंत्र सामाजिक बालजरठ विवाहावरील, मराठी रंगभूमीच्या इतिहासातील पहिले नाटक आहे. या नाटकातील शारदेच्या पात्राबद्दल व नाटकाबद्दल यशवंतराव लिहितात, "या नाटकाचा महाराष्ट्रावर इतका परिणाम झाला की पुढे कित्येक वर्षे आपल्या मुलीचे नाव शारदा ठेवायला एकही माता धजली नाही. बालवृद्ध विवाहातील घोर अन्याय समाजाला देवलांनी 'शारदेच्या' रुपाने दाखविला. अस्सल भारतीय नाटकांचे दर्शन या कलाकृतीने लोकांना घडविले यात संशय नाही. समाजातील अबलेची करुण कहाणी शारदेच्या रुपाने दाखविली त्यामुळे या नाटकाची लोकप्रियता अलौकिक होती. देवलांच्या नाट्यकर्तृत्वाचा शेवट होत असतानाच श्रीपाद कृष्ण कोल्हटकर उदयास आले. त्यांच्या नाटकात कल्पनारम्यता, विनोदप्रवणता आणि सहेतुकता हे गुण प्रामुख्याने दिसतात. त्यामुळे त्यांच्या नाटकांनी तत्कालीन शिक्षितांची भूक भागविली. त्यांच्या कल्पनेला हसवले, खेळवले, त्यामुळे यशवंतरावांसारख्या अभिजात रसिकाला त्यांच्या नाटकाविषयी ममत्व निर्माण झाले. कोल्हटकरांनी मराठी नाटकामध्ये अनेकविध प्रकारची नवीनता आणली. सूत्रधाराचा वायफळ प्रवेश त्यांनी कमी केला. नाट्यपदे नव्या पारशी, गुजराथी चालीवर बसवली. स्वतंत्र आणि कल्पनारम्य असे नाट्यकथानक ही गोष्ट त्यांनी महत्त्वाची मानली. कल्पकता, विनोदबुद्धी, सौदर्यशक्ती, संगीतप्रेम आणि समाजचिंतन या कोल्हटकरांच्या व्यक्तिवैशिष्टयातूनच त्यांच्या नाटकांची स्वतंत्र संविधानके तयार झाली आहेत. यशवंतरावांना कोल्हटकरांच्या नाट्यप्रतिभेतील स्वतंत्र कथानकाचे वैशिष्टय लक्षणीय वाटते. त्यांच्या नाट्यकर्तृत्वाबद्दल ते म्हणतात, "कोल्हटकर म्हणजे मराठीतील विनोदाचा ओनामा ! मराठी रंगभूमीला संगीत व विनोद यांची नव्या पद्धतीने जोड करून देणे हेच त्यांच्या प्रतिभेचे कार्य. १९०० ते १९१० या दशकात मराठी रसिकांनी कोल्हटकरांची 'वीरतनय', 'मूकनायक', 'गुप्तमंजूषा', 'मतिविकार' ही नर्म विनोदाने नटलेली नाटके मोठ्या आवडीने पाहिली. एका हातात शेक्सपिअर आणि दुस-या हातात मोलिअर होऊन त्यांनी अद्भुतरम्य कथानकात हास्यरसाचा मनमुराद शिडकाव केला. कोल्हटकरांनी आपल्या नाटकांमधून सामाजिक समस्यांचे दर्शन घडवले." म्हणूनच यशवंतरावांना त्यांच्या नाटकातील सामाजिक मूल्य महत्त्वाचे वाटते. यशवंतराव रंगभूमीच्या शिल्पकारात कोल्हटकरांना स्थान देतात. त्यांच्या साहित्याला प्रधानपद देणारी यशवंतरावांची नाट्यविषयक भूमिका वरील त्यांच्या उद्गारावरुन स्पष्ट होते. यशवंतरावांनी ४३ व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनांमध्ये २५ मार्च १९६१ साली दिल्ली येथे भरलेल्या नाट्यसंमेलनात अनेक अंगोपांगाचा सविस्तर विचार केला आहे. नट, नाटककार, दिग्दर्शक, टीकाकार, प्रेक्षक नाट्यवाङ्मयातील नवे जुने प्रवाह यांचा त्यांनी समाचार घेतला आहे. १९६५ साली नांदेड येथे भरलेल्या ४७ व्या नाट्यपरिषदेमध्ये यशवंतरावांनी नाट्यवाङ्मयाचा ओझरता उल्लेख केला होता. याचबरोबर मराठी नाट्यवाङ्मयाचा थोडक्यात इतिहासही त्यांनी कथन केला. पौराणिक नाटककंपन्यांच्या निर्मितीपासून ते संस्कृत, इंग्रजीमधील भाषांतरित, रुपांतरित नाट्यवाङ्मयाची कामगिरीही त्यांनी मांडली. ऐतिहासिक नाटकांची परंपरा वि. ज. कीर्तने ( थोरले माधवराव पेशवे) पासून झाली. याचाही ते उल्लेख करतात. यावरुन त्यांचा नाट्यवाङ्मयाचा अभ्यास किती चिकित्सक आहे हे स्पष्ट होते.

काळाबरोबर उत्पन्न होणारे नवे नवे प्रश्न नाट्यरुपाने मराठी नाट्यवाङ्मयात मांडले गेले आहेत. कोल्हटकरांचे समकालीन नाटककार म्हणून नाट्याचार्य खाडिलकरांचा उल्लेख करावा लागतो. या नाटककाराने मराठी रंगभूमीचे सौंदर्य आणि सामर्थ्य वाढविले. कोल्हटकरांची नाटके सौंदर्यासक्तीतून निर्माण झाली होती. तर नाट्याचार्य खाडिलकरांची नाटके ध्येयासक्तीतून उद्भवली होती. राजकीय, सामाजिक व वैयक्तिक ध्येयांची उदात्त चित्रे त्यांनी आपल्या नाटकातून रंगवली. या नाटककारांच्या संदर्भात खांडेकर म्हणतात, "कोल्हटकर स्वभावत: सौंदर्याचे उपासक तर खाडिलकर सामर्थ्यांचे पूजक ! कोल्हटकरांना रम्यतेचे आकर्षण, खाडिलकरांना भव्यतेचे ! 'मृच्छकटिक' हे कोल्हटकरांचे आवडते नाटक उलट 'उत्तरामचरित' खाडिलकरांना फार प्रिय ! पदवीधर होताच खाडिलकर 'केसरी'त गेले. तिथे जीवनातल्या भव्यतेचे उग्रतेचे आणि उदात्तेचे चिंतन करणा-या त्यांच्या प्रतिभेचा विकास झाला." अशा नाटककारांबद्दल त्यांच्या नाटकांच्या निमित्ताने लिहिताना त्यांच्या नाटकाचे मार्मिक रसग्रहण यशवंतराव करतात. तसेच याबरोबर त्यांचे व्यक्तिमत्वही वाचकासमोर ते उभे करतात. तत्कालीन जुन्या व नव्या नाटकातील फरक ते अचूक दाखवतात. खाडिलकरांना अचूक नाट्यदृष्टी होती. नाटकांसाठी सुटसुटीत व पूर्णपरिचित अशी कथानके त्यांनी निवडली. खाडिलकरांवर त्यांच्या कर्तृत्वकाळाच्या पूर्वार्धात लो. टिळकांचा व उत्तरार्धात म. गांधींचा विशेष प्रभाव होता. त्यांच्या नाटकातूनही आपल्याला याचे दर्शन घडते. यशवंतराव चव्हाणया संदर्भात लिहितात, "नाट्याचार्य खाडिलकरांनी आपली लेखणी आणि वाणीच नव्हे तर प्रत्यक्ष जीवनही स्वातंत्र्याच्या चळवळीला वाहिले.