मुंबई
६ जानेवारी
संध्याकाळी श्री. धनंजय कीर यांची ६१वी साजरी झाली. जस्टिस वैद्य आणि पी. के. देशपांडे चांगले बोलले. धनंजय कीरही भावनापूर्ण बोलतो. दलित समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही त्यांची तीव्र तळमळ त्याने प्रखरपणे मांडली. त्याच्या सत्कारात सामील होऊन मनाला फार समाधान मिळाले.
या कार्यक्रमानंतर श्री. आदिक यांच्या निवडणुकीच्या प्रचार सभा. दंगलीचे वातावरण होते. सभा मोडणार, दगडफेक होणार अशा अफवा दिवसभर हवेत होत्या. काँग्रेसच्या प्रचाराच्या या पहिल्याच सभा. सर्वांना चिंता होती. परंतु जांबोरी मैदान (वरळी) व भोईवाडा मैदानावरील दोन्ही सभा मोठ्या होत्या. शांततेने पार पडल्या. निवडणुकीचा टेम्पो नाही. जनता अनुत्साही दिसली.
------------------------------------------------------------
१० जानेवारी
कुलाबा जिल्ह्याचे भाई शेटे भेटले. दोन डोळ्यांनी आंधळा परंतु राजकारणात फार बारकाव्याने पाहणारा लढावू कार्यकर्ता आहे. बॅ. अंतुलेमुळे कष्टी आहे. बॅ. अंतुले अतिशय रुथलेस झाला आहे. ठीक नव्हे. महाराष्ट्राच्या राजकारणात हा मनुष्य विष कालवील असे मला नेहमीच वाटत आले आहे. हुषार आहे. मुस्लीम आहे. यासाठी मला सहानुभूती होती व आहेही. परंतु आता तो वाघनखे बाहेर काढू लागलाय.
अशाही नोंदी
अजब माणूस!
श्री. फडके (य. दि.) - संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास लिहिणारे - यांचे पुन्हा पत्र आले आहे. मोठा अजब माणूस आहे! मधून मधून पत्र लिहितो की मी लिहिले आहे ते तुम्हास दाखवू इच्छितो. परंतु काय लिहिले ते कधीच दाखवीत नाही. आता त्यांचा इतिहास ग्रंथ मुंबई विश्वविद्यालयाने डॉक्टरेटसाठी मंजूरही केला आहे आणि वर लिहितो आहे की 'तुम्ही' तो पहावा. तुमची बाजू बरोबर मांडली आहे की नाही ते पहा.
इतिहास पक्षपाती लिहिण्याची एक जुनी वृत्ती महाराष्ट्रांत आहे. त्यातील हे एक दिसतात. लिहायचे ते लिहिले असणार आधीच आणि आविर्भाव आहे रामशास्त्रीय न्याय द्यावयाचा. मी त्यांना भेटीस बोलावणार आहे.
------------------------------------------------------------
मुख्यमंत्री वसंतराव नाईक दिल्लीत आले आहेत. त्यांच्याशी खूप गोष्टी झाल्या. त्यांचा अन्नप्रश्न कठीण झाला आहे. सर्व पोटनिवडणुकी हरल्यामुळे राजीनामा द्यावा असे तीव्रपणे मनात येऊन गेल्याचे बोलले.
------------------------------------------------------------
श्री. मधुकरराव चौधरी आले होते. अंदाजपत्रकाची रूपरेखा कशी असावी विचारीत होते. डॉ. मनमोहनशी तपशीलवार चर्चा केली.
------------------------------------------------------------