राजकीय पारतंत्र्याविरुद्ध उभी राहिलेली आंदोलनं याच काळात देशात पसरत होती. टिळक हायस्कूलमधील शिक्षक स्वातंत्र्योत्सुक असले तरी उघडपणे चळवळीत सहभागी होणे त्यांना परिस्थितींमुळे कठीण होते. सातारा जिल्हा हा राजकीयदृष्ट्या सदैव जागृत असलेला जिल्हा. स्वातंत्र्याची उर्मी तरुण पिढीपर्यंत म्हणजे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य शिक्षकवर्ग युक्तीप्रयुक्तीने करीत होता. बुद्धिमान यशवंताच्या मनांत या विचारांचं प्रतिबिंब उमटत राहिलं. त्याचा मूळचा पिंड खेड्यातला असला तरी बुद्धीशक्तीनं तो कराडमध्ये विद्यार्थीदशेत अंकुरला. राष्ट्रीय वृत्तीची जोपासना करणाऱ्या 'केसरी' 'ज्ञानप्रकाश' अशा वृत्तपत्रांचं वाचन, सभा, मेळावे येथील भाषणे, प्रभातफेऱ्या आणि घोषणा यातून या अंकुरातून कोंब तरारले.
ग्रामीण जीवनाविषयीची खंत या विद्यार्थ्याच्या मनांत सतत बोचत होती. विद्यार्थी म्हणून कराडमध्ये नागरवस्तीत असला तरी ग्रामीण जीवनाचा विकास हा ध्यास कमी झाला नव्हता. हा ध्यास प्रकट करण्याची संधी यशवंताला लाभली. पुणे शहरातील वक्तृत्वोत्तेजक सभेने एक वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली होती. टिळक हायस्कूलच्या या विद्यार्थ्यानं त्यासाठी नाव नोंदवलं. पुण्याला स्पर्धेत भाषण केलं. विषय होता 'खेड्यांचा विकास'. वक्तृत्व इतकं प्रभावी ठरलं की परीक्षकांनी त्याला पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक दिलं. परीक्षकामध्ये साहित्यसम्राट न. चिं. केळकर होते.
महात्मा गांधींनी सन १९३० ला कायदेभंगाची चळवळ सुरू केली. त्यावेळी यशवंत हा विद्यार्थी इंग्रजी सहाव्या इयत्तेचं शिक्षण घेत होता. कराडमध्ये सत्याग्रहाचं वातावरण मूळ धरीत होतं. त्यातून स्फूर्ती घेऊन या विद्यार्थ्यानं हायस्कूलच्या आवारातील झाडावर तिरंगा फडकावला आणि सत्याग्रहात उडी घेतली.
यशवंतानं इंग्रजी सातवी करून म्हणजे त्यावेळची मॅट्रिक होऊन मामलेदार व्हावं, किंवा मास्तरची नोकरी करून कुटुंबाला आधार द्यावा अशी त्यांच्या आईची - विठाबाईची तळमळ होती. ती बिचारी या मुलाच्या फी च्या पैशासाठी, दोन तीन आण्यांसाठी शेतात काबाडकष्ट करीत होती, चार घरातील दळणे दळत होती. जाहीरपणे तिरंगा फडकाविणे हा गुन्हा असल्यानं पोलिसांनी यशवंताला अटक केली. हायस्कूलवर तोहमत येणार असल्यानं एका शिक्षकानं फौजदाराशी रदबदली केली तेव्हा यशवंतानं माफी मागितली तर सोडून देण्याचं फौजदारानं मान्य केलं. दरमान्य यशवंताला पोलिसांनी पकडलं हे कळताच विठाबाई पोलिस ठाण्यात आली. शिक्षकांनी तिला फौजदार कसे दयाळू आहेत सांगितलं. परंतु ही माफीची तडजोड ऐकताच खेड्यातील ही अडाणी बाई शिक्षकाला रागावली. ''यशवंतानं कुणाचा खून केलाय का दरोडा घातलाय? माफी कशापायी मागायची? यशवंता, तब्बेतीला जपून रहा'' एवढं बोलून म्हातारी निघून गेली. या सत्याग्रहाबद्दल यशवंताला अठरा महिन्याची कारावासाची शिक्षा होऊन येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली. आईच्या त्या क्षणाच्या निर्णयानं राजकारणाच्या एका विश्वात यशवंताला फेकून दिलं ते निरंतरचं!