देवराष्ट्र हे त्यांचं जन्मगाव नागरी जीवनापासून दुरावलेलं, तीन-चार हजार वस्तीचं खेडेगाव. हा सारा दुष्काळी, डोंगराळ भाग. 'सोनहिरा' या लहानशा ओढ्याच्या काठावर वसलेलं हे गाव. यशवंतरावांचे वडील बळवंतराव हे एक खेड्यातले शेतकरी. एका न्यायाधिशाच्या सौजन्यानं बळवंतरावांना बेलिफाची नोकरी मिळाली. कराड या तालुक्याच्या गावात ते नोकरीवर रुजू झाले. नागरी जीवनाचा आश्रय त्यांना परिस्थितीनं करावा लागला. यशवंतरावांना नागरी जीवनाचा वरदहस्त प्राप्त झाला तो मात्र त्यांच्यावर आणि कुटुंबावर कोसळलेल्या संकटांमुळेच. यशवंत हा मुलगा चार वर्षांचा असताना वडील बळवंतराव प्लेगमुळे देवाघरी गेले. विठाबाई देवराष्ट्र येथे भावाकडेच मुक्कामाला होती. विठाबाईची चार मुलं आणि अन्य कुटुंबीय हा सारा संसाराचा गाडा ओढणं भावाच्या कुवतीबाहेरचं आहे असं पाहून विठाबाई मुलांसह पोट भरण्यासाठी कराडात दाखल झाली. बळवंतरावांची राहण्याची जागा कराडात होतीच. शाळेसाठी म्हणून विठाईनं यशवंताला भावाच्या घरीच ठेवलं. देवराष्ट्रच्या प्राथमिक शाळेत यशवंताचं चौथीपर्यंतचं शिक्षण झालं. देवराष्ट्रात पुढच्या शिक्षणाची, इंग्रजी शिक्षणाची व्यवस्था नसल्यानं त्याला कराड नगरीत आणावं लागलं. यशवंतानं इंग्रजी शिकावं असा त्याच्या थोरल्या बंधूंचा आग्रह होता. कराडसारख्या नागरी जीवनात आल्यामुळं पुढच्या टप्प्यात यशवंताला जीवन-विकासाच्या वाटा दिसू लागल्या. नागरी संस्कृतीचा लाभ मिळाला.
ग्रामीण जीवनाला नागर बनविणं, नागर संस्कृतीचा संपूर्णपणे लाभ करून देणं हे एक उच्च उद्दिष्ट ठरवून आधुनिक महाराष्ट्र विकसित भारतामध्ये अग्रस्थानी विराजमान व्हावा यासाठी यशवंतरावांनी पुढील काळात, राजकीय जीवनांत कार्यरत असताना जे निर्णय केले, निर्णयांची अंमलबजावणी केली त्याचं मूळ ग्रामीण जीवनाच्या त्यांच्या अनुभवांत असलं पाहिजे.
यशवंतराव विद्यार्थी होते, कराड येथील टिळक हायस्कूलमध्ये शिक्षण घेत होते, त्या काळात सन १९२१ च्या सुमारास महाराष्ट्रात सत्यशोधक चळवळ सुरू झाली होती. सातारा जिल्हा हे या चळवळीचं केंद्र होतं. सामाजिक परिवर्तनाचा आदेश या चळवळीनं प्रखरतेनं ग्रामीण भागात पोहोचविण्याचं कार्य केलं. ग्रामीण भागातील अज्ञान, दारिद्र्य, जातीजातींमधील श्रेष्ठ-कनिष्ठ अशी निर्माण झालेली दरी याबाबत सत्यशोधकांनी लोकजागृतीचं कार्य केलं. यशवंताच्या तरल आणि प्रत्ययशील बुद्धीवर याचा परिणाम घडला.