इतिहासाचे एक पान. ६५

यशवंतरावांचा विवाह १९४२ च्या जूनमध्ये झाला होता. पण तेव्हापासून एकसारखी धांवपळच सुरू होती. तसं पाहिलं तर यशवंतरावांनी १९४५ ते १९४६ असा एक वर्षभरच संसार केलेला दिसतो. त्या वेळीं त्यांची वकिलीहि सुरू होती आणि कुटुंबाकडेहि ते लक्ष देऊं लागले होते. याच वर्षांत त्यांना एक अपत्य झालं. सौ. वेणूबाईंनी कन्येला जन्म दिला. परंतु परमेश्वरानं या उभयतांना तेंहि समाधान फार काळ लाभूं दिलं नाही. दहा दिवसांच्या आंतच ही कन्या अनामिक अवस्थेंत देवाघरी गेली. उभयतां पति-पत्नींच्या मनावर या घटनेचा फार मोठा आघात झाला. वकील झालेला मुलगा घरचं पहायला लागला, सुनेला दिवस गेले याचं विठाईला समाधान मिळतं न मिळतं तोंच नात देवाघरीं निघून गेली. संकटाचा ससेमिरा कायमच राहिला. काळजीनं आणि मानसिक यातनेनं विठाई आता थकल्या, पण सारं दुःख पोटांत ठेवून उभं रहावं लागलं. मुलगा मिरजेला क्षयानं आजारी होता आणि धाकटीं नातवंडं, सूनबाई यांना सांभाळायचं होतं. कष्टाचं जीवन मग तसंच पुढे सुरू राहिलं. सारं कुटुंब विठाईनं आतापर्यंत सर्व प्रकारचे कष्ट करून सांभाळलंच होतं. आता पुन्हा तेंच करावं लागत होतं. गणपतरावांनी व्यापारधंद्यांत थोडंफार लक्ष घातलं, नगरपालिकेचे अध्यक्षहि झाले आणि एकूण परिस्थितीला कलाटणी मिळण्यास नुकती कुठे सुरुवात झाली होती तोंच त्यांना क्षयाची बाधा झाली. यशवंतराव वकिली करायला लागले, पण राजकीय आणि सार्वजनिक कामांतून वेळ मिळेल तेवढीच वकिली असं त्यांच्या व्यवसायाचं स्वरूप होतं. कोर्टात ते फौजदारीच्या बाजूचीं कामं घेत असत. पण वकील वेळेवर भेटतील आणि कामासाठी कोर्टात हजर रहातील अशी अशिलांना खात्री असेल, तरच अशिलं येतात. राजकीय कामासाठी अन्यत्र आणि भावासाठी मिरजेला जाणं-येणं, अशी या वकिलांची भ्रमंती सुरू असे. त्यामुळे बकिलीचा व्यवसाय यथातथाच होत राहिला. वकिलीला पूर्णपणानं यशवंतरावांनी कधी बांधून घेतलंच नाही. त्यामुळे कौटुंबिक परिस्थिति सुधारण्याच्या कामांत दोन पावलं पुढे आणि चार पावलं मागे, असाच त्यांचा जीवनक्रम सुरू होता.

कुटुंबांत संकटामागून संकटं आणि व्याप असा वाढला असतांनाच १९४६ मध्ये असेंब्लीच्या निवडणुकीचे वारे वाहूं लागले. बंधूंचा आजार आणि कुटुंबाची जबाबदारी यामुळे यशवंतराव या निवडणुकीपासून दूर होते. परंतु उमेदवार निश्चित होण्याची वेळ आली तेव्हा यशवंतरावांना कार्यकर्त्यांचा आग्रह सुरू झाला. त्यावर उमेदवारी स्वीकारण्यास त्यांनी प्रारंभींच साफ नकार दिला. गणपतराव आजारी असून त्यांची काळजी घेतली पाहिजे, कुटुंबाकडे लक्ष दिल पाहिजे असं यशवंतरावांनी मित्रांना सांगितलं आणि त्यांना परत पाठवलं; परंतु मित्रांचा आणि कार्यकर्त्यांचा आग्रह कायम होता. १९३० सालांतल्या चळवळीपासून सुरू झालेलं कार्य, आत्माराम पाटील यांची निवडणूक, बेचाळीसची ‘चले जाव’ ची चळवळ आणि जिल्ह्यांतली काँग्रेस-संघटनेची बांधणी या सर्व ठिकाणीं आघाडीवर असलेले पुढारी हेच असेंब्लीच्या निवडणुकीचे उमेदवार असले पाहिजेत हा कार्यकर्त्यांचा आणि मित्रांचा दृष्टिकोनहि योग्यच होता. हा आग्रह मान्य करण्याच्या मनःस्थितींत स्वतः यशवंतराव मात्र नव्हते. त्यांना काळजी होती गणपतरावांची आणि जबाबदारी होती सर्व कुटुंबाची. त्यामुळे ते एकसारखा नकार देत राहिले.

कार्यकर्त्यांनी अखेर मिरजेला धांव घेतली. गणपतरावांचा सल्ला यशवंतराव मान्य करतील अशी त्यंना खात्री होती. याच हेतूनं सर्व मंडळी मिरजेच्या दवाखान्यांत दाखल झाली. यशवंतराव तिथे होतेच. गणपतरावांच्या खोलीच्या बाहेर बसून मग पुन्हा चर्चा सुरू झाली. यशवंतरावांचा नकार कायम होता; इतकेंच नव्हे तर, गणपतरावांना सल्ला विचारूं नये, असंहि त्यांनी सांगितलं. आजारी अवस्थेंत गणपतराव खोलींतून ही चर्चा ऐकतच होते. अखेर त्यांनीच सर्वांना बोलावलं आणि सल्ला दिला. यशवंतरावांनी निवडणूक लढवलीच पाहिजे असं त्यांचं मत होतं. यशवंतरावांना हा सल्ला म्हणजे आज्ञाच होती. उमेदवारी निश्चित करूनच कार्यकर्ते परत फिरले. प्रारब्ध हें अनाकलनीय असतं हेंच खरं. भविष्यकाळांतील नेत्याला तें पुढे ढकलत असावं. उमेदवारी निश्चित होण्याच्या वेळीं असंच घडलं आणि निवडणुकीनंतरहि नियतीचा वरदहस्त कायम राहिला.

सातारा जिल्हा दक्षिण-मतदार संघांतून निवडणूकीला यशवंतराव चव्हाण, बाबूराव गोखले, व्यंकटराव पवार आणि कारभारी के. डी. पाटील हे चार उमेदवार काँग्रेसनं निश्चित केले होते. हे चारहि उमेदवार प्रचंड मतांनी यशस्वी झाले. कराड, पाटण, वाळवें, खानापूर, शिराळा, तासगाव असा यशवंतरावांचा मतदार-संघ होता. विरोधी बाजूनंहि उमेदवार उभे होते, पण त्यांच्यात कांही जोम नव्हता. जनतेचा पाठिंबा काँग्रेसच्या उमेदवारांनाच असायचा. काँग्रेसतर्फेच जे निवडणूक लढवत होते त्यांच्यांत फक्त अधिक मतें कोणाला मिळतात एवढाच प्रश्न होता. त्या काळांत निवडणूक ही खर्चिक बाब नव्हती. स्वतः यशवंतरावांना या पहिल्या निवडणुकीसाठी अवघे १५० रुपये खर्च करावे लागले. त्यावेळीं ते मिळवते होते, थोडीफार वकिली सुरू होती, त्या मिळकतींतूनच स्वतःसाठी त्यांनी हा खर्च केला. जिल्हा-काँग्रेसनं कांही खर्च केला असेलहि. पण उमेदवार या नात्यानं १५० रुपयांत असेंब्लीची ही पहिली निवडणूक झाली आणि यशवंतराव त्यांत यशस्वी झाले. सातारा जिल्ह्यांतील त्यांचं नेतृत्व त्यामुळे मुंबईंत पोंचलं.