इतिहासाचे एक पान. ६३

सातारा जिल्ह्यांत सर्वत्र संघटनेचं जाळं पसरलं होतंच, पण त्याची खात्री करून घेण्यासाठी, एकाच वेळीं एक विशिष्ट कार्यक्रम घडवून आणण्याचा बेत ठरला आणि त्यानुसार जिल्ह्याच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत एकाच दिवशीं चाळीस ठिकाणी दोन हजार तारा तोडण्यांत आल्या. जिल्ह्याचं संघटन किती मजबूत आहे याची प्रचीति चळवळीच्या प्रमुखांना तर यामुळे मिळालीच, शिवाय एकाच दिवशीं, एकाच वेळी संबंध जिल्ह्यांत तारा तुटल्याचं पाहून सरकारी अधिका-यांना मोठाच अचंबा वाटला. दरम्यान मुंबईहून चळवळ थांबविण्याचा निरोप पोचला होता. त्यानुसार पोलिसांसमोर हजर होण्याचे निरोप गेले आणि के. डी. पाटील. गौरीहर सिंहासने, शांताराम इनामदार, भिकू पाटील, व्यंकटराव चरेगावकर, बाबूराव नलावडे, कोणेगावकर आणि मंडळी पोलिसांसमोर हजर झाली.

१९४३ च्या सुरुवातीपासूनच सरकारनं भयंकर दडपशाही सुरू केली तेव्हा चळवळ्यांना, विशेषतः भूमिगत जिल्ह्यांत निरनिराळ्या ठिकाणीं पांगावं लागलं. कांहीजण जिल्ह्याबाहेर गेले व तिथून सूत्रं हलवूं लागले. मार्च-एप्रिलनंतर यशवंतरावहि जिल्ह्यांतून बाहेर पडले. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांचा ससेमिरा लागला होता. त्याचवेळीं
चव्हाण-कुटुंबावर एक भयंकर संकट कोसळलं. सौ. वेणूबाई तुरुंगातील यातना सहन करून परतल्या होत्या, तर गणपतराव विजापूरच्या तुरुंगांत स्थानबद्धतेंत अडकून पडले होते. घरांत फक्त विठाई होत्या. कशाच्या अधारावर जगायचं असा प्रश्न कुटुंबापुढे निर्माण झाला असतांनाच, त्याच काळांत यशवंतरावांचे सर्वांत थोरले बंधु, ज्ञानोबा यांचं १९४३ मध्ये निधन झालं. चव्हाण-कुटुंबावर आकाशच कोसळलं.

सौ. वेणूबाईंनी स्वतःच्या तुरुंगवासाचा आणि दिराच्या स्थानबद्धतेचा धक्का कसा तरी सहन केला होता; परंतु ज्ञानोबांच्या मृत्यूंन त्यांना जबरदस्त धक्का बसला. यशवंतराव सातारा जिल्ह्यांत होते तोपर्यंत मधून मधून घरी येऊन जात असत, पण त्यांनी जिल्हा सोडल्यानं आता घरी येणं बंद झालं होतं. जिवाला बेचैन करणा-या गोळीबाराच्या बातम्या रोज येत होत्या. यामुळे मानसिक ताण वाढत राहिला आणि त्या धक्क्यानं सौ. वेणूबाई आजारी झाल्या. त्या आजारीपणांत प्रकृति अधिकच ढासळत आहे असं दिसतांच माहेरच्या लोकांनी सौ. वेणूबाईंना फलटणा नेऊन औषधपाणी करण्याचं ठरवलं. चळवळ सुरू झाली तेव्हा यशवंतरावांनी सौ. वेणूबाईंना पत्र पाठवून, कराडला आपल्या घरींच रहावं असं कळवलं होतं, त्याप्रमाणे त्या राहिल्याहि होत्या, पण आताची स्थिति वेगळी होती. आजार इतका गंभीर होता की, चांगली औषध-योजना करावीच लागणार होती. माहेरची मंडळी फलटणला नेण्यासाठी आल्यानंतर सासूबाईंच्या सल्ल्यानं मग त्या फलटणला गेल्या. तिथे उपाययोजना सुरू होती, पण प्रकृति अधिकच ढासळत गेली आणि एक दिवस तर अतिशय गंभीर बनली. यशवंतराव त्या वेळी पुणें भागांत होते. पत्नी मरणोन्मुख अवस्थेंत फलटणला आहे असा त्यांना निरोप मिळाला आणि पतीला अखेरचं पहावं अशी सौ. वेणूबाईंची इच्छाहि समजली. हा निरोप मिळतांच मग यशवंतरावांनी फलटणला जाण्याचं ठरवलं आणि पुण्याहून निघून रात्रीच्या वेळीं एक दिवस ते फलटणला पोंचले. पत्नीला भेटायचं आणि बाहेर पडायचं असा बेत होता.

त्या रात्री सौ. वेणूबाई अधिकच अत्यवस्थ झाल्यानं, ती रात्र तिथेच काढावी असा घरांतल्या लोकांचा आग्रह झाला. एक रात्र तिथे काढाली तर वेणूबाईंच्या प्रकृतिला उतार पडेल, असंहि त्यांना सांगण्यांत आलं. तसा आग्रहहि झाला. त्यामुळे मन द्विधा अवस्थेंत पडलं. पण अखेर हिय्या करून त्यांनी तिथे रात्रीं थांबण्याचं ठरवलं अन् नेमका इथेच घोटाळा झाला. रात्र सरली आणि पहाटेच दारावर थाप पडली. एक पोलिस-अधिकारी पकडण्याच्या तयारीनिशी आले होते. भूमिगत अवस्थेंत राहून चळवळ्यांना मार्गदर्शन करणारे, चळवळींची आखणी करणारे यशवंतराव विश्वासघातानं पकडले गेले. बक्षिसाच्या आशेनं त्यांच्याच एका नातेवाईक पोलिस-अधिका-यानंच त्यांना हा दगा दिला होता. १९४३ च्या मे महिन्यांत यशवंतराव गजाआड गेले. सौ. वेणूबाईंना अत्यावस्थेंत ठेवूनच त्यांना तुरुंगाची वाट चालावी लागली.