इतिहासाचे एक पान. ४८

तरी पण यशवंतराव हे त्या वेळी वैचारिक द्वंद्वांत सापडलेले आढळतात. टिळक, गांधी, नेहरु, मार्क्स, रॉय, म. फुले, शाहूमहाराज या सर्वांच्या राजकीय आणि सामाजिक विचारांचा संयोग त्यांच्या मनांत झालेला होता. ब्रिटिशांविरुद्ध देशांत निरनिराळ्या प्रातांत जे सशस्त्र उठाव सुरु झाले होते, त्याचाहि परिणाम यशवंतरावांच्या तरुण मनावर झालेला असल्यास नवल नाही. श्री. तात्याराव सावरकर यांचं 'माझी जन्मठेप' हें पुस्तक त्यांनी वाचलं होतं. सावरकरांच्या सशस्त्र क्रांतीच्या विचारसरणीबाबत त्यांच्या मनांत आदर होता. हा आदर मनांत बाळगूनच १९३० सालीं यशवंतराव हे आपले एक मित्र श्री. राघुअण्णा लिमये यांच्या समवेत सावरकरांना भेटण्यासाठी रत्नागिरीलाहि गेले होते. १९२० नंतर काँग्रेसला जें नवं स्वरुप प्राप्त झालं होतं त्यामध्ये ते स्वत: कार्य करत होते. श्रीमंत आणि सुशिक्षित वर्गापुरत्या मर्यादित असलेल्या लोकशाहीवादी काँग्रेसमध्ये आता गांधींच्या प्रेरणेनं शेतकरी, मजूर आदि बहुसंख्येनं आले होते आणि संघटना मजबूत होऊ लागली होती. 'आहे रे ' आणि ' नाही रे' या वर्गांतल्या 'नाही रे ' वर्गाला शाहूमहाराजांच्या विचारसरणीचा आणि त्यांना प्रत्यक्ष संधि मिळवून देण्याच्या कृतीचा आधार लाभला होता. एका दृष्टीनं यशवंतराव ज्या सामाजिक आणि राजकीय क्रांतीचा विचार मनांत बाळगून होते त्याला अनुकूल वातावरण निर्माण होण्याला गति मिळाली होती. अशा परिस्थितींत, निश्चित ध्येय गाठण्यासाठी रॉय यांच्या मार्गानं झेप घ्यायची की गांधी-नेहरुंच्या मार्गानं झेप घ्यायची, अशा प्रकारच्या मनाच्या द्विधा अवस्थेच्या टोकावर ते आता उभे होते. कोणत्या मार्गानं सामाजिक हित अधिक साध्य होऊं शकेल याचा विचार मनाशीं चालला होता, पण मनानं गांधी-नेहरुंच्या वाटेनं जाण्याचाच कौल दिला.

यशवंतरावांच्या मनांत समाजवादाचं, लेनिनवादाचं आकर्षण निर्माण झालं होतं. त्यांचे एक कम्युनिस्ट मित्र श्री. विष्णुपंत चितळे यांच्याशीं रात्र-रात्र चर्चा करून त्यांनी मार्क्स समजावून घेतलेला होता. परंतु यशवंतरावांच्या स्वभावाची घडण अशी की, त्यांनी आपलीं मतं कधी एकांगीं बनवली नाहीत. अमका एक कांही म्हणतोय म्हणून त्याच्यामागे जायचं अशी सवय आपल्या मनाला त्यांनी लावून घेतलेली नसल्यानं, एखाद्या व्यक्तीला बांधून घेऊन ते कधी चाललेले नाहीत. राजकारणांत त्यांना कुणी गुरुपद चिकटवण्याचा, ते अमक्यातमक्याच्या सल्ल्यानं राजकारणांतले निर्णय करतात असं भासवण्याचा प्रयत्न होत असतो, पण ते स्वत: याच्याशीं सहमत नाहीत. अमके गुरु आणि आपण त्यांचे शिष्य, असं त्यांनी कधी मानलेलं नाही. प्रत्येक प्रश्न आणि त्या वेळची परिस्थिती यांचा मेळ घालूनच निकाल घ्यायचा अशी त्यांची पद्धत. रॉय यांच्या विचारांचं आकर्षण त्यांना होतं; परंतु प्रत्यक्ष लढा सुरु झाला, युद्ध सुरु झालं त्यावेळी रॉय हे त्यांच्या मनांतल्या क्रांतीच्या कल्पनेची अंमलबजावणी करण्याऐवजी ब्रिटिशांना सहकार्य केलं पाहिजे असं म्हणूं लागले. रॉय यांचं म्हणणं असं होतं की, फॅसिझम हें मुख्यत: कम्युनिझम गाडण्यासाठी उगारलेलं अस्त्र आहे आणि इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी यांच्यांतील युद्ध म्हणजे इतिहासांतील एक अपघात आहे. याचा परिपाक, जर्मनीला केव्हा ना केव्हा कम्युनिझमविरुद्ध हल्ला करावा लागणारच आहे. वस्तुत: फॅसिझम विरुद्ध लोकशाही असाच लढा होण्याची गरज आहे. म्हणून लोकशाहीच्या बाजूला म्हणजेच ब्रिटिशांच्या बाजूला आपण असलं पाहिजे. रॉय यांची तात्त्विक बाजू ही अशी होती. आंतरराष्ट्रीय परिस्थितीच्या संदर्भांत तें बरोबर होतं हे पुढच्या काळांत सिद्ध झालंहि. कारण पुढे जर्मनीनं रशियाविरुध्द आक्रमण केलंच. यशवंतराव आणि त्यांच्याबरोबरचे कार्यकर्ते विचार करत होते तो वेगळा होता. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यलढ्याच्या संदर्भांत यशवंतराव त्याचा अर्थ लावत होते; कारण या लढ्यांतले ते शिपाई होते. त्यामुळे ज्या विचाराकरिता यशवंतरावांना रॉय यांचं आकर्षण होतं त्याला रॉय यांच्या ब्रिटिशधर्जिण्या विचारानं धक्का दिला व त्यांतूनच त्यांनी रॉय यांच्याबरोबर रहायचं नाही असा निर्णय केला. संघर्ष झाला तो विचारांचा आणि रॉय यांनी पाय मागे घेतला म्हणून ! रॉय यांच्या विचाराला घाबरल्यामुळे यशवंतराव त्यांच्यापासून दूर झाले असं
नव्हे. ज्या विचारांच्या आकर्षणानं ते रॉय यांच्या गोटांत सामील झाले होते, त्या विचारांची अंमलबजावणी करण्याची वेळ आली असतांना, त्याला बाध आला, रॉय हे केवळ बुद्धिवादी विचारमंथन करत राहिले म्हणून !

या दोघांचे मार्ग वेगळे झाले तरी लक्ष्मणशास्त्री जोशी, ह.रा. महाजनी, वामनराव कुलकर्णी, व. भ. कर्णिक, आत्माराम पाटील, अनंतराव भोसले अशी कांही मंडळी रॉय यांच्याबरोबरच राहिली. रॉय हे आपल्या विचाराशीं घट्ट होते. त्यांतून त्यांनी पुढे रॅडिकल डेमोक्रॅटिक पक्ष जन्मास घातला. या पक्षातर्फे पुढे प्रांतीय व केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निवडणुकीसाठी उमेदवारहि उभे केले; पण त्यांत त्यांना यश आलं नाही. सातारा जिल्ह्यांत रॉय यांचा हा नवा पक्ष रुजला नाही. स्वातंत्र्यापर्यंत निष्क्रिय अवस्थेंत कसा तरी तो टिकून राहिला आणि स्वातंत्र्यानंतर १९४८ सालांत अखेर हा पक्ष विसर्जित झाला. राहिले फक्त रॉयवादी - चिकित्सक पद्धतीनं केवळ विचार करणारे.