इतिहासाचे एक पान. ३९

कराड कृष्णाकाठावरील वाळवंटांत होणा-या सभा यशवंतराव ऐकत होते. विद्यार्थिदशेंत असलेलं त्यांचं त्या वेळचं वय सभेंत व्यक्त होणारे विचार समजून घेत असतांनाच, सामाजिक परिस्थिति बदलण्याच्या भावनेशीं त्याची सांगड कशी घालावी याचं चिंतनहि सुरु राहिलं. राजकीय स्वातंत्र्य तर आवश्यकच होतं, पण सामान्य जनतेला जरुरी होती आर्थिकदृष्ट्या बंधमुक्त होण्याची. काँग्रेस-अंतर्गत निर्माण होणा-या डाव्या विचारसरणीनं, त्यांचं लक्ष त्यामुळेच वेधून घेतलं. समाजवादी पक्षाच्या स्थापनेच्या कामांत प्रारंभीच्या काळांत ते सहभागी झाले ते यामुळेच होय.

१९३४ सालीं मॅट्रिक झाल्यापासून तो १९३८-३९ पर्यंतचा म्हणजे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करुन पदवीधर बनण्यापर्यंतचा यशवंतरावांचा काळ हा मोठाच वैचारिक संघर्षाचा आणि धामधुमीचा काळ आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्रांत अनेक घटना घडत राहिल्यानं त्यांचा अन्वयार्थ लावण्यांतच त्यांचा हा काळ गेला. महाविद्यालयीन शिक्षण सुरु होतं, जिल्ह्यांत काँग्रेस-पक्ष-बांधणीचं कामहि सुरु होतं आणि राजकीय वैचारिक घडणहि सुरु राहिली होती. १९३४ ते ३७ ही तीन वर्षं सार्वजनिक आणि शैक्षणिक कामांतली त्या दृष्टीनं त्यांच्या जीवनांतलीं महत्त्वाची वर्षं ठरलीं. १९३२ सालीं तुरुंगांत आणि बाहेर आल्यावर मनावर समाजवादी संस्कार घडले होते. वाचन वाढलं होतं. निरनिराळ्या नेत्यांशी आणि सभोवतालच्या लोकांशी संबंध वाढले होते आणि कराडची मर्यादा ओलांडून त्यांचं कार्यक्षेत्र हें सातारा जिल्हा बनलं होतं. वाचनाला आणि विचाराला अनुभवांचं कोंदण लाभलं होतं. विचाराला रेखीवपणा प्राप्त होऊं लागला होता.

राजकीय चळवळीच्या दृष्टीनं यशवंतराव वैचारिक संघर्षांतून जात असतांनाच त्यांचे मित्र त्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेण्याचा आग्रह करत होते. खरं म्हणजे १९३३ मध्ये ते तुरुंगांतून बाहेर आले तेव्हा आपली राजकीय वाटचाल मनाशीं निश्चित करुनच ते आले होते. एका निश्चित ध्येयासाठी आयुष्य अर्पण करायचं हा विचार मनांत पक्का रुजला होता. मित्रांचा आग्रह तर महाविद्यालयीन शिक्षण घ्यावं असा होता त्यामुळे मग महाविद्यालयीन शिक्षण तर घ्यायचं आणि तें करतांना मूळ ध्येय कायम ठेवून, त्या ध्येयाकरिताच शिक्षण पूर्ण करायचं असा निर्णय त्यांतून घडला. मित्रांच्याच साहाय्यानं ते अखेर महाविद्यालयीन शिक्षणासाठी कोल्हापूरला दाखल झाले. कोल्हापूरचं वातावरण त्या वेळीं शैक्षणिकदृष्ट्या भारलेलं होतं. राजर्षि शाहू महाराज यांची शिक्षणाविषयीची विशिष्ट दृष्टि होती. विशेषत: समाजांतल्या दुर्बळ घटकांसाठी त्यांनी कोल्हापूरला शैक्षणिक क्षेत्र उपलब्ध करुन दिल्यानं, त्या काळांत अनेक तरुणांना त्याचा लाभ झाला. यशवंतरावांना हें माहीत होतं, परंतु मन राजकीय चळवळीच्या क्षेत्राकडे ओढ घेत असल्यामुळे, कॉलेजमध्ये जावं आणि शिकून मोठं व्हावं, असं प्रलोभन राहिलं नव्हतं. कोल्हापूरला कॉलेजमध्ये जाण्यांत प्रामुख्यानं आर्थिक अडचण जाणवतच होती; परंतु यशवतरावांच्या आयुष्यांत योगायोगाचे अनेक क्षण आले. ज्या घटनांचे संदर्भ सामान्यत: जुळवतां येत नाहीत, अशा अनेक घटना त्यांच्या जीवनांत घडून गेल्या आहेत. हे योगायोग ऊन-पावसाचे आहेत. त्यांच्याकडे नंतरच्या काळांत पहातांना, पहाणाराला तो ऊन-पावसाचा खेळ रम्य वाटतो. पण त्या विशिष्ट वेळीं जो प्रत्यक्षांत उन्हानं होरपळत असतो त्यालाच त्या संकटांची चव कळत असते. अदृष्टांतील शक्ति माणसाचं जीवन असंच मागेपुढे खेचत असते ही वस्तुस्थिती निर्विवाद मानावीच लागते. कॉलेजमध्ये दाखल होण्याबद्दल त्यांचं मन हेलखावे खात होतं. मन चळवळीकडे ओढलं जात होतं आणि मित्रांची इच्छा त्यांनी शिक्षणासाठी कोल्हापूरला जावं अशी होती. अन् एक दिवस त्यांचे एक मित्र श्री. गौरीहर सिंहासने घरीं आले ते यशवंतरावांना कोल्हापूरला नेण्याच्या तयारीनंच. त्यांच्याबरोबर यशवंतरावांना मुकाट्यानं जावं लागलं. मग कोल्हापुरांत फी, पुस्तकं आणि इतर खर्च या सर्वांनी मित्रांनी तरतूद केली. कॉलेजमध्ये दाखल होण्याचा तो क्षण यशवंतरावांच्या मनांत कायमचा कोरला गेला आहे. मनुष्याच्या ठिकाणीं कृतज्ञता-बुद्धि निर्माण होते आणि मनांत कायमची रहाते ती अशा एखाद्या सजीव क्षणामुळेच ! कर्तृत्वानं, कीर्तीनं कितीहि तो मोठा झाला तरी ज्या दरवाज्यांतून तो प्रथम आंत शिरला, त्याला तो विसरुं शकत नाही. मनातूंन कधीहि न पुसला जाणारा कृतज्ञतेचा धडा त्या एका क्षणानं यशवंतरावांना शिकला तो निरंतरचा !