इतिहासाचे एक पान. ३८


-------

१९३० च्या असहकारितेच्या चळवळींत भाग घेऊन यशवंतराव तुरुंगांत गेले त्यावेळीं ते मॅट्रिकच्या वर्गांत होते. अठरा वर्षांचं वय. सत्याग्रह, प्रभातफे-या यांनी वातावरण भारावून गेलेलं होतं. म. गांधींच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय चळवळीला उधाण आल होतं. काँग्रेसमध्ये सातारा जिल्ह्यांत त्या वेळीं जे नेते होते त्यांच्यासमोर ब्रिट्रिशांचं राज्य देशांतून नष्ट करणं ही एकमेव भावना होती. काँग्रेसच्या वरिष्ठ गोटांत देशाच्या पातळीवरहि याच विचारांचा पगडा होता. परंतु त्याच वेळीं सामान्य माणसाच्या जीवनांत आणि आर्थिक परिस्थितींत क्रांति घडवण्याचा, राजकीय स्वातंत्र्याचा खोल आशय या चळवळींत निर्माण करण्याचा विचार काँग्रेसमधील तरुणवर्गांत बळावत राहिला होता. हा नवा विचार हृदयांत बाळगणा-यांचा गट तसा लहानच होता. यशवंतराव हे या नव्या विचाराचा आशय मनांत बाळगणा-यामध्ये होते. सामान्य लोकांचं जीवन त्यांच्यासमोर होतं. त्यांनी तें जन्मापासून अनुभवलेलं होतं. तें जीवन अधिकाधिक गतेंत जात होतं. या लोकांच्यासाठी, त्यांना सामाजिक आणि आर्थिक न्याय मिळवून देण्यासाठी, कांही तरी केलं पाहिजे या विचाराचा पगडा त्यांच्या मनावर होता आणि त्यांतूनच त्यांची पावलं शाळेकडे जाण्याऐवजी प्रभातफेरीकडे वळली. त्यांतूनच त्यांना पहिला शिक्षा फर्मावली गेली आणि शिक्षणाच्या मार्गानं धांवणा-या जीवनाचा सांधाच बदलला. ही शिक्षा भोगून बाहेर येण्यास १९३१ साल उजाडलं. तुरुंगांतून मुक्त झाल्यानंतर वस्तुत: पुन्हा शालेय जीवन सुरु व्हायचं; पण तुरुंगांतून बाहेर येतांना चळवळीच्या विचाराचा पगडा मनावर कायमचाच राहिला. किबहुना ते विचार अधिक जोरानं वाहूं लागले आणि त्यांतूनच १९३२ सालीं म्युनिसिपालिटीवरील झेंडावंदन आणि बुलेटिन्स वांटणं यांत आघाडीवर राहून पुन्हा तुरुंगाची वारी करण्याचा प्रसंग आला. मॅट्रिकची परीक्षा तेव्हाहि हुकली. सहावी इयत्तेची परीक्षा त्यांनी दिली होती आणि उत्तीर्णहि झाले होते, पंरतु मॅट्रिकला बसून ती परिक्षा पदरांत पाडून घेण्यातं नंतरची दोन-तीन वर्षें तुरुंगाच्या वा-यांमुळे हातची गेलीं. दुसरी शिक्षा संपवून ते बाहेर आले तेव्हा १९३३ साल अर्धं संपलं होतं. तरी पण सहावी इयत्ता झालेली असल्यामुळे वर्षाच्या मध्यावर येऊनहि शिक्षकांनी त्यांना मॅट्रिकच्या वर्गांत दाखल केलं; आणि मग अभ्यासाला सुरुवात झाली. मॅट्रिकला बसून, ते परीक्षा उत्तीर्ण
झाले तेव्हा १९३४ साल उजाडलं होत.  मॅट्रिक होण्यासाठी १९३० ते १९३३ अशीं तीन वर्षं गेलीं, पण हीं तीन वर्षं यशवंतरावांच्या दृष्टीनं वाया गेलेली नव्हतीं. मॅट्रिक उत्तीर्ण होण्यास वयाची २१ वर्षं झाली. पण राजकीय विचारबंधाच्या दृष्टीनं हा काळ अतिशय महत्त्वाचा ठरला. तुरुंगांत असतांना अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या गाठीभेठी झाल्या. त्यांच्या संगतींत विविध राजकीय प्रवाहांचं वाचनहि घडलं. काँग्रेस-अंतर्गत समाजवादाचे विचार त्या काळांत जोर धरुन उठले होते. १९३३ सालीं यशवंतराव तुरुंगांतून सुटून आले आणि १९३४ सालीं मॅट्रिक झाले त्या वेळीं तर समाजवादी पक्षाची स्थापना करण्याची चर्चाच सर्वत्र चालली होती. काँग्रेसमधील उजव्या गटांतील नेत्यांच्या धोरणांतील प्रतिगामी प्रवृत्तींना विरोध करण्यासाठी म्हणून काँग्रेसशी निगडित असलेला एक गट त्यांतून तयार झाला होता.

राष्ट्रीय पातळीवर जयप्रकाश नारायण, आचार्य नरेंद्रदेव, युसुफ मेहेरअल्ली, अच्युतराव पटवर्धन, एस्. एम्. जोशी, ना. ग. गोरे आदि मंडळींनी समाजवादी पक्षाला निश्चित बैठक तयार केली होती. काँग्रेसचे हे सर्व निष्ठावंत कार्यकर्ते होते आणि राष्ट्रीय चळवळींत भाग घेणारे होते. त्यांनी दीर्घकाळ तुरुंगवासहि भोगला होता. जनमानसांत त्यांचं विशिष्ट असं प्रतिबिंबहि तयार झालं होतं आणि यांतील महाराष्ट्रीय कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र-काँग्रेसमध्ये, आपली प्रतिष्ठा निर्माण केली होती. श्री. एस्. एम्. जोशी, गोरे, शिरुभाऊ लिमये हे त्यांतील प्रमुख होते. काँग्रेसमधील कांहीजण या डाव्या विचारसरणीकडे झुकले, त्यांनी तें ध्येय मानलं, पण त्याचबरोबर फक्त 'भारतीय स्वातंत्र्य' या विचारावर आणि ध्येयावर स्थिर झालेले निर्भेळ गांधीवादीहि काँग्रेसमध्ये बहुसंख्येनं होते. महात्माजींनी त्यांना भारतीय स्वातंत्र्याच्या ध्येयाशीं जखडून ठेवलं होतं. स्वातंत्र्याशिवाय अन्य कोणत्याहि गोष्टीचा विचार त्यांच्यासमोर नव्हता. अशा प्रकारे त्या काळांत स्वातंत्र्याच्या ध्येयाप्रत जाण्यासाठी कोणत्या मार्गानं जायचं याबाबत वैचारिक मतभेद निर्माण होत राहिले.