थोरले बंधु ज्ञानोबा हे नोकरीचं चाकोरीचं जीवन जगणारे होते, पण गणपतरावांचं तसं नव्हतं. अवतीं-भवतीं घडणा-या घटनांचं त्यांना आकर्षण असे. आपला समाज गरीब, अडाणी, मागासलेला आहे, शिक्षण नसल्यामुळे त्यांना नोक-यांत संधि नाहीं हें त्यांना समजत होतं. नोक-यांची आणि मोठेपणाची मक्तेदारी एक विशिष्ट वर्गानं स्वत:कडे घेतली आहे आणि हा वर्ग गरिबांच्या गरिबीचा फायदा घेऊन त्याची पिळवणूक करतो याबद्दल त्यांच्या मनाला यातना होत असत. शहरांतल्या बहुजन समाजापेक्षाहि खेड्यांतल्या समाजाचं जीवन पूर्णपणें निस्तेज होतं. महात्मा फुले यांची सत्यशोधक-समाजाची चळवळ त्या काळांत सुरु होती. या चळवळीनं गणपतरावांच्या मनाची पकड घेतली आणि ते या चळवळीचे प्रभावी कार्यकर्तेंच बनले. जेधे जवळकर, भास्करराव जाधव हे या चळवळीच्या आघाडीवर होते. कराडमध्ये त्या काळांत श्री. कळंबे गुरुजी हे चळवळीचं काम मोठ्या जोमानं करीत असत. गणपतराव हे त्यांचे शिष्यच बनले. या चळवळीचा प्रचार आणि प्रसार करण्याच काम त्यांनी धडाक्यानं केलं.
यशवंतरावांनी या चळवळींत आघाडीवर राहून काम करावं असा गणपतरावांचा प्रयत्न असे. पण यशवंतराव हे अभ्यास आणि अभ्यासव्यतिरिक्त अन्य वाचन यांत गढलेले असत. लहानपणीं वाचन बसण्याशिवाय यशवंतरावांनी घरांतलं अन्य काम असं कांही कधी केलं नाही. सत्यशोधक-चळवळीचं वाङ्मय त्या काळांत प्रसृत होत असे. इतर कुठले तरी ग्रंथ वाचण्यापेक्षा या चलवळीचीं पुस्तकं वाच असा गणपतरावांचा यशवंतरावांच्यामागे लकडा असे; पण यशवंतराव त्याकडे दुर्लक्ष करीत. घरांत आणि अवती-भवती सत्य-समाजाची चळवळ वाढत होती. पण यशवंतरावांना तिचं कधी आकर्षणच वाटलं नाही. गणपतरावांच्या आग्रहाखातर त्यांनी मग, श्री. पंढरीनाथ पाटील यांनी त्या वेळीं लिहिलेल्या, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या चरित्राचं वाचन केले. सत्य-समाजाच्या सभा जिथे होत, तिथल्या कांही सभांना उपस्थित राहून, सभेंतली भाषणंहि त्यांनी ऐकली. या भाषणांतून ब्राह्मण समाजावर कडक. प्रसंगी निरर्गल टीका असायची. या भाषणांनंतर मग दोघा बंधूमध्ये वाद होत असत. यशवंतरावांचं म्हणणं केवळ टिका करण्यानं आणि अद्वातद्वा बोलण्यानं समाजाची सुधारणा होणार नाही. त्याकरिता प्रत्यक्ष शिक्षणाचं बोट धरलं पाहिजे. समाजानं शहाणं बनलं पाहिजे. सत्य-समाजाच्या लोकांनी विधायक दृष्टिकोनांतूनच समाजांत जागृति करणं शेवटीं समाजाच्या कल्याणाचं ठरणार आहे, असे वाद नेहमीच घडत; पण यशवंतरावांना सत्य-समाजाच्या दावणीला बांधण्यांत गणपतरावांना यश कांही आलं नाही.
सत्य-समाजाच्या चळवळीमुळे गणपतरावांना जी नवी दृष्टि प्राप्त झाली, त्यामुळे आपण आपली परिस्थिती बदलण्यासाठी कांही तरी करावं या त्यांच्या पूर्वीच्या विचाराला बाळसं प्राप्त झालं.त्यांचे एक मित्र होते श्री. बाबूराव डुबल. त्यांच्याशीं त्यांनी याबाबत चर्चा केली आणि निष्कर्ष असा ठरला की, मध्यप्रदेशांत पडीक जमीन बरीच आहे, तिथे जाऊन आपण उत्तम शेती करावी. जमीन लागवडीखाली आणावी. विचार पक्का झाल्यानंतर तयारी सुरु झाली आणि श्री डुबल यांनी पैशाची जमवाजमव करुन निघण्याचं निश्चित झालं.त्याप्रमाणे डुबल व गणपतराव पडीक जमिनीच्या शोधांत निघाले. मध्यप्रदेशांत इंदूर राज्यांतील गरोठ या गावीं अशी जमीन त्यांना शोधाअंतीं सापडली व मग तिथे दोघांनी मिळून शेतीचा व्यवसाय आरंभिला. ठरलं होतं तें असं की, डुबल यांनी भांडवल-गुंतवणूक करायची, गणपतरावांनी कष्ट करायचे व त्याच्या मोबल्यांत त्यांना उत्पन्नाचा चौथा हिस्सा द्यायचा. काम सुरु झालं, जमीन लागवडीखालीहि आली; परंतु सात-आठ महिन्यांनंतर एक दिवस डुबल हे गरोठ येथून बाहेर पडले.