इतिहासाचे एक पान. १३७

सार्वत्रिक निवडणुकींत मुंबई प्रदेश-काँग्रेसला हादरा बसल्यामुळे निवडणुकीचे बादशाहा समजले जाणारे स. का. पाटील हेहि गडबडले होते. मग त्यांनी महाराष्ट्राच्या प्रश्नाचा पुनर्विचार केला जावा यासाठी पं. नेहरूंकडे रदबदली सुरू केली. स. का. पाटील यांनीच पवित्रा बदललेला पाहून पंडितजींना आश्चर्य वाटलं. पाटील यांच्या मनांत आणि विचारांत पूर्णत: बदल घडून आला होता हें काम सिद्ध करणं कठीण आहे, परंतु द्वैभाषिकासंबंधांत काँग्रेस-श्रेष्ठांनी पुनर्विचार केल्याशिवाय महाराष्ट्रांतल्या मतदारांना काँग्रेसच्या बाजूनं वळवतां येणार नाही हें त्यांना उघड दिसत होतं. द्वैभाषिकासंबंधांत कांही निर्णय करायचा तर योग्य वेळींच केला जावा असं त्याचं मत होतं. कारण त्यांच्यासमोर १९६२ च्या सार्वत्रिक निवडणुका होत्या. त्यापूर्वी हा निर्णय व्हावा हा त्यांचा दृष्टीकोन असला पाहिजे. महाराष्ट्राला न्याय मिळवून दिला पाहिजे यापेक्षा निवडणुकीचा फड जिंकणं ही त्यांची व्यावहारिक आच होती. स. का. पाटील यांच्या मन:स्थितींत झालेला बदल पं. नेहरूंच्या दृष्टीनं अर्थातच सोयीचा होता.

पं. नेहरूंनी द्वैभाषिकाचा पुनर्विचार करण्यासंबंधीचा प्रश्न उपस्थित केला आणि यशवंतराव चव्हाण यांच्या मताचा प्रथम अंदाज घेतला तो अखिल भारतीय काँग्रेसच्या हैदराबादच्या अधिवेशनांत २४ ऑक्टोबर १९५७ ला. त्यापूर्वीं वृत्तपत्रातूंन मत प्रदर्शन होत राहिलं होतं, तरी पंडितजींनी सप्टेंबर व ऑक्टोबर हे दोन महिने, महाराष्ट्र प्रदेश-काँग्रेसच्या नेत्यांना आपल्या विचाराचा थांगपत्ता लागू दिला नव्हता. १९६२ च्या निवडणुकांना अद्याप बराच अवधि असल्यामुळे या प्रश्नाबाबत घाईनं निर्णय करावा अशी पंडितजींची मन:स्थिति नव्हती.

पंडितजींच्या औरंगाबाद येथील भाषणानंतर भाऊसाहेब हिरे यांनी त्यांना पत्र लिहून नव्या हालचालींच्या संबंधांत विचारणा केली; परंतु चार-पांच आठवड्यापर्यंत पंडितजींनी त्यांना या पत्राचं कांहीच उत्तर पाठवलं नाही. वस्तुत: पत्राचीं उत्तरं पंडितजींकडून तातडीनं रवाना केलीं जात असत; परंतु या खेपेला त्यांनी मौन पाळलं; आणि नंतरहि हिरे यांना जें पत्रोत्तर मिळालं त्यामध्ये संयुक्त महाराष्ट्र समिति आणि महागुजरात जनता-परिषद यांनी केलेल्या आंदोलनाच्या मार्गाबद्दल नापसंती आणि मुंबई द्वैभाषिक राज्याचं महत्त्व याचाच फक्त उल्लेख केला. गो. ह. देशपांडे यांनी याच वेळीं द्वैभाषिकाचे दोन तुकडे करावेत अशी मागणी एका निवेदनाद्वारे केली. देशपांडे हे हिरे यांच्या खास विस्वासांतले असल्यामुळे त्यांचं निवेदन प्रगट होऊन त्याला भरपूर प्रसिद्धि लाभतांच, देशपांडे यांचं निवेदन म्हणजे द्वैभाषिकाचे नेते यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वालाच शह देण्याचा उद्योग आहे, असा त्याचा अर्थ लावला गेला. इतकंच नव्हे तर, देशपांडे हे पक्ष-शिस्तीचा भंग करत आहेत असं वादळ उठलं. नाशिक जिल्हा-काँग्रेसनं मात्र देशपांडे यांनी महाराष्ट्राच्या भावना मोकळेपणानं व्यक्त केल्याबद्दल त्यांचं अभिनंदनच केलं. महाराष्ट्रांतील बहुसंख्य काँग्रसे-जनांचं मत मुंबईसह सयुक्त महाराष्ट्र व्हावा, असंच असल्याचं भाऊसाहेब हिरे यांनीहि सांगितलं. दरम्यान देवकीनंदन नारायण यांनी प्रदेश-काँग्रेसच्या कार्याकारिणीच्या बैठकींत देशपांडे यांच्या निविदनासंबंधी आणि द्वैभाषिकाच्या एकूण प्रश्नाबाबतच चर्चा घडवण्याचा आग्रह धऱल्यानं १० ऑक्टोबर १९५८ ला कार्यकारिणीच्या बैठकींत या प्रश्नावर चर्चा झाली. भाऊसाहेब हिरे या बैठकीला उपस्थित होते, पण त्यांनी चर्चेंत कांहीच मत व्यक्त केलं नाही. वि. स. पागे, यशवंतराव चव्हाण, देवकीनंदन नारायण, तुळशीदास जाधव, प्रदेश-अध्यक्ष नाईक-निंबाळकर व स्वत: देशपांडे यांनीहि चर्चेंत भाग घेतला आणि कार्यकारिणीनं एक ठराव संमत करून चव्हाण यांच्या समर्थ नेतृत्वाखाली द्वैभाषिक यशस्वी होत असून, तें आता स्थिर होत आहे असं मत व्यक्त केलं. त्याचबरोबर चव्हाण यांचे हात बळकट करावेत आणि ज्यामुळे मुंबई राज्यांतल्या काँग्रेस-संघटनेला बाधक ठरेल आणि स्थैर्य भंग पावेल अशा प्रकारचया कोणत्याहि प्रचारास कार्यकर्त्यांनी बळी पडूं नये, असेहि प्रदेश-कांग्रसनं आवाहन केलं.

हिरे आणि देशपांडे यांनी या ठरावाकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे प्रदेश-काँग्रेसचे सरचिटणीस व्ही. एन्. नाईक यांनी हिरे व देशपांडे हे आपला प्रचार अशाच पद्धतीनं पुढे सुरू ठेवणार असतील, तर त्यांच्याविरूद्ध प्रदेश-काँग्रसनं शिस्तभंगाचा इलाज करावा असा आग्रह धरला. त्यावर भाऊसाहेब हिरे यांनी नाशिक जिल्हा-काँग्रेसच्या बैठकींत स्पष्टीकरण केलं की, “मी फक्त लोकांच्या भावना बोलून दाखवत असून, मला सत्तास्पर्धेंत कसलाहि रस नाही. द्वैभाषिकाचे जे समर्थक आहेत त्यांना स्वत:ची आणि लोकाचीं फसवणूक फार काळ करतां येणार नाही.” व्यक्त करण्यांत आलेलं मत हें पक्षाच्या शिस्तीचा भंग करणारं नाही, असाहि हिरे यांचा दावा होता. महाराष्ट्राच्या एकूण प्रश्नाचाच पुनर्विचार सुरू आहे आणि त्यामध्ये स्वत: यशवंतराव चव्हाण हें गुंतलेले आहेत याची भाऊसाहेब हिरे यांना माहिती होती त्यामुळे ते ही भूमिका विशद करण्यास पुढे सरसावले.