त्यांचे स्वत:चे आत्मपर लिखाण सीमेचें रसाळ उतरतें; पण समग्र आत्मचरित्र लिहिण्याइतका अवसर त्यांना मिळणार केव्हा? अद्यापपर्यंत तरी त्यांना तो मिळालेला नाही.
तो मिळेल तेव्हा मिळो. सांप्रत माझे मित्र श्री. रामभाऊ जोशी यांनी त्यांच्या चरित्र-लेखनाचे काम नेटकेंपणे बजावलें आहे. त्यांना मन:पूर्वक धन्यवाद दिले पाहिजेत.
श्री. रामभाऊ जोशी व्यवसायाने पत्रकार. वार्ता लिहिणें आणि ग्रंथ लिहिणें यांत केवढी तफावत; पण रामभाऊंनी या एकाच ग्रंथाच्या लेखनाने आपलें नांव ग्रंथकारांच्या ओळींत ओवून दिलें आहे.
चिठ्ठ्या-चपाट्या तपासून, भेटी-मुलाखती यांचा खटाटोप करून, संदर्भाच्या भरोशांवर लिहिलेलें चरित्र आणि प्रस्तुत चरित्र यांत अंतर आहे.
पहिली गोष्ट, चरित्र-लेखक हा चरित्रनायकाचा चिरपरिचित आहे, निकटवर्ती आहे. नायकाविषयी त्याच्या मनीं-मानसीं जवळिक आहे, जिव्हाळा आहे, जिज्ञासाहि आहे. कुणालाच ज्ञात नसलेल्या गोष्टी हा चरित्रकार त्याच बळावर मिळवूं शकला आहे. या ग्रंथांत त्या सम्मीलित करूं शकला आहे.
कथनला आरंभ करतांनाच रामभाऊंनी एखाद्या कादंबरीकाराच्या शैलीने सागरेश्वर-देवराष्ट्र याचा परिसर वाचकांसमोर उभा केला आहे.
यशवंतरावांचे बाल्य, पोरकेंपण, मातु:श्री, भावंडें यांच्या प्रेमाची पाखर इत्यादीविषयी लिहीत लिहीत त्यांनी देशकाल-परिस्थितीचा विशाल फलक चित्रित केला आहे. त्यांतले कुठचे रंग यशवंतरावांच्या व्यक्तिमत्त्वांत मिसळले, त्याचा मागोवा घेतला आहे. हळूहळू त्यांनी ‘नवोदित नेतृत्व’ या स्वरूपांत यशवंतरावांच्या मुद्रेचें समीप-दृश्य साकार केलें आहे. कथनाचा प्रवाह मुळीच न अडवितां, आपलें स्वत:चें भाष्य करण्याची संधीहि त्यांनी सोडलेली नाही.
देवराष्ट्र येथील मामाचें घर, मुंबईचा मुख्य मंत्री-निवास ‘सह्याद्रि’ आणि दिल्ली येथील १ रेसकोर्स रोड हा बंगला, या तीन वास्तूंना जोडणारें यशवंतरावांचें आयुष्य त्यांनी सम्यक् पद्धतीने चितारलें आहे. सारे बारकावे टिपून रंगविलें आहे.
राजकारणांत वेळोवेळी त्यांनी घेतलेले पवित्रे, मांडलेले विचार आणि प्रत्यक्षांत आणलेली कार्यवाही या सर्वांचा समाचार घेतांनाहि लेखकाने कोठेहि आपल्या कथनशक्तिचा पान्हा चोरलेला नाही.
‘व्यक्तिदर्शना’ च्या निमित्ताने त्यांनी लिहिलेलीं पन्नासएक पानें तर वाचकाला बांधून ठेवतील. त्यांच्या पापण्यांच्या कडा ओल्या करून सोडतील.
यशवंतराव या व्यक्तीचें दर्शन ते समग्रपणें घडवितातच, पण त्यांच्या परिवारांतील कांही जवळचीं व्यक्तिचित्रें रंगवितांनाहि त्यांच्या लेखणीला कुंचल्याचें सामर्थ्य येतें. शब्दांना आकार साधतात. रंग भरणें जमून जातें.