• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

इतिहासाचे एक पान. ७९

सामाजिक आणि आर्थिक न्याय मिळावा ही या पक्षाची भूमिका रास्तच होती. ज्या ध्येयासाठी काँग्रेस लढली त्याचं प्रतिबिंब स्वातंत्र्यानंतर सुरू झालेल्या महाराष्ट्राच्या राजवटींत उमटत नव्हतं आणि त्यामुळे कार्यकर्तें अस्वस्थ बनणं स्वाभाविकच होतं. समाजवादी विचाराची मंडळी अगोदरच काँग्रेसबाहेर गेलेली होती आणि उर्वरित काँग्रेस-नेत्यांमधले बहुजन-समाजांतील प्रमुख पुढारीहि आता काँग्रेसबाहेर गेल्यानं त्या काळांत महाराष्ट्र-काँग्रेस दुबळी बनली होती. यशवंतराव हे त्या वेळीं महाराष्ट्र-काँग्रेसचे चिटणीस होते. त्यांना जनतेसमोर जाऊन काँग्रेसची बाजू भक्कम करायची होती, पण ग्रामीण भागांतून निर्माण झालेल्या नेतृत्वाचा प्रत्यक्ष मंत्रिमंडळांत समावेश झाल्याखेरीज जनतेला न्याय मिळणार नाही, समाज-कल्याण ख-या अर्थानं साध्य करतां येणार नाही, ही भावना समाजांत निर्माण झाली होती. त्याला यशवंतरावांजवळ बिनतोड उत्तर नव्हतं; पण तरीहि त्यांनी जिद्द सोडली नाही. महाराष्ट्रभर ते हिंडले आणि लोकांच्या मनांतल्या काँग्रेसविषयीच्या भावनेला तडा जाऊं नये यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

भारतीय घटनेनुसार पाहिल्या सार्वत्रिक निवडणुका १९५२ सालांत झाल्या. तोंपर्यंत शे. का. पक्षानं निवडणुकींत काँग्रेसशीं टक्कर देण्याची तयारी केली होती. काँग्रेसच्या बाजूनं चव्हाण, भाऊसाहेब हिरे आणि काकासाहेब गाडगीळ मोर्चे बांधून उभे होते. उलटसुलट विचारांनी सारा महाराष्ट्र त्या वेळीं ढवळून निघाला. शे. का. पक्षाची सारी मदार बहुजन-समाजाच्या मतांवर होती. चव्हाण-हिरे यांनी आपसांत प्रचाराची विभागणी करून घेतली. भाऊसाहेब हिरे हे इनामदार, वतनदार, कुलवान, श्रीमंत शेतक-यांना जवळचे. त्यांनी त्या वर्गांत खिंडार पाडलं. त्यांचा प्रचार हा धोपटमार्गीं होता. यशवंतरावांनी सर्वसामान्य जनतेला, काँग्रेसचं ध्येय, लोकशाही समाजवादाचं काँग्रेसचं धोरण, पं. नेहरूंच्या विचारसरणीचा अर्थ आणि लोकशाही समाजवाद प्रस्थापित करण्यासाठी ते करत असलेले प्रयत्न याची माहिती देऊन सामाजिक आणि आर्थिक न्याय काँग्रेसच प्रस्थापित करूं शकते, हें जनतेला पटवण्यांत यश मिळवलं. गाडगीळ यांचा प्रचार हा मध्यमवर्ग आणि बहुजन समाज या दोघांनाहि बरोबर घेऊन जाणारा होता. या सर्वांच्या प्रचाराचा अतिशय अनुकूल परिणाम होऊन १९५२ च्या निवडणुकींत काँग्रेस प्रचंड बहुमतानं विजयी झाली. काँग्रेसला सत्तेवर राहूं द्यायचं नाही हें जेधे-मोरे यांचं स्वप्न धुळीला मिळालं. या निवडणुकीस बाळासाहेब खेर उभे राहिले नाहीत. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाबरोबर खेरांची राजवट संपली आणि ख-या अर्थानं मोरारजी-राजवट सुरू झाली.

मोरारजींनी मंत्रिमंडळांत आपल्या यशवंतराव चव्हाण आणइ भाऊसाहेब हिरे या दोघांनाहि सामावून घेतलं. महाराष्ट्र प्रांतिक काँग्रेसचं अध्यक्षपदहि या काळांत हिरे यांच्याकडेच आलं. चव्हाण यांच्याकडे नागरी-पुरवठा, समाज-कल्याण आणि जंगल हीं खातीं मोरारजींनी सोपविलीं आणि हिरे हे महसूलमंत्री बनले.

मंत्रिमंडळाच्या बनावटीच्या वेळीं कटुता निर्माण करणारी एक घटना घडली होती. मोरारजी यांनी सातारा जिह्यापैकी मालोजीराजे नाईक-निंबाळकर आणि गणपतराव तपासे यांचा मंत्रिमंडळांत समावेश केला होता; परंतु त्यांचा समावेश करतांना प्रांतिक काँग्रेसला मोरारजींनी विश्वासांत घेतलं नाही किंवा कांही सल्लामसलतहि केली नाही. भाऊसाहेब हिरे यांना यामुळे आपला अवमान झाल्यासारखं वाटलं आणि हा प्रश्न धसास लावण्याच्या निर्णयापर्यंत ते पोंचले. परंतु यशवंतरावांनी दूरदृष्टीनं हिरे यांना त्यापासून परावृत्त करण्यांत यश मिळवलं. प्रांतिक काँग्रेसशीं सल्लामसलत अशा वेळीं करणं आवश्यक असलं तरीहि, मोरारजींना एकदा नेता म्हणून निवडल्यानंतर, मंत्रिमंडळाचा संच कसा असावा हें ठरवण्याचा आणि तशी निवड करण्याचा अधिकार त्यांना आहे, असं यशवंतरावांचं मत होतं. प्रांतिकनं सल्ला द्यावा, पण दबाव आणणं योग्य नव्हे अशी त्यांची भूमिका असल्यानं मंत्रिमंडळाच्या निर्मितींतून निर्माण झालेली कटुता त्यांनी वाढू दिली नाही.

पार्लमेंटरी सेक्रेटरी म्हणून यशवंतरावांनी राज्यकारभाराचा अनुभव मिळवला होताच. प्रत्यक्ष मंत्रिपद स्वतःकडे आल्यानंतर त्यांना या अनुभवाचा लाभ घेतां आला. मंत्री या नात्यानं काम करतांना यशवंतरावांच्या स्वभावाचं एक आगळं दर्शन लोकांना घडलं. इतकंच नव्हे तर, त्यांच्या अखत्यारींतल्या खात्यांतील सरकारी श्रेष्ठ आणि कनिष्ठ नोकरांनाहि त्यांच्या विशिष्ट स्वभावाची प्रचीति आली. आपल्या मनाचा थांगपत्ता लागू न देतां काम करत रहाण्याची कला चव्हाणांनी आत्मसात केलेली असल्यानं कुणाचा पाणउतारा न करतां किंवा कुणाला प्रमाणापेक्षा अधिक महत्व न देतां सर्वांकडून काम करुन घ्यायचं आणि कारभाराच्या मुख्य सूत्रापासून कुणी बाजूला जाणार नाही यासाठीहि जागरुकता ठेवायची या नैपुण्यामुळे त्यांनी सर्वाच्या मनांत आदराचं आणि आदरयुक्त भीतीचं स्थान निर्माण केलं. खात्यांतल्या कारभाराच्या लहानसहान गोष्टी आणि त्यांचे संदर्भ आपल्यापर्यंत सातत्यांनं येत रहातील अशीच त्यांची कामाची, बोलण्याची किंवा माणसांचा वापर करण्याची पद्धत असे. या त्यांच्या स्वभावामुळे व अंगभूत गुणांमूळे ते स्वतः यशस्वी शासक तर ठरलेच शिवाय त्यांच्या खात्यांचा कारभार सुरळीत, सुबक आणि नीटनेटका होत असल्याचंहि प्रत्ययास आलं.