• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

इतिहासाचे एक पान. ७८

शेतकरी-कामकरी पक्षाची स्थापना होतांच मराठा-समाजांतील कुलवंत मंडळी या पक्षाच्या आश्रयाला गेली. यशवंतराव चव्हाण यांना आणि त्यांच्या काँग्रेस-पक्षाला हें आव्हान मिळतांच त्यांनीहि काँग्रेस पक्षाला सावरण्याची जय्यत तयारी सुरू केली. काँग्रेस-पक्षाला निश्चित असं रूप देण्याच्या दृष्टीनं त्यांना साधनं उपलब्ध होतीं. विचार पक्का होता. त्यांना पाठिंबा देणारे कार्यकर्ते होते. त्या साधन-सामग्रीच्या आधारानं यशवंतरावांनी मग संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करून जनतेला वस्तुस्थिति समजावून सांगण्याचं काम सुरू केलं. जिल्ह्या-जिल्ह्यांतले प्रश्न उभे करून विधानसभेंत ते प्रश्न सादर करूं लागले. निरनिराळ्या जिल्ह्याच्या राजकारणाशीं, तेथील प्रश्नांशीं त्यांचा सतत संपर्क होतांच, त्याचा या दौ-यांत त्यांना फायदा घेतां आला.

शेतकरी-कामकरी पक्षाचा प्रयत्न सर्व शेतकरीवर्गाला आणि त्याच्याहि खालच्या कामकरी वर्गाला संघटित करण्याचा होता. अशी संघटना तयार करणं हीच त्यांची शक्ति होती. बहुजन-समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी या शक्तीला संघटित करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. शंकरराव मोरे यांनी मार्क्सच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास केलेला असल्यानं त्यांना कष्टकरी समाजाची संघटना बांधण्याची कल्पना सुचली. ग्रामीण भागांतल्या शेतक-यांची आणि कष्टक-यांची संघटना तयार केल्यानं त्यांच्या समस्यांना संघटनेमार्फत वाचा फोडतां येणं शक्य होतं; परंतु त्या वर्गाची परिस्थिति प्रत्यक्षांत सुधारायची, त्यांना वेगळ्या जीवनाच्या आनंदाची अनुभूति मिळवून द्यायची, तर ज्यामुळे हा बदल घडून येईल अशा विधायक मार्गाचा अवलंब करणं आवश्यक ठरतं. काँग्रेस-पक्षाजवळ तो मार्ग होतो. तो दृष्टिकोन होता. त्याची अंमलबजावणी होण्याची सर्वांनी एकत्र रहाण्याची आणि तें घडवण्याची जरूरी होती. जिल्ह्या-जिल्ह्यांतून दौरा करतांना यशवंतरावांनी जनतेला त्यासाठी आवाहन केलं. चव्हाण, कुंटे आणि त्यांचा कार्यकर्त्यांचा ताफा यांनी सर्व मुंबई राज्यांत त्या वेळीं हिंडून काँग्रेसची भूमिका लोकांपर्यंत पोंचविली आणि त्याचा इष्ट परिणाम घडून आला.

१९५२ च्या, भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकींत महाराष्ट्रांत काँग्रेस विरूद्ध शेतकरी-कामकरी पक्ष असा निकाराचा सामना होऊनहि त्यामध्ये जेधे-मोरे यांचा नवा पक्ष भुईसपाट झाला तो त्यामुळेच होय. डाव्या विचाराच्या सर्व शक्तींनी काँग्रेसमध्ये मोकळेपणानं दाखल होऊन, हितसंबंधी प्रवृत्तीच्या लोकांना धडा शिकवावा हें यशवंतरावांचं आवाहन त्या वेळेपासूनचं आहे. शेतकरी-कामकरी पक्षाच्या नेत्यांना त्या वेळीं हें उमजलं नाही. जेधे, मोरे, तुळशीदास जाधव, खाडिलकर यांना कालातरानं उमजलं आणि ते सर्वजण काँग्रेसमध्ये दाखलिह झाले. नंतरच्या काळांतहि या पक्षाला सर्व शेतकरी आणि कष्टकरी वर्गाला संघटित करण्यांत यश कधी आलं नाही. शेतक-यांचं नांव पुढे करून जरी या पक्षाला जन्माला घालण्यांत आलं होतं तरी मराठा समाजांतील कुळाचं श्रेष्ठत्व मानणा-यांच्या हातांतच पक्षाचीं सूत्रं राहिलीं आणि ग्रामीण भागांतला बहुसंख्य कुणबी-समाज, माळी-समाज, लोहार-कुंभार, शिंपी आदि बलुतेदार हा वर्ग या पक्षाच्या आश्रयाला बहुसंख्येनं आला नाही. बहुजन-समाजांतल्याच भिन्न भिन्न जातींमध्ये एकोपा साधण्याचं कामहि या पक्षाला करतां आलं नाही. तरी पण राजकीयदृष्ट्या या सर्वांची भक्कम संघटना उभारण्याची आशा हा पक्ष बाळगून राहिला. ध्येय-धोरणाच्या बाबतींत तारेवरची कसरत करत राहिल्यानं ग्रामीण भागांतल्या प्रतिष्ठितांचंहि धड प्रतिनिधित्व नाही आणि उठावदारपणएं सामान्य शेतकरी-कामक-यांचंहि प्रतिनिधित्व नाही अशा स्थितींत हा पक्ष चाचपडत राहिला. बदलत्या परिस्थितींत जातीयवादाचं बोट धरून वाटचाल करणं राजकीय पक्षांना अशक्य ठरतांच हा पक्ष दिवसेंदिवस अशक्त बनत राहिला.

या पक्षाचे प्रमुख शंकरराव मोरे यांनी नंतरच्या काळांत, पक्षाच्या अधिवेशनांत जो एक प्रबंध सादर केला आणि दाभाडीच्या प्रबंध म्हणून जो प्रसिद्धि पावला या प्रबंधांतील विचारानं तर पक्षाच्या चिरफळ्या उडाल्या. मोरे आणि त्यांचे सहकारी जेधे यांच्यांतच पुढे कलागत सुरू झाली आणि परिणामीं जेधे यांनी आपला पक्षाचा पाठिंबा आस्ते कदम काढून घेण्यास प्रारंभ करतांच पक्ष घसरणीला लागला. तरी पण ही परिस्थिति निर्माण होईपर्यंत शेतकरी-कामकरी पक्षानं काँग्रेसला शर्थीनं विरोध करण्याचं काम केलं ही वस्तुस्थिति मान्य करावी लागेल.