• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

इतिहासाचे एक पान. ५९

इस्लामपूरचा मोर्चाहि असाच संस्मरणीय ठरला. १० सप्टेंबरला इस्लामपूरच्या मामलेदार-कचेरीवर मोर्चा नेण्याचं ठरलं होतं. हा मोर्चा संघटित करण्यासाठी यशवंतराव दाखल झाले होते. के. डी. पाटील, चंद्रोजी पाटील, पांडू मास्तर, वसंतराव पाटील आदींनी वाळवें तालुका प्रचारानं तापवला होता. मल्लिकार्जुन डोंगरावर हजारावर शस्त्रधारी कार्यकर्ते व यशवंतराव एकत्र आले. ती रात्र त्यांनी किर्लोस्करवाडी इथे काढली. कामेरी भागांतूनहि कांही सत्याग्रही निघावयाचे होते. कामेरीकडून आलेला मोर्चा सरळ कचेरीवर गेला. या मोर्चामध्ये किर्लोस्करवाडीचा एक तरुण इंजिनियर उमाशंकर पंड्या हा होता. पंड्या हा या चळवळीच्या वातावरणानं नादावला होता. मोर्चात जाण्याचा आग्रह धरतांच यशवंतरावांनी त्याला चार समजुतीच्या गोष्टी सांगितल्या. पण तो मागे हटण्यास तयार नव्हता. सकाळी यशवंतराव मोटार-सायकलनं कामेरीकडे रवाना झाले आणि नंतर इस्लामपुराजवळ तीन-चार मैलांवर थांबले. या मोर्चावरहि गोळीबार झाला आणि त्यांत पंड्या ठार झाला! कामेरीचा एक मुलगा विष्णु बारवटें हाहि हुतात्मा झाला. मोर्चा मार्गस्थ करण्यापूर्वी रात्रीं पंड्याबरोबर झालेलं बोलणं आणि मागोमाग त्याचा पडलेला बळी कायम लक्षांत रहावी अशीच ही घटना ठरली. किर्लोस्करवाडींत सदाशिव पेंढरकर हा एक मोठा उमदा कार्यकर्ता होता. रात्रीं त्याच्या घरीं जेव्हा चर्चा होत त्या वेळीं हा पंड्या येऊन बसत असे. त्या चर्चा ऐकून तो चांगलाच नादावला. तो मोर्चात जाणार म्हणाला, पण प्रत्यक्ष गेला की नाही हें यशवंतरावांना माहीत नव्हतं. पण तो ठार झाल्याचं कळलं तेव्हा त्यांना धक्का बसला.

मुंबईतल्या बैठकींत भूमिगत रहायचं ठरलं तेव्हा सौ. वेणूबाई या फलटणला होत्या. त्यांना यशवंतरावांनी पत्र पाठवून त्यांनी कराडला सासरीं येऊन रहावं असं कळवलं होतं. त्याप्रमाणे त्या कराडला घरीं परतल्या होत्या. यशवंतराव आणि त्यांच्याबरोबरचे कार्यकर्ते म्हणजे वारं प्यालेलीं माणसं होतीं. या गावाहून त्या गावाला, डोंगरांत, द-याखो-यांत, अंधारांत गुप्तपणानं फिरत रहायचं आणि लोकांना चळवळीसाठी उत्तेजित करायचं हेच काम चाललं होतं. यशवंतराव वकील झाले होते, प्रतिष्ठा मिळाली होती, पण वकिलीचं काम करून अर्थार्जन करण्याकडे लक्षच नव्हतं. कराडांत या वेळीं ते शुक्रवार पेठेंत रहात असत. आठ-पंधरा दिवसांनी केव्हा तरी अवचित घरीं येऊन भेटून जाण्याचा मात्र परिपाठ सुरू होता. यशवंतरावांच्या हालचाली आईला – विठाईला मात्र बिनचूक कळत असत. त्या मोठ्या धोरणी. त्यांना यशवंतरावांची तर काळजी होतीच, जास्त काळजी होती नव्या सुनेची! लग्नानंतर दीड-दोन महिन्यांतच यशवंतराव भूमिगत झाले होते. विठाईनं यशवंतरावांना त्याबद्दल कधी बोल लावला नाही, पण सुनेसाठी मात्र त्या मनांतून कष्टी झाल्या. यशवंतरावांसाठी आईनं सारं सहन केलं. दु:ख पचवलं. सुनेला पोटाशीं धरून आला दिवस गेला हें पहात रहाणं एवढंच त्यांच्या हातीं राहिलं होतं. लाठीहल्ले, रोज होणारे गोळीबार यांच्या कथा ऐकतांना यशवंताची मूर्ति मनासमोर येई अन् त्यांच्या काळजांत धस्स होई.

चळवळीनं विराट् रूप धारण केलं आणि जिल्ह्यांतल्या हजारावर चळवळ्यांना पोलिसांनी गजांआड केलं, तरी पण चळवळ शमत नाही, उलट अधिकच तीव्र बनत आहे असं पाहून पोलिसांनी भूमिगतांना पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. वस्तुत: भूमिगत कार्यकर्ते हे कायद्याच्य भाषेंत भूमिगत होते. अन्यथा त्यांचा उघडपणे संचार सुरू असे. कोणत्याहि गावांत गेलं तरी त्या गावच्या लोकांचा सर्व प्रकारचा पाठिंबा असायचा. चळवळीचे बेत आखायचे आणि ते पार पाडायचे म्हणजे गावांतील शे-दोनशे लोकांचं सहकार्य आवश्यकच होतं. असं सहकार्य देण्यास तर लोकांची तयारी असेच; पण हे सर्व गुप्त ठेवण्याची दक्षताहि लोक पाळत असत. त्यामुळे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन निसटणं भूमिगतांना शक्य होत असे. पोलिसांनी मग चळवळीच्या प्रमुखांना पकडण्यासाठी अन्य मार्गांचा अवलंब सुरू केला. ज्यांना स्थानबद्ध केलं होतं त्यांचे नातेवाईक घाबरलेल्या मन:स्थितींत असत. सरकारी नोकर निरनिराळीं आमिषं दाखवून, दमदाटी करून त्यांच्याकडून पैसे उकळत राहिले. तरीहि त्यांच्याकडून ‘गुप्त’ असलेल्यांचा ठावठिकाणा समजेना तेव्हा मग सरकारनं भूमिगतांना पकडून देण्याबद्दल हजार रुपयांचं बक्षीस जाहीर केलं. यशवंतराव चव्हाण, पांडू मास्तर, बाबूराव चरणकर, नाना पाटील, गौरीहर सिंहासने, काशीनाथ देशमुख, बिळासरकर पाटील आदि मूमिगतांना पकडून देण्यासाठी हें बक्षीस होतं. कांहींची मालमत्ताहि सरकरानं जप्त केली; परंतु भूमिगतांनी चळवळीला आणखी उठाव आणण्यासाठी, एकेकाच्या नेतृत्वाखाली तुकड्या तयार केल्या आणि त्यांतील प्रत्येकानं कामं वांटून घेतलीं. यशवंतरावांची तुकडी सर्वात मोठी म्हणजे ७५ माणसांची होती. या तुकड्यांनी तारा तोडणं, पूल पाडणं, सरकारी इमारतींना आगी लावणं, टपाल-पेट्या लुटणं, रेल्वेस्टेशनं जाळणं, गाड्या पाडणं, पोलिसांना बदडून त्यांच्या बंदुका पळवणं, असा सर्वत्र आगडोंब उसळवला व पोलिसांना पळता भुई थोडं करून सोडलं.