• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

इतिहासाचे एक पान. ५०

मनाचा कौल झाला खरा, पण कम्युनिस्ट पक्षाची दोरी प्रत्यक्ष गळ्यांत अडकवण्यापूर्वी, आणि लाल तारा डोक्यावर धरण्यापूर्वी, रात्रंदिवस ज्यांच्या बरोबर काँग्रेसचं काम केलं, त्यांच्याशी चर्चा करून, त्यांना विश्वासांत घेऊन, मगच कम्युनिस्टांचं सहकार्य घ्यावं, असं दुसरं मन आंतून सांगू लागलं. आणि तेंहि खरंच होतं. कम्युनिस्ट बनायचं तें देशाचं काम करण्यासाठी. परंतु एकट्यानं करण्याचं हें काम नव्हतं. त्यासाठी साथीदार हे असलेच पाहिजेत. साथीदार नसतील तर कम्युनिस्ट बनल्याचं समाधान मनाला झालं तरी कामाचं समाधान मिळणार नव्हतं. परिणामीं पहिलं समाधानहि टिकणार नव्हतं. अशा चक्रांत मन सापडल्यानं साथीदार, मित्र, कार्यकर्ते यांच्याशीं चर्चा करण्यासाठी आणि कम्युनिस्ट बनण्याचा विचार त्यांच्याहि मनांत उतरवण्यासाठी यशवंतरावा साता-याला दाखल झाले. सातारा आणि वाई येथे या विषयावर मग तीन दिवस अहोरात्र चर्चा झाली. पण या चर्चेतून अनुकूल असं कांही निष्पन्न झालं नाही. कम्युनिस्ट म्हणून आम्हांला साथ देतां येणार नाही अशी मित्रांनी आपली भूमिका स्पष्ट शब्दांत सांगितली. त्यांच्या दृष्टीनं त्यांनी सल्ला दिला. स्वातंत्र्यासाठीच काँग्रेस झगडत होती. कोणत्या वेळी नेमकं काय करायचं याचा निर्णय प्रमुख नेत्यांनी करायचा असून गांधी-नेहरू त्या दृष्टीने निर्णय करतीलच, असं मित्रांनी सांगितलं. अशा स्थितींत काँग्रेसबरोबर राहूनच स्वातंत्र्यलढा लढायचा या मित्रांच्या मतांशी जुळतं घेऊन आणि काँग्रेसमध्ये राहूनच स्वातंत्र्याची चळवळ करत रहायचं असा मनाशीं निर्णय करून यशवंतराव पुण्याला परतले.

या पुढच्या काळानंहि यशवंतरावांनी केलेला निर्णय योग्य होता अशीच ग्वाही दिली. कारण पुढे १९४० मध्ये काँग्रेसनं वैयक्तिक सत्याग्रहाचा निर्णय केला आणि त्यामुळे देशांतले वातावरण बदललं. काँग्रसनं सत्याग्रहाचा आदेश देतांच सरकारी यंत्रणा, विशेषत: गुप्त पोलिसखातं मात्र सज्ज झालं आणि काँग्रेस-कार्यकर्त्यांच्या नि नेत्यांच्या हालचालींची नोंद सुरू झाली. पुण्याच्या काँग्रेस-हाऊसवर, कार्यकर्त्यांची आणि गुप्त पोलिसांचीहि वर्दळ सुरू झाली. सत्याग्रह्यांच्या याद्या सुरू झाल्या. सत्याग्रहांत भाग घेण्याची संधि मिळण्यासाठी कार्यकर्ते काँग्रेस-हाऊसवर येऊन, त्यांच्या नांवांची नोंदणी करूं लागले. श्री. काकासाहेब गाडगीळ हे त्यांना मार्गदर्शन करत होते. काकासाहेब गाडगीळ व केशवराव जेधे यांनी तर सत्याग्रह करण्याचा दिवसहि पक्का केला. या सत्याग्रह-मोहिमेमध्ये लोकांमध्ये उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होऊं लागल्या. सत्याग्रह कशासाठी, त्यामागचा दृष्टिकोन कोणता याची जनतेला नीट कल्पना आलेली नव्हती. पण त्या वेळी सुरू असलेल्या महायुद्धाला मदत करायची नाही आणि युद्धासाठी लष्करांत भरती व्हायचं नाहीं, ब्रिटिशांना एकहि माणूस मिळूं द्यायचा नाही, अशा घोषणा सुरू झाल्या. या घोषणा जे करतील ते सत्याग्रही म्हणून पकडले जाऊन तुरुंग भरूं लागले. सरदार पटेल, पं. पंत, सुभाषबाबू, मौलाना आझाद, शंकरराव देव आदि नेत्यांना सरकारनं पकडलं आणि मागोमाग सत्याग्रह्यांच्या तुकड्या तुरुंगांत दाखल होऊं लागल्या. देशांतलं वातावरण पुन्हा एकदा जिवंत बनलं. येरवड्याच्या तुरुंगांत गाडगीळ, जेधे, शंकरराव मोरे, तात्या देशपांडे, बापूसाहेब व नानासाहेब गुप्ते, बाळासाहेब खेर, मंगलदास पक्कासा, सरदार पटेल, कन्हय्यालाल मुन्शी आदि नेते डांबले गेले. नाशिक, ठाणें येथील तुरुंगहि भरले. अ, ब, क अशा वर्गवारीनं तुरुंगाच्या कोठड्या सत्याग्रह्यांनी भरून गेल्या. सर्वच प्रांतांत सत्याग्रहाची लाट उसळली तेव्हा अनेक व्यक्ति व गट राजकीय तडजोडीची भाषा बोलूं लागले. ही चळवळ मूठभर काँग्रेसवाल्यांची आहे; एरवी भारतीय लोकांचा ब्रिटनवर विश्वास आहे असं भारतमंत्री अमेरी सांगू लागला. तेजबहादूर सप्रूंसारखे नेते उभय पक्षांनी मिटवावं अशी विनंती करूं लागले. त्यांनी तसं एक निवेदनहि काढलं. रॉय यांनी नवा पक्ष स्थापन केला होता. युद्ध जिंकलंच पाहिजे अशा त्यांच्या घोषणा होत राहिल्या. दरम्यान सप्रूंनी सर्वपक्षीय परिषद आयोजित केली आणि या परिषदेंत तात्पुरतं, पण राष्ट्रीय सरकार स्थापन करावं असा ठराव केला. या परिषदेंत मुस्लिम लीग सहभागी झाली नाही; उलट भारताची दोन राज्यं करूनच भारताला स्वातंत्र्य मिळेल अन्यथा मिळणार नाही, असं जीनांनी स्पष्ट केलं. ब्रिटिशांनी दोन्ही डगरीवर हात ठेवून राजकारण सुरू ठेवलं होतं. जीनांना आंतून पाठिंबा द्यायचा आणि काँग्रेसशी चर्चा करत रहायचं अशी त्यांची राजकारणाची नीति होती. ब्रिटिश पार्लमेंटच्या कांही सभासदांनीहि एक निवेदन काढून प्रश्न मिटवावा असं आवाहन केल्यानंतर अमेरीसाहेब पुढे आले आणि त्यांनी युद्ध संपतांच, हिंदु-मुसलमानांची एकी होतांच, भारताला स्वराज्य मिळेल अशी घोषणा केली. या सर्व गदारोळानंतर गांधींनी सद्भावना निर्माण होण्यासाठी म्हणून सत्याग्रह स्थगित केला. १९४० साल संपलं तेव्हां देशांत सर्वत्र अनिश्चिततेचंच वातावरण निर्माण झालं होतं. चळवळीचं वातावरण कांही संस्थानांमध्येहि जरी पोंचलं होतं तरी प्रतिगामी संस्थानिक काँग्रेसला विरोध करत असत. युद्धविरोधी सत्याग्रह संस्थानी भागांतहि सुरू झाला होता. गांधींनी तो सत्याग्रह थांबवला आणि अन्न-सत्याग्रहाला मोकळीक दिली. ‘सरकारला मदत करा’ ही लाट उत्तर-भारतांत पसरली होती, तर सैनिकीकरणाला उत्तम संधि मिळाली म्हणून वीर सावरकर सरकारचं अभिनंदन करूं लागले. जाति-जातींत वैमनस्य वाढवून, अविश्वास निर्माण करण्याचे पवित्रे ब्रिटिश सरकार टाकत होतंच. वर्ष संपलं, पण अनिश्चितता संपत नव्हती.