• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

इतिहासाचे एक पान. ४१

कॉलेजमध्ये यशवंतरावांनी इतिहास आणि अर्थशास्त्र हे विषय घेतले होते. राजाराम कॉलेजमध्ये त्या वेळीं प्रो. ना.सी. फडके डॉ. बाळकृष्ण असे एकापेक्षा एक सरस अध्यापक होते. प्रो. फडके हे 'लॉजिक' शिकवत असत. यशवंतराव हे डॉ. बाळकृष्ण यांचे आवडते विद्यार्थी. आपला विद्यार्थी राष्ट्रीय चळवळींतहि आघाडीवर आहे याबद्दल त्यांना समाधान होतं. अभ्यासाकडे या विद्यार्थ्यानं लक्ष दिलं पाहिजे असा मात्र त्यांचा कटाक्ष असे. यशवंतराव इंटरला असतांना आजारी झाले. त्यामुळे कॉलेजचे दिवस पूर्ण भरले नाहीत. तरी पण डॉ. बाळकृष्ण यांनी टर्म भरुन घेऊन त्यांना परीक्षेला बसण्यास परवानगी दिली आणि ते उत्तीर्णहि झाले. परीक्षा उत्तीर्ण होणं हेंच अंतिम ध्येय, असं त्यांनी शाळेंत किंवा कॉलेजमध्ये असतांना कधीच मानलं नव्हतं. व्यावहारिक जगासाठी परीक्षा दिल्या पाहिजेत याची जाणीव मात्र त्यांना होती, पण त्याहीपेक्षा ज्ञानार्जन हा या शिक्षणामागचा प्रमुख हेतु होता. त्यामुळे स्वतंत्र-बुद्धीनं अभ्यास करण्याची सवय त्यांनी प्रथमपासूनच आत्मसात केली. घोकंपट्टी करुन परीक्षा पास होणं हा एक मार्ग असतो; परंतु वाचन करायचं, जें काय वाचलं त्याचं मनन करायचं आणि त्यांतून विचाराचा धागा धरुन त्याच्याशीं एकजीव होऊन मत बनवायचं ही जी अभ्यासाची पद्धत, तिचाच अवलंब यशवंतराव करत राहिले. त्यामुळे त्यांचं मन चिकित्सिक बनलं. उपजत-बुद्धि संवर्धित होत राहिली. मन आणि मत बनवतांना, पुढच्या काळांतहि त्यांना या सवयीचा लाभ झाला. नेमकं वाचावं आणि मनानं पचवलेलंच नेमकं बोलावं हा त्यामुळेच त्यांचा गुण ठरला. प्रारंभीच्या काळांतच मनोंभूमींत पडलेलं विचारांचं बीं रुजलं, अंकुरलं, वाढत राहिलं आणि फोफावलं तें त्यामुळेच !

महाविद्यालयीन पदवी संपादन केल्यानंतर माध्यमिक विद्यालयांतील दहा-वीस तरुणांचा त्या काळांतला म्होरक्या आता सातारा जिल्ह्यांतील तरुणांनी आपला पुढारी बनवला होता. ज्या समाजाला वर्षानुवर्षं अक्षर-ओळख झालेली नाही आणि अज्ञानाच्या , दारिद्याच्या खोल गर्तें जो अडकून पडला आहे, त्याला वर काढण्याची ईर्षा बाळगणारा, त्यांच्या मनांत स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित करणारा, असा त्यांच्यांतलाच पुढारी त्यांना आता मिळाला होता. लो. टिळकांचं नांव शिरोधार्य ठेवून राष्ट्रीय शिक्षणाचं अमृत, टिळक हायस्कूलमध्ये सेवन केलेल्या विद्यार्थ्यानं उच्च शिक्षणाचा एक टप्पा पूर्ण केला होता ; आणि आता समाजाला शिक्षण देण्यासाठी तों समाज - शिक्षक बनल्याचं पाहून गुरुजनांनाहि समाधान लाभलं. आचार्य-ऋणांतून मुक्त होण्याचा मार्ग यशवंतरावांनी तरुणपणींच चोखाळला.

राजकीयदृष्ट्या जागृत बनलेल्या सातारा जिल्ह्यांत सभा, परिषदा, जनता-संपर्क परस्पर-मैत्री, सौहार्द, सघटनेची बांधणी अशा कामाचा धूमधडाका सुरु राहिला. जेवण मिळालं न मिळालं याची पर्वा नव्हती. कुणाहि कार्यकर्त्यांकडे, शेतक-याच्या घरी जाऊन असेल त्या चटणी-भाकरीनं भूक भागवावी आणि पुढचा रस्ता धरावा. या गावाहून त्या गावाला पायीं, बैलगाडीनं, सायकलीनं, अशी भ्रमंती सुरु राहिली असतांनाच १९३७ मध्ये असेंब्लीच्या निवडणुकीचे वारे वाहूं लागले. सातारा जिल्ह्यांत त्या काळांत भाऊसाहेब सोमण, बाबूराव गोखले, अळतेकर, लक्ष्मणशास्त्री जोशी,  ह.रा. महाजनी, काशीनाथ देशमुख, राघुअण्णा लिमये, आत्माराम पाटील, दामुअण्णा एकबोटे, किसन वीर, इंदुलीकर अशी किती तरी मंडळी निरनिराळ्या तालुक्यांत काम करत होती. पण त्याचबरोबर विसी-तिशीच्या दरम्यानच्या तडफदार तरुण मंडळींनी आपला एक प्रभाव सातारा जिल्ह्याच्या राजकारणांत निर्माण केला होता. हे तरुण वयानं लहान असले तरी मनानं प्रौढ होते. उमेद दांडगी होती. यशवंतराव या सर्वांमध्ये आघाडीवर होते, उठून दिसत होते. जहाल विचाराच्या या मंडळींनी जिल्हा-काँग्रेसचा कब्जाहि मिळवला होता. पण यामुळे जिल्ह्यांतले परंपरावादी नेते सचिंत बनले. जिल्हा-काँग्रेस आपल्या ताब्यांत असावी हा त्यांचा दृष्टिकोंन. उजव्या गटाचं नेतृत्व श्री. भाऊसाहेब सोमण यांच्याकडे होतं व त्यांच्या बरोबरची मंडळी जिल्हा-काँग्रेसवर ताबा मिळवण्याच्या कामीं त्यांची सहकारी बनली होती. जिल्हा-काँग्रेस-अंतर्गत असे दोन प्रवाह निर्माण झालेले असतांनाच जिल्हा-काँग्रेसच्या अध्यक्षीय निवडणुकीचा प्रश्न पुढे आला.