• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

इतिहासाचे एक पान. ४०

शिक्षणासाठी यशवंतराव शरीरानं कोल्हापुरांत राहिले, तरी मनानं सातारा जिल्ह्यांतच वावरत होते. शिक्षण कोल्हापुरांत आणि राजकीय जागृतीचं काम सातारा जिल्ह्यांत, असं त्या वेळी सुरु राहिलं. सातारा जिल्हा राजकीयदृष्ट्या अतिशय जागृत बनला होता. १९३० सालच्या चळवळीपासून स्वातंत्र्य-चळवळीचं लोण शेंत-कं-यांच्या झोपड्यांपर्यंत पोंचल्यानंतर बहुजन-समाजांतील तरुण काँग्रेसच्या राजकीय प्रवाहांत येऊन सामील होऊं लागले. हा प्रवाह वाढून विधायक कामासाठी त्याचा उपयोग व्हावा यासाठी, नव्या पिढींतल्या तरुणांनी यशवंतरावांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हा-काँग्रेसची आखणी सुरु केली. कार्यकर्त्यांसमवेत पायीं. सायकलीनं रानोमाळ हिंडावं, तरुण जमवावेत, त्यांना देशांत काय चाललं आहे, आपण काय करायला पाहिजे हें समजावून सांगावं आणि दुसरं गाव गाठावं, असं सुरु होतं. बोरगाव हें त्या वेळीं या कार्यकर्त्यांचं एक मोठं केंद्र बनलं होतं. आत्माराम पाटील हे बोरगावचे. ते या सर्वांचे पुढारी. बोरगावच्या अड्ड्यांत सातारा जिल्हा-काँग्रेसच्या आखणीच्या, संघटना वाढवण्याबद्दलच्या चर्चा होऊं लागल्या. स्वातंत्र्य-चळवळींत सहभागी होऊं लागलेली ग्रामीण भागांतील ही सर्व तरुण मंडळी होती.  जिल्हा-काँग्रेस ही तरुणांची संघटना बनली होती. चळवळीमध्ये ग्रामीण भागांतल्या जनतेचं मोठं सामर्थ्य त्यांनी त्या वेळीं उभं केलं. जिल्ह्यांतल्या कार्यकर्त्यांची माहिती घेणं, त्यांच्याशी स्नेह वाढवणं, असा यशवंतरावांचा उपक्रम सातत्यानं सुरू राहिल्यामुळे , त्यांतून जिल्ह्यामध्ये सर्वत्र त्यांच्याबद्दल बंधुभाव वाढला. सबंध जिल्हा हा यशवंतरावांना घरासारखाच बनला. बोरगावच्या बैठकींत ज्या चर्चा होत त्यांमध्ये देशांतल्या राजकारणाची चर्चा असेच, पण त्याहीपेक्षा सातारा जिल्हा हा महाराष्ट्राच्या राजकारणांत आघाडीवर कसा राहील, किंबहुना तसा तो राहिला पाहिजे, या संदर्भांत चर्चा होत असत. राजकारणांत या जिल्ह्यानं आपलं स्वत:चं असं स्थान निर्माण केलं पाहिजे. स्वत:च्या विचारानं चाललं पाहिजे ही चर्चा घडवण्याइतके हे कार्यकर्तें जागृत होते. कौन्सिलच्या निवडणुका जेव्हा होतील त्या वेळीं, स्वातंत्र्य-चळवळींतून पुढे आलेला पुढारी आत्माराम पाटील हा आपला उमेदवार असावा, अशी त्यांच्या मनांत जुळणी सुरु होती. बोरगावच्या भेटी-गाठी आणि चर्चा हाहि त्या योजनेचा एक भाग होता. त्या निवडणुकीच्या दृष्टीनं संघटनेंतील लोकांचा उपयोग करण्याचे बेतहि तिथ ठरत असत. निवडणुकीकरिता तो संघर्ष करावा लागेल त्याचं साधन म्हणून संघटना भक्कम बनवण्याचा तो प्रयत्न होता.

ब्रिटिश सरकारशीं संघर्ष करण्यासाठी काँग्रेसची बांधणी करण्याचं काम जिल्ह्यामध्ये करीत असतांनाच, निवडणुकांद्वारे उपलब्ध होणा-या सत्तेमधूनहि शक्ति वाढवण्याचा हा विचार होता. सत्ता हें संघटनेचं साधन बनणार असेल, तर सत्तेवर बहिष्कार न टाकतां, सत्ता ही संघर्षासाठी वापरतां यावी आणि सत्तेचं तें साधन उपलब्ध करावं. असाच विचार या तरुणांच्या मनानं स्वीकारला. हे सर्वच कार्यकर्ते आपल्या मनाची सर्वांगीण मशागत करण्यांत गुंतले होते. संघर्षासाठी आणि सत्तेसाठी संघटनेची बांधणी करण्याचा गोफ गुंफतांना आपलं वैचारिक सामर्थ्य कमी पडणार नाही याची दक्षता घेतली जाणं आवश्यकच होतं. त्या दृष्टीनं राजकारणावरील ग्रंथांचं वाचन, मनन, चिंतन असा एक कार्यक्रम असे. नमुन्यादाखल एक आठवण ते सांगतात की, त्याच काळांत पं. जवाहरलाल नेहरु यांचं आत्मचरित्र ग्रंथ-रुपानं प्रसिध्द झालं होतं. महत्प्रयासानं या कार्यकर्त्यांनी आत्मचरित्राच्या मूळ इंग्रजी ग्रंथाची ताजी प्रत मिळवली आणि त्याचं सामुदायिक वाचन केलं कराडांत तीन-चार दिवस हा उपक्रम सुरु राहिला होता. एकानं वाचायचं व इतरांनी ऐकायचं असं सुरु होतं. एक दमला की दुस-यानं वाचन सुरु करायचं.

यशवंतराव कोल्हापूरच्या कॉलेजमध्ये होते, परंतु आठवड्यांतले तीन दिवस ते सातारा जिल्ह्यांतच संघटनेच्या कामासाठी खर्च करत राहिले. कोल्हापूरच्या त्यांच्या अनुपस्थितींत त्यांचे एक वर्ग-मित्र श्री. आयाचित हे त्यांची कॉलेजमधली हजेरी लावत असत. परिस्थितीच्या दृष्टीनं कोल्हापुरांत चार दिवस खानावळींत जेवण्यापेक्षा भाड्यासाठी एक रुपया खर्चून सातारा जिल्ह्यांत रहाणं हें त्यांना परवडणारं होतं. मुख्य म्हणजे एक विचारवंत कार्यकर्ता म्हणून सातारा जिल्ह्यानं त्यांना मानलं होतं, स्वीकारलं होतं. यशवंतरावांच्या संग्रहीं सांगण्यासारखं बरंच कांही आहे, असा त्या सर्वांचा दृढ विश्वास होता. त्याचा अनेक दृष्टीनं फायदा झाला. संघटना मजबूत करण्याच्या कामाला त्यामुळे गति मिळाली. लहान-मोठ्या गावांतून हिंडतांना अनेकांचे परिचय झाले. माणसं पारखण्याचं शिक्षण त्यांना या भ्रमंतींतून मिळत रहाण्याचा फार मोठा फायदा झाला. कॉलेजच्या वर्षांतील सात-आठ महिने राजकीय जागृतीचं काम खेड्यापाड्यांतून बहुजन-समाजांत हिंडून करायचं आणि परीक्षेच्या अगोदरचे शेवटचे दोन महिने अभ्यास करुन परीक्षा द्यायची, अशा क्रमानंच १९३८ मध्ये त्यांनी अखेर बी. ए पदवी संपादन केली.