कार्यकारिणीची बैठक त्या दिवशीं ११ जुलैला सायंकाळपर्यंत सुरू होती. बैठक संपतां संपतां निजलिंगप्पा यांनी घाई-गडबडीनं, सेंट्रल काँग्रेस पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीची घोषणा केली. ही बैठक दुस-या दिवशीं, दुपारच्या जेवणाच्या सुट्टीच्या वेळांत घेण्यांत येईल, असंहि त्यांनी सांगितलं. राष्ट्रपतिपदाचा उमेदवार निश्चित करण्यासाठी ही बैठक आयोजिक करण्यांत आली होती.
निजलिंगप्पा यांनी पार्लमेंटरी बोर्डाची बैठक घेण्याची हिकमत केली आणि तिथपासूनच बंगलोरमधील नाटकाची रंगत वाढत गेली. कार्यकारिणीची बैठक संपवून एक एक सभासद बाहेर पडत होते तेवढ्यात इंदिरा गांधी यांनी यशवंतरावांना बोलावलं आणि "जेवणानंतर काय करणार आहांत, आपल्याला थोडा वेळ भेटलं पाहिजे." अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.
"मी मोकळाच आहे." - यशवंतरावांनी सांगितलं.
त्यांची प्रकृति कांहीशी ठीक नव्हती म्हणून मग ते राजभवनवर आपल्या मुक्कामाच्या ठिकाणीं गेले. त्यांनी भोजन केलं तोंवर इंदिराजींचा निरोप त्यांना मिळाला म्हणून मग ते तातडीनं त्यांच्याकडे गेले. फक्रुद्दीन अलि अहंमद हे तिथेच बसले होते. गिरी किंवा जगजीवनराम यांच्या उमेदवारीसंबंधांत इंदिराजीनी विषय काढतांच याबाबत कामराज आणि मोरारजीभाई यांच्याशीं आपण चर्चा करावी असं यशवंतरावांनी त्यांना सुचवलं.
अधिवेशनांतील १२ जुलैचा अर्धा दिवस आर्थिक ठरावावरील चर्चेंत गेला. मोरारजींनी या ठरावावर गैरलागू भाषण करतांच यशवंतरावांनी २५ मिनिटं कणखरपणानं भाषण करून मोरारजींचा चुका दृष्टिकोन अधिवेशनासमोर उघडा केला. बंगलोर अधिवेशनांतील त्यांचं हें भाषण चांगलंच गाजलं.
दुपारी एक वाजतां पार्लमेंटरी बोर्डाची बैठक होणार होती. यशवंतरावांना आता त्या बैठकीचे वेध लागले. बैठकीला जात असतांनाच, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक त्यांना भेटले. आता होणा-या बैठकींत इंदिरा गांधी या जगजीवनराम यांचं उमेदवारीसाठी नांव सुचवणार आहेत असं नाईक यांनी त्यांना सांगितलं. नाईक व जगजीवनराम यांची त्या दिवशीं सकाळी भेट झाली होती. त्या वेळीं जगजीवनराम यांनी ही माहिती नाइकांना दिली आणि चव्हाण यांच्यापर्यंत ते पोंचवा असंहि सांगितलं होतं.
जगजीवनराम यांची उमेदवारी पुढे करून ती एकमतानं मान्य करुन घेण्याच्या दृष्टीनं आता बराच उशीर झाला होता. यशवंतरावांनी नाईकांना परिस्थितीची कल्पना दिली. जगजीवनराम यांची राष्ट्रपतिपदासाठी निवड होणार असेल, तर ती एक उत्तम घटना ठरेल, असंच यशवंतरावांचं मत होतं.
दरम्यान फक्रुद्दीन अलि अहंमद यांनीहि यशवंतरावांना सभामंडपांत गाठलं. या दोघांतील चर्चेच्या वेळीं सेंट्रल पार्लमेंटरी बोर्डाची बैठक कांही काळ लांबणीवर टाकावी, असं यशवंतरावांनी त्यांना सुचवलं. संजीव रेड्डी यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याच्या संदर्भात आपण आता वचनबद्ध असून ऐन वेळीं निर्णय फिरवणं कठीण आहे याचीहि कल्पना त्यांनी दिली.
" परंतु इंदिरा गांधी यांना जगजीवनराम यांचं नांव सुचवायचं आहे."- फक्रुद्दीन अलि अहंमद.
"पंतप्रधानांची तशी इच्छा असेल तर हरकत नाही; परंतु आता इथे होणारी पार्लमेंटरी बोर्डाची बैठक लांबणीवर टाकण्याच्या दृष्टीनं, पंतप्रधानांना तुम्ही कां नाही तयार करत? तसं झालं तर दिल्लीला आपण चर्चा करुं आणि तसा निर्णय करूं." - चव्हाण.