• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

इतिहासाचे एक पान.. २८

सातारा जिल्हा हा संस्थानिक, सरंजामदार, जहागीरदार, वतनदार यांनी त्या काळांत वेढलेला जिल्हा. जातीयतेचं पीक सर्वत्र फोफावलेलं. ब्राह्मण-ब्राह्मणेतर-वादाचीं वेटोळीं सर्वत्र निर्माण झालेलीं. सामान्यांची शेती निकष्ट आणि उपासमारींत ठेवणारी. अज्ञान सर्वत्र पसरलेलं. राजकीयदृष्ट्या जागरुक, परंतु ही जागरुकता विशिष्ट वर्गात अडकून पडलेली. पण याहि परिस्थितींत यशवंतराव म. गांधींचे सत्याग्रही म्हणून तरुंगांत गेले त्या वेळीं बहुजन-समाजांतील हजारोची मनं त्यांनी खेचून घेतलीं. शिकलेला, आपल्यांतला एक तरुण, पुढारी झाल्याचा तो आनंद होता. समाधान होतं. या एका लहानशा घटनेनं गांधींची काँग्रेस या लोकांच्या अंत:करणापर्यंत पोंचली.

यशवंतराव हे सातारच्या मातींतले. कठीण परिस्थितीशीं सामना करुन शिक्षण घेणारे. त्या काळांत निवडक लोकांच्या पंक्त्तीत सामील होऊनहि ते केवळ त्यांचेच बनले नव्हते, तर सामान्य समाजासमोर जाऊन ते उभे राहिले आणि त्या समजाला बरोबर घेऊन पुढच्या पल्ल्याला निघाले. प्रारंभींच्या काळांत त्यांनी सामान्य समाजांतल्या शिक्षितांमध्ये जागृति केली. सामाजिक कामासाठीं त्यांना प्रवृत्त केलं. त्यांच्यासाठीं गणेशोत्सव व शिवजयंति-उत्सव सुरु केले. त्यांची अनुकूल प्रतिक्रिया उमटली. परिस्थिति अनुकूल होती. पण सर्व समाजच बुध्दीनं गुणानं, कर्तृत्वानं आणि परिस्थितीनं मोठा व्हावा, ही तळमळ मनांत होती. त्यामुळे पुढारीपणाची एक पायरी वर चढून जाण्याची संधि मिळतांच, इतरांनाहि वर चढण्यास हात देण्यासाठीं ते मागे वळत राहिले आणि एकेकाला वर घेऊन जिल्ह्यांत त्यांनी पुढा-यांचा आणि कार्यकर्त्यांचा एक संच तयार केला.

स्वस्थ चित्तानं, अवधानपूर्ण राहून यशवंतराव अवती-भवतीं पहात होते. परिस्थिती जाणून घेत होते. कुठलीहि मोठी परंपरा त्यांच्या पाठीशीं नव्हती. तशा घरांत त्यांचा जन्महि झालेला नव्हता; घराच्या मोठेपणाचं श्रेय त्यांना प्राप्त होणारं नव्हतं. पण ज्यानं जिते जन्म घेऊन कळाची कीर्ति वाढवली तोच जन्म श्रेष्ठ मानला जाते असं इतिहासाच्या वाचनानं त्यांना ज्ञात होऊ लागलं. मोठेपण प्राप्त झालं, कर्तृत्वान मोठेपण मिळाल तरी विवेकानं रहावं आणि वर्तावं असं भूगोलाच्या वाचनानं, गंगौघाच्या वर्तनानं त्यांच्या मनांत मूळ धरुं लागलं. हिमालयासारखी उत्तुंग प्रतिष्ठा लाभलेली आणि सागराप्रमाणे विशाल, गंभीर असणारी गंगा विवेकी आहे हा संस्कारहि घडत राहिला. वडील परलोकवासी झालेले त्यांच्या मायेची छाया यशवंतरावांना मिळालीच नाही. मातेच्या दुधांतून मात्र त्यांना अनेक गुण मिळाले. शील, विवेक हे गुण त्यांना आईपासून मिळाले. चारित्र्य, सद्गुण, स्वभाव, मन या गोष्टी मातेच्या दुधांतूनच मिळतात. गुरुकडून नंतर मिळणारं ज्ञान या गुणांना संवर्धित करतं. माताच मुलाला आत्मनिष्ठासंपन्न करुं शकते.

यशवंतरावांच्या मातोश्री विठाई म्हणजे करुणेची नदी होती. स्वभावानं शांत, उदार आणि धर्माचरणी. लोककल्याणांत स्वाभाविक रुचि. विठाईला पतीचा आधार नव्हता - कुणाचाच नव्हता. पण या मातेच्या मनांत प्रभु-प्रेम अपार होतं. तोच आधार होता. मुलांच्या अभ्युदयासाठी शारीरिक, मानसिक खस्ता तिनं त्याच आधारावर काढल्या. मुलं लहान आहेत, पण हीं अंजिराचीं झाडं मोठीं होतील, फुलतील, त्यांच्या कर्तृत्वाला गोजिरवाणीं मधुर फळं येतील हे त्या माऊलीचं स्वप्न. आई हीच चव्हाण-कुटुंबाची श्रीमती होती. वय वाढत असतांना आपण एका सामान्य कुटुंबांतील आहोतं याची जाणीव करुन देणा-या घटना यशवंतरावांच्या अवतीं-भवतीं घडतच होत्या.

जाणिवेनं ते सर्व न्याहाळीतहि होते. पण त्याची खंत त्यांच्या मनाला कधी शिवली नाही.  आईनं निर्माण केलेल्या प्रेमाच्या वातावरणाचा कोश भेदून सामान्यपणाच्या जाणिवा मनापर्यंत कधी पोचल्या नाहीत. यशवंतरावांची आई अशिक्षित-खेड्यांत वाढलेली. पण मनाचा आणि कर्तृत्वाचा पल्ला दांडगा. देवराष्ट्राच्या सगुण मातीचे गुण विठाई-माऊलीच्या रोमरोमांत होते. आयुष्यांत तिनं कुणाचा राग केला नाही. द्वेष केला नाही. मनानं धार्मिक आणि वृत्तीनं सरळ.