बहुसंख्य समाज हा खेड्यापाड्यांतून विखरलेला अशिक्षित गरीब, अडाणी समाजाच्या दुस-या थरांत असलेला असा होता. शहरवासीय सुशिक्षित किंवा बहुजनसमाजांतील जातकुळी उच्च मानणारे, हे या वर्गाची पिळवणूक करण्यांत गुंतलेले असत. त्यामुळे या दोन थरांमध्ये कायमचंच अविशअवासाचं वातावरण निर्माण झालेलं असे. संकटकाळी किंवा जमिनीचा कबजा वगैरे प्रश्न निर्माण होतांच सारा गाव एक होत असे. त्यांच्यांतील श्रीमंत, सरदार, वतनदार हे कांहीहि म्हणोत, त्यांच्याविरुध्द गावाचा एक आवाज असायचा. गाव करील तें राव काय करील, अशी स्थिती निर्माण होत असे. या खेडून मंडळींना, इंग्रज लोक काय करतात, राज्य कुणाचं आहे, स्वातंत्र्य, समता, लोकशाहीचं मूल्य म्हणजे काय, वगैरेबाबत सुरु असणा-या चर्चेंची क्वचितच गंधवार्ता असे. त्यांच्यांत जागृति करण्यासाठी म्हणून जे येत तेहि परिस्थितीनं किवा जात-पोटजातीनं वरच्या थरांतीलच असल्यानं, या दोघांमधील दुरावा कायमच राहिला. सर्वसामान्यांना देशनिष्ठेपेक्षा ग्रामनिष्ठाच अधिक अभिप्रेत होती. नेत्यांच्या निर्णयापेक्षा गाव-पंचांचा निर्णय मान्य करण्याची व तसं वागण्याची त्यांची परंपरागत वृत्ति होती.
इंग्रजी शिक्षण हें सर्वांसाठी खुलं होतं, पण ते त्या वेळीं संपादन केलं ब्राह्मण व कांही पांढरपेशा उच्च म्हणणा-या जातींनी. बहुजन-समाजांतील उच्च कुळींतल्या सरदारांना तें शिक्षण आपल्या समाजांतील तरुणांना उपलब्ध करुन देतां येणं सहज शक्य होतं. पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर यांच्यांतील दरी रुंदावतच राहिली. सरकारी नोकरींतल्या बहुतेक प्रतिष्ठेच्या जागा, सुशिक्षित ब्राह्मण तरुणांनीच व्यापल्या आणि गरीब, खेडूत समाजाची उपेक्षा होत राहिली. पिळवणुकीचं तें भक्ष्य ठरल्यानं या दोन वर्गांतले वैर वाढलं. इंग्रजांच्या कच्छपीं असणारांनी मराठा व मराठेतर असा भेदहि आपल्या वागण्यांत ठेवल्यानं, सा-या समाज-जीवनाच्याच चिंध्या झाल्या. हिंदु समाजापुरतंच हें मर्यादित होतं असं नव्हते. मुसलमान समाजांतहि हेंच दृश्य होतं. या जातींतला बहुसंख्य समाज हा मुल्ला-मौलवींच्या शिकवणुकीनं चालणारा, धर्मनिष्ठ असा होता. तो सारा गरीब होता. या जातींतले जे आंग्ल-विद्याविभूषित होते त्यांनीहि आपली सद्दी कायम टिकवण्यासाठी. मुसलमान समाजांतील बहुसंख्याकांना, अशिक्षित, अडाणी आणि गरीबच राहूं दिलं. त्यांच्यांतील कडव्या धार्मिकतेचा लाभ घ्यायचा तर त्यांना तसं राहूं देण्यांतच त्यांच्यांतील उच्चभ्रूंचा स्वार्थ कदाचित् लपलेला असावा. पारशी, मुसलमान, ब्राह्मण आणि मराठा यांच्यांतील जे उच्चभ्रू, ते राजकीय किंवा सामाजिक चळवळींत आणि उर्वरित सारा समाज हा त्यांच्यापासून अलग, परिस्थितीनं गांजलेला, अशीच एकूण त्या काळांतली परिस्थिती होती.
यशवंतराव कराडांत टिळक हायस्कूलमध्ये शिकत होते त्या वेळच्या समाजाची ही स्थिती ते पहात होते. ते जें अखंड वाचन, मनन, चिंतन करीत त्यांतून मग त्यांच्या मनाची एक वेगळी घडण होऊं लागली. मराठा समाजांतीलच खानदानी, कोणत्याहि कारणानं का असेना, पण गरिबीचं शिफारसपत्रहि गरीब विद्यार्थ्यांना देण्याइतपत फुकाचा मनाचा मोठेपणा दाखवूं शकत नाहीत, हा अनुभव त्यांच्या संग्रही होताच. स्वातंत्र्यासाठी देशांत चळवळ सुरु आहे, म. गांधींसारखे नेते त्यासाठी आवाहन करत आहेत, पण बहुजन-समाज हा थंड आहे हेंहि ते अनुभवत होते. यशवंतरावांचा मूळ पिंड खेड्यांतला. खेड्यांतच तो वाढला. परंतु बुध्दि-शक्तिनं अंकुरला तो कराडांत टिळक हायस्कूलमध्ये शिकत असतांना - पुढे महाविद्यालयांतल्या शिक्षणाच्या वेळीं कांही निवडक व्यक्तींच्या आणि ग्रंथांच्या साहचर्यानं, विचारांच्या सोबतीनं ! बहुजन-समाजांतला मध्यमवर्ग आणि जीवनाच्या दृष्टीनं स्थिर बनलेली मंडळी स्वत: देश-कारणांत येऊन आपल्या समाजाला राजकीय, सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती बदलण्यासाठी प्रेरित न करतां त्यांना आहे त्या स्थितींतच राहूं देण्यांत समाधान कां मानतात, हें त्यांना त्या वेळीं उमजत नव्हतं. इंग्रजी शिक्षण संपादन केल्यानं यशवंतराव ह स्वत:हि आता मध्यमवर्गांत जमा होऊं लागले होते. पण त्याच वेळीं त्यांचं मन त्यांना बजावत होतं की, आपण स्वत:च बहुजन-समाजांत जाऊन, त्यांना त्यांच्या भाषेंत सर्व समजावून सांगितलं पाहिजे आणि स्वातंत्र्य-चळवळीचा प्रवाह वाढण्यासाठी बहुजन-समाजाच्या प्रचंड शक्तीचा संगम या चळवळीच्या उद्दिष्टांशी घडविला पाहिजे. आणि पुढे १९३० च्या म. गांधींनी सुरु केलेल्या असहकाराच्या चळवळीनं यशवंतरावांना ती संधि चालून आली. आधी केलं मग सांगितलं, याच तत्वाचं पालन करण्याचं त्यांनी ठरवलं आणि १९३० च्या चळवळींत स्वत:च एक सत्याग्रही म्हणून प्रथम उडी घेतली. त्याच वेळीं पुण्याच्या सत्यशोधक-समाजाचे नेते केशवराव जेधे आणि अनेक तपं दलितांच्या सेवेंत जीवन घालविलेले विठ्ठल रामजी शिंदे हे या चळवळींत सामील झाले.