समाजसेवेसाठी विचारवंत, महिला, साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि विविध क्षेत्रांत कार्य करणारे कार्यकर्ते या सर्वांनाच महाराष्ट्राचा जगन्नाथाचा रथ पुढे नेण्यासाठी हातभार लावण्याचं त्यांचं आवाहन होतं. ज्ञानी, बुध्दिवान्, विद्वान यांनी कोणाच्याहि आमंत्रणाची वाट न पाहतां स्वयंस्फूर्तीनं पुढे येऊन आपली ज्ञानगंगा सा-या समाजापुढे खुली करावी, ज्ञानी माणसाच्या सेवेची शासनाला गरज आहे यासाठी आवाहन तर त्यांनी केलंच, शिवाय शासनाची भूमिकाहि स्पष्ट केली.
समाजानं आणि शासनानंहि विद्वानांची कदर केली पाहिजे हा दृष्टिकोन मान्य करून ते सांगतात की, “शासन अशी कदर करत नसेल, तर ते शासन पुरोगामी म्हणतां येणार नाही. शासनाकडून जेवढं सहकार्य मिळेल तितकं कार्य करूं अशी कांही विद्वानांची भूमिका असते; परंतु त्यांनी अशी अट न घालतां, ज्ञानाच्या उपासकानं कोणत्याहि शासनाच्या मेहरबानीवर जगतां कामा नये; कदर होत नाही म्हणून बाजूला न रहातां आग्रहानं ते पुढे आले तरच ते खरे ज्ञानवंत, असं मानलं जाईल. सामाजिक परिवर्तन हे ज्ञानी विद्वानांच्या विचारमंथनांतूनच होत असल्यामुळे ज्ञानासाठी ज्ञानाची उपासना करणारांची एक प्रचंड आघाडी महाराष्ट्रांत निर्माण झाली पाहिजे.”
नव्यानं निर्माण झालेल्या एकसंधी महाराष्ट्रामागे महाराष्ट्राचं एकजिनसी मत उभं करण्यासाठी, भावनात्मक ऐक्याचा नाजूक प्रश्र्न स्त्रियांच्या नाजूक हातांनी लवकर सुटूं शकेल, असं त्यांनी एका महिला-सभेंत आपलं मत सांगितलं. राजकारणाच्या आवारांत निर्माण झालेले मतभेद कोर्टाच्या आवारापेक्षा घरांतल्या दिवाणखान्यांत अधिक सुकरतेनं सुटूं शकतील, परंतु यासाठी महिला कार्यकर्त्यांनी अनौपचारिकरीत्या एकत्र येऊन हे काम करायला हवं; सामाजिक मत एकत्र करण्याच्या पुरुष मंडळींच्या प्रयत्नाला स्त्रियांचा हातभार लागण्यानंच ते यशस्वी होईल, असं महिलावर्गाला समजून सांगण्याचा त्यांचा प्रयत्न होता.
तमाम जनतेशी हा संवाद करत असतांना, ते ज्या पक्षाचे मुख्य मंत्री होते त्या काँग्रेस-पक्षातल्या कार्यकर्त्यांना, या काळांत त्यांनी कामासाठी चांगलंच वेठीला धरलं. पक्षाच्या जाहीर सभांपेक्षाहि शिबिराचा उपयोग त्यांनी कार्यकर्त्यांची मानसिक तयारी घडवण्यासाठी प्रामुख्यानं करून घेतला. सत्ता स्थिर होत आहे असं जेव्हा आढळतं तेव्हा सत्ताधा-यांच्या सभोवती सकारण वा अकारण घोटाळणा-या, गर्दी करणा-या कार्यकर्त्यांचे संच गावोगावी तयार होऊं लागतात. पुढारी, मंत्री यांच्या आगमनाच्या वेळी गर्दी करून आपला चेहरा दाखवणं हेच पक्षाचं कार्य, अशी त्यांची सोयिस्कर समजूत झालेली असते. राजकीय गुजराण करण्यासाठी कार्यकर्त्यांना तेवढं भांडवल हवं असतं.
हा दोष सर्वस्वी कार्यकर्त्यांचाच असतो असं नाही, कांही मंत्र्यांनाहि ही गर्दी जमवण्याची चटक लागलेली असते. कांही आढ्यतेखोर मंत्री तर लोकप्रियतेचा देखावा निर्माण करण्यासाठी आपल्या आगमनाच्या वेळी कार्यकर्त्यांची जास्तीत जास्त गर्दी उभी करून त्यांच्याकडून पुष्पहारांची उधळण करून घेण्यासाठी खटपटी, लटपटी करण्यांत गुंतलेले असतात. स्वागतासाठी शाळकरी मुलांना वापरून घेण्याचा कांहींचा हव्यास असतो. त्या गावांतले जुने, जाणते, प्रतिष्ठित समजले जाणारे पुढारीहि स्वागता उपस्थित असले पाहिजेत, असाहि कांहींचा कटाक्ष असतो. आपल्यांतलाच कालचा एक कार्यकर्ता, नशिबानं आज मंत्री बनला म्हणून हारतुरे घेऊन गावच्या वेशीवर त्यांच्यासाठी ताटकळत उभं रहाणं हे जुन्यांच्या मनाला वस्तुतः खटकत असतं. त्यामुळे ते फक्त समारंभाच्या ठिकाणीच उपस्थित रहातात; परंतु स्वागताच्या वेळी न आल्याबद्दल रागावलेले मंत्री, अशा जुन्या कार्यकर्त्यांची दखल तर घेत नाहीतच, पण पोरासोरांशी गप्पा करत या जुन्या जाणत्यांवर मधून मधून रागानं दृष्टिक्षेप टाकत रहातात.