त्यापूर्वी मुंबईच्या गोदी-कामगारांनी मुख्य मंत्र्यांचा सत्कार करण्याचा पहिला मान मिळवून यशवंतरावांच्या मुख्यमंत्रिपदाच्या निवडीनं शेतकरी-कामकरी राज्याची आणि लोकशाही समाजवादी नांदी झाल्याचं महाराष्ट्राला विदित केलं होतंच. महाराष्ट्र प्रदेश-काँग्रेसनं दि. २१ ऑक्टोबरला त्यांचा सत्कार केला. ही संधि साधून त्यांनी मोकळ्या मनानं आपले राजकीय विचार जाहीर केले आणि माझ्या कार्यांत सहकार्य करा अशी जाहीर भिक्षा मागण्यासाठी आलों आहे, असा प्रस्ताव केला. वडील असतील त्यांनी आशीर्वाद द्यावा, बरोबरीचे असतील त्यांनी सहकार्य द्यावं, असं त्यांचं मागणं होतं. गुंतागुंतीचे प्रश्न सोडवण्यासाठी कांहीहि शक्य होणार नव्हतं. वातावरण बदलून परस्पर-सहकार्याची आणि विश्वासाची भावना निर्माण झाल्याशिवाय महाराष्ट्राचं पाऊल पुढे पडणार नव्हतं. “जनसेवेचं साधन या दृष्टीनंच मी सत्तेकडे पहातों, त्याचसाठी उपयोग व्हावा असं माझं मत आहे. सेवेचं मंगल कंकण मीं बांधलं आहे. ज्या योगायोगानं मी नेतेपदीं निवडला गेलों तो योगायोगच मला नव्या जबाबदारींत यशस्वी करील अशी आशा मी बाळगून आहे.” यशवंतरावांनी आपल्या मनांतल्या भावना अशा माफक, पण जिव्हाळ्याच्या शब्दांत व्यक्त करतांच त्यांची बुद्धिमत्ता, धैर्य, प्रामाणिकपणा आणि राजकारणपटुत्वाविषयी त्याच सभेंत त्यांच्यावर स्तुतीचा वर्षाव झाला.
पुढे आठवड्याभरांत, २८ ऑक्टोबरला सातारकर कामगारांतर्फे यशवंतरावांचा मुंबईत सत्कार झाला. या समारंभांत तर त्यांनी अधिक खुलेपणानं मनोगत सांगितलं. यशवंतराव हे सातारा जिल्ह्याचे रहिवासी. मुख्य मंत्री झाल्यानंतर लोक आणि ते स्वत: यामध्ये अंतर पडण्याची शक्यता निर्माण झाली. लोकांच्या मनांतले हे तरंग ओळखून यशवंतरावांनी या सत्काराच्या वेळी लोकांना दिलासा दिला की, “माझ्या कचेरीचा दरवाजा चोवीस तास खुला आहे. मी चुकत आहे असं ज्या कुणाला वाटत असेल त्यानं खुशाल यावं व माझी चूक मला समजावून सांगावी. मी चुकलों आहे किंवा चुकत आहे असं आढळून आलं, तर धोरणांत बदल करण्यास मी मुळीच अनमान करणार नाही.
“सातारकर मंडळी सत्कार करत आहेत याचा अर्थातच आनंद आहे, पण मुंबईतल्या सातारकर मंडळींवर आता मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. मुंबईंतली सातारकर मंडळी यापुढे कशी वागणार इकडे सर्व लोक बारकाईनं बघत रहाणार आहेत. तेव्हा प्रत्येक सातारकर माणसानं आपणहि थोडेसे मुख्य मंत्री आहोंत या जाणिवेनं व जबाबदारीनं वागलं पाहिजे. माझ्यावर जी जबाबदारी टाकलेली आहे ती माझ्या वैयक्तिक गुणांमुळे नसून १९२० व १९३० सालीं ज्या नव्या शक्ति जन्मास आल्या त्या शक्तींचा मी प्रतिनिधि आहे, म्हणून ही जबाबदारी टाकण्यांत आली आहे. शिक्षणाची आवड, जन-जागृति, निरोगी राष्ट्रवादाचा जन्म, आर्थिक व सामाजिक न्यायाची जाणीव या गोष्टी खेड्यापाड्यापर्यंत शिरल्या व त्यांतूनच या नव्या शक्तीचा जन्म झाला. या शक्ति जिवंत राहिल्या, कार्यक्षम राहिल्या, तरच मला यश मिळणार आहे.
“या शक्तीचं संवर्धन करण्याकडे सर्वांनीच लक्ष दिलं पाहिजे. व्यवसायानं मी शेतकरी नसलों तरी संस्कार शेतक-याचेच आहेत. खेड्यांतलं दारिद्र, अज्ञान यांची मला जाणीव आहे. तें कमी करण्याचा माझा प्रयत्न राहील. तें शक्य न झाल्यास एक लाख वेळा जरी मुख्यमंत्रिपद मिळालं तरी त्याचा उपयोग नाही. जबाबदारीची मला चिंता आहे. माझ्यावर प्रेम करणारे जसे आहेय तसेच विरोधकहि आहेत; पण त्यामुळेच माझ्यांतली ईर्षा वाढते व कामाचा मला हुरूप येतो.”
प्रगट आत्मचिंतन करतच, यशवंतराव त्या काळांत महाराष्ट्रामध्ये फिरत राहिले, बोलत राहिले. त्यांच्या शब्दाशब्दांतून सहकार्याचं आवाहन, जबाबदारीची चिंता, जबाबदारी पार पाडण्याबद्दलचा आत्मविश्वास हें प्रतीत होत राहिलं. त्याचबरोबर विस्कटलेला मराठीभाषी प्रदेश मतभेद विसरून एकजीव व्हावा, मराठी आणि गुजराती राज्यांत बंधुत्वाचं नातं निर्माण व्हावं आणि आदर्श, कार्यक्षम राज्यकारभाराचा नमुना म्हणून द्वैभाषिक मुंबई राज्य भारतासमोर यावं ही अंतराची ओढहि त्यांतून व्यक्त होत राहिली. मुंबईंतली सातारकर मंडळी यापुढे कशी वागणार याकडे सर्वांचं बारकाईनं लक्ष रहाणार आहे, या त्यांनी दिलेल्या इशा-यांतली गोम ज्याला उमजेल त्यालाच यशवंतरावांच्या चौफेर चिंतेचा आणि चिंतनाचा आवाका उमगूं शकेल.