विविधांगी व्यक्तिमत्व-६२

मुंबईहून प्रसिद्ध होणार्‍या दै. ‘महाराष्ट्र टाइम्स’चे माजी संपादक द्वा. भ. कर्णिक यांना ना. यशवंतराव चव्हाण दिल्लीतील महाराष्ट्राचा मान वाटतात. त्यांच्या कर्तृत्वाचे आलेखन करताना कर्णिक म्हणाले, ना. यशवंतराव चव्हाण यांनी पंडितजींवर, काँग्रेसश्रेष्ठींवर, दिल्लीवर छाप टाकली, ही आपल्या निष्ठेची त्यांना जाणीव करून देऊन ही जाणीव त्यांनी अबोल कर्तृत्वाने करून दिली हे विशेष आहे. ना. यशवंतराव चव्हाण दिल्लीच्या लोकांना उठून दिसतात ते त्यांच्या मुंबई व महाराष्ट्र राज्यातील कर्तृत्वाने. त्यांचे दर्शन व भेट ज्यांना होते त्यांना ते अघळपघळ बोलताना दिसत नाहीत, अवास्तव घोषणा करताना तर मुळीच दिसत नाहीत. यशवंतराव चव्हाण यांचा व्यासंग चांगला, आणि बोलण्यात ते वाकबगार आहेत. पण त्यांनी मितभाषित्व हा आपला बाणा केला आहे. जे काही ते बोलतात ते मोजके व मुद्देसुद असते. राजकीय जीवनात लोकांना कृतिशून्य पण शब्दसूर लोकांच्या तोंडाचा पट्टा चाललेला ऐकण्याची सवय झाल्यामुळे या अबोल व मितभाषी अशा ना. यशवंतरावांची त्यांच्यावर साहजिकच अधिक मोहिनी पडते.

पुण्याहूत प्रसिद्ध होणार्‍या दै. ‘केसरी’चे सहसंपादक रामभाऊ जोशी यांनी घट्ट ओठांचा निग्रही नेता म्हणून ना. यशवंतराव चव्हाणांचा गौरव करताना म्हटले आहे, यशवंतराव महाराष्ट्रात वावरले ते विवेकाची चूळ तोंडात ठेवून. आज देशात वावरत आहेत तेही विवेकाने. यशवंतराव पुष्कळ सांगतात, पुष्कळ त्यांना सांगावयाचे असते पण त्यात पाल्हाळ नसतो हा नेहमीचाच अनुभव आहे. देशातल्या प्रत्येक समस्येबाबत त्यांची मते ठाम आहेत, पण अधिकाधिक अर्ध्या तासाच्या भाषणात ते ती सांगून मोकळे होतात. अनेकदा त्यांचे अर्थपूर्ण मौन, त्यांचा मितभाषीपणा अनेकांच्या मनात संशयाचे काहूर माजवतो. टीकेला प्रवृत्त करतो. अनेक राजकीय संकटे त्यांच्या समोर उभी असतात, पण ओठ घट्ट ठेवून प्रत्यक्ष कृतीला त्यांच्या कृतीला जेव्हा प्रारंभ होतो त्यावेळी त्यांची प्रतिमा अधिकच सतेज बनते. ऊन-पावसाचा हा खेळ यशवंतरावांच्या जीवनात अव्याहत सुरू आहे.

दै. ‘मराठवाडा’, औरंगाबादचे संपादक मा. यशवंतराव चव्हाण दिल्लीला गेल्यावर त्याच तोडीचा राजकारणी पुन्हा महाराष्ट्राला मिळाला नाही असे सांगून राजकारणाचा यशोसोपान यशवंतराव लिलया चढून उगवत्या सूर्याला नमस्कार करणार्‍या काँग्रेस संस्कृतीमुळे काहीसे पिछाडीला पडल्यासारखे वाटत असले तरी महाराष्ट्रीयन माणसाच्या मनात त्यांच्याविषयी असलेली आत्मीयता ही कधी कमी झाली नाही. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ज्या पद्धतीने राजकारण या देशात रुजले त्यातून एकदा खुजेच नेतृत्व जन्माला आले. यशवंतरावांचा मात्र त्याला अपवाद ठरला. या नेत्याने महाराष्ट्राच्या राजकारणात एक विशिष्ट उंची प्राप्त करून घेतली होती. त्यामुळे महाराष्ट्रातील स्वत:ला बुध्दीवादी समजणारा आणि काँग्रेस संस्कृतीपासून फटकून राहणारा पांढरपेक्षा वर्गही यशवंतरावांच्या व्यक्तिमत्त्वापुढे नामोहरम झाला. काँग्रेस पक्षाच्या एकगठ्ठा पद्धतीच्या राजकारणातही यशवंतरावांनी आपल्या कौशल्याने डूब दिली ती निश्चितच महत्त्वपूर्ण होती. यशवंतरावांनी दिल्लीला गेल्यानंतर त्यांच्या तोडीचा राजकारणी पुन्हा काही महाराष्ट्राला पुढे मिळाला नाही. सारी प्रजा खुरटी निघाली.

पत्रपंडित पां. बा. गाडगीळ यांचा नेहरूंच्या समाजवादावर जेवढा विश्वास तेवढा ना. यशवंतराव चव्हाण यांच्या मजबूत नेतृत्वावर होता. या मजबूत नेतृत्वाची थोरवी गाताना गाडगीळ म्हणतात, दिल्लीत मंत्रिमंडळात जाऊनही ज्यानं महाराष्ट्रात पाठिंबा टिकविला, महाराष्ट्राच्या दैनंदिन प्रश्नात आपले लक्ष कायम ठेवले, महाराष्ट्राची प्रतिष्ठा दिल्लीत वाढवली या तीनही गोष्टी एकटयाने करणारे ना. यशवंतराव चव्हाण पहिलेच महाराष्ट्रीय पुढारी आहेत. आर्थिकदृष्टया महाराष्ट्र मागासलेला आहे म्हणून अंतर्गत राजकीय तेढी महाराष्ट्रास परवडणार नाहीत याची पूर्ण जाण असलेले व ती सतत मनाशी बाळगून गेली कित्येक वर्षे वागत आलेले ना. यशवंतराव हेच पहिले महाराष्ट्रीय पुढारी आहेत. संयुक्त महाराष्ट्र समितीने महाराष्ट्र राज्य मिळविले, पण त्या समितीचा सर्वमान्य असा पुढारी न मिळविता आल्याने महाराष्ट्रात बजबजपुरी माजण्याचा धोका उदभवला होता. ना. चव्हाणांनी त्यावेळी महाराष्ट्र काँग्रेस संघटित करून व राज्यसत्ता हाती घेऊन महाराष्ट्रातील बजबजपुरी टाळली. विरोधी पक्षांशी कमीत कमी विरोधाने व जास्तीत जास्त सलोख्याने ना. यशवंतराव वागत आले आहेत. काँग्रेस पक्षातील एकोपा अत्यंत अडचणीच्या काळात ना. चव्हाणांनी जितका टिकविला तितका दुसर्‍या कोणाला टिकविता आला नाही.