मुख्यमंत्री, संरक्षणमंत्री, गृह, अर्थ, परराष्ट्रमंत्री, विरोधी पक्षनेते पदावरून त्यांनी विधिमंडळामध्ये-लोकसभेत जी वेळोवेळी भाषणे केली असून त्यातून त्यांचे संसदीय नैपुण्य पुरेपूर व्यक्त होते. विरोधी पक्षसदस्यांना विश्वासात घेण्याचे आपले स्वत:चे खास तंत्र होते. ते एक मातब्बर संसदपटू असल्याची साक्ष त्यांच्या अनेक समकालिनांनी दिली आहे.
सभागृहातले त्यांचे वक्तव्य अभ्यासपूर्ण व वस्तुनिष्ठ तर असायचेच, शिवाय जनहितैकबुद्धी त्यांच्या मुळाशी असल्याची साक्ष ऐकणार्याला ताबडतोब मिळत असे. 'स्टेटसमन' च्या संपादकाने म्हटल्यानुसार 'त्यांच्या भाषणात खोचक वाक्यांच्या फैरी नसल्या, तरीही ती प्रभावी होत. कारण त्यातून त्यांचे प्रसंगावधान, वैचारिक समतोलपणा, क्लिष्ट समस्यांची उकल करण्यासाठी लागणारा चिवटपणा, त्यांच्या विधानांचा समयोचितपणा व संयमपणा श्रोत्यांच्या प्रत्ययास येत असे.''
श्री. कुन्हीकृष्णन् हे आपल्या 'चव्हाण अॅण्ड दि ट्रबल्ड डिकेड' या ग्रंथात लिहितात, ''यशवंतराव चव्हाण त्या काळात सत्तारूढ बाकावरचे ते सर्वोत्तम वक्ते ठरले होते. सभागृहातच नव्हे, तर बाहेर सुद्धा. वक्तृत्व हे चव्हाणांच्या नेतृत्वाचे मौलिक साधन झाले होते. श्रोत्यासमोर लांबलचक प्रवचने ते कधीच झोडीत नसत. मोजके आणि प्रसंगोचित तेवढेच बोलत.''
इंग्रजी लेखक व प्रसिद्ध पत्रकार वेल हँजेन यांनी 'ऑफ्टर नेहरू हू' या आपल्या ग्रंथात चव्हाणांच्या वक्तृत्वाबद्दल एक मार्मिक तुलना केली आहे. ते म्हणतात, ''मुलींच्या शाळेचे उदघाटन असेल, तर चव्हाण स्त्री-शिक्षण विषयावर बोलतील, मोरारजी कदाचित आत्मसुखत्यागाचे बोधामृत अशा प्रसंगी पाजतील तर नेहरू आपण कशाचे उदघाटन करतो, हेच साफ विसरून अणुबाँब चाचणी आणि आशियाचे भवितव्य असल्या विषयावर विचार मांडतील.''
१९६६ साली संरक्षणमंत्री असताना स्वातंत्र्यदिनानिमित्ताने सैनिकाला व जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात म्हणतात, ''भारतीय सैनिकांनी या देशातील नागरिकांविषयी जशी राष्ट्रीय भावनेने आस्था बाळगली पाहिजे, तसेच नागरिकांनीही सैन्याकडे कौटुंबिक भावनेने पाहिले पाहिजे. रक्त गोठविणार्या हिमालयाच्या थंडीत, उष्णतेने भाजून काढणार्या राजस्थानच्या सीमेवर किंवा आसामच्या किर्र झाडीत आपल्या सीमेचे रक्षण करीत उभा असलेला भारतीय सैनिक आपल्या विशाल कुटुंबाचा घटक आहे, या भावनेने आपण वागले पाहिजे. त्यांच्याशी आपले नाते कृत्रिम नाही, कौटुंबिक जिव्हाळ्याचे आहे असे मानले, तर भारतीय सैनिकांच्या खडतर जीवनात त्याला मोठा आधार वाटेल. हे समजावून घेण्याचा प्रयत्न करून त्याप्रमाणे आपण वागले पाहिजे, कारण प्रत्येक नागरिकाचे वर्तन कसे आहे, यावर आपल्या राष्ट्राचे भवितव्य अवलंबून आहे.''
''सर्वांना विकासाची समान संधी मिळाली पाहिजे, जीवनमानातील विषमता नाहीशी करणे आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील शोषण थांबविणे हे समाजवादाचे तीन निकष आपल्यापरीने महत्त्वाचे असले तरी आर्थिक आणि सामाजिक विषमता नष्ट करणे, हा समाजवादाचा गाभा म्हटला पाहिजे. केवळ घोषणा करून समाजवाद अवतरत नसतो. समाजवादाच्या मार्गावरील प्रवास प्रदीर्घ कठीण आणि कष्टप्रद असतो. मात्र हा प्रवास आपल्याला केलाच पाहिजे कारण तशी आपली प्रतिज्ञाच आहे. समाजवाद पुस्तकातून अवतरत नाही. कृती कार्यक्रमातून त्याचा प्रत्यय येत असतो. आपल्या घोषणा जेव्हा कृतीत येतील तेव्हाच आपण आपल्या कर्तव्याला जागलो असे होईल. आपला उच्चार आणि आचार यात तफावत पडली, म्हणूनच काँग्रेसला १९६७ साली अनेक राज्यात पराभव पत्करावा लागला. कारण लोक म्हणतात 'तुम्ही बोलता खूप, पण करता मात्र थोडे ! म्हणून यापुढे ही चूक घडता कामा नये' हे विचार २८.१२.१९६९ रोजी मुंबई येथे भरलेल्या अ. भा. काँग्रेसच्या ७३ व्या अधिवेशनात बोलताना व्यक्त केले.