माझ्या कल्पनेतील खेडे' या विषयावर यशवंतराव पुणे आकाशवाणीवरून केलेल्या भाषणात आपले मनोगत व्यक्त करताना म्हणतात, ''ज्या खेडयातला समाज आपले सगळे प्रश्न एकमेकांच्या जिव्हाळ्याने आणि समजुतीने सोडविण्याचा एकत्र बसून निर्णय करू शकतो, असे पंचायतीचे जीवन जगणारे खेडे, तुमच्या - माझ्यापुढे असले पाहिजे.'' असे नवे खेडे, नवा माणूस यशवंतरावांनी निर्माण केला.
दिनांक ६ जानेवारी १९६० रोजी सांगली येथील भाषणात महाराष्ट्रातील समस्यांवर नवदीक्षित बौद्धांच्या प्रश्नावर मूलगामी विचार प्रामुख्याने मांडला. ''हजारो वर्षे आपल्या समाजाचा एक घटक अंधारात होता, तो आता जागृत झाला आहे. त्याची जिद्द व जागृती आपण ओळखली पाहिजे. जिद्दीच्या जागृत मनाच्या हक्काची मागणी म्हणून त्यांचे माणुसकीचे अधिकार त्यांना मिळाले पाहिजेत. आज मोठया शहरापेक्षा खेड्यापाड्यातून या समतेच्या भावनेची गरज आहे.
महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाच्या अनेक दिशा त्यांनी आपल्या भाषणांतून दाखविल्या आहेत. इतिहासाची त्यांना लाभलेली दृष्टी, प्रश्नांच्या अंतरंगात शिरून त्यांचे मूळ शोधणारी त्यांची तत्त्वचिंतकवृत्ती आणि लोकशाही, समाजवाद, मानवता या मूलभूत मूल्यांवर असलेला त्यांचा अढळ विश्वास यांचे दर्शन पदोपदी त्यांच्या भाषणातून वाचकांना होते.
दिल्लीच्या लालकिल्ल्यात भरलेल्या कविसंमेलनप्रसंगी घडलेली ही घटना आहे. मेजर जनरल चौधरी यांना भारत-पाक संघर्षाच्या वेळी शंभराच्या नोटांची माळ श्रीमती रमा जैन यांनी घातली. त्यावेळी प्रचंड जनसागरापुढे यशवंतरावांनी नम्रपणे केलेली भाषणाची सुरूवात अशी होती, ''मी कवी नाही की याप्रसंगी बोलण्याचा मला अधिकार नाही. पण आज सीमाक्षेत्रावरील रणांगणावर आपल्या जवानांनी व वीर हुतात्म्यांनी रक्ताने जे महाकाव्य लिहिले आहे, त्यांना मी वंदन करतो.''
स्व. डॉ. प्रभाकर माचवे हे आपल्या आठवणींत लिहितात-केशवसुतांच्या जन्मशताब्दीनिमित्त दिल्ली येथील साहित्य अकादमीत ग्रंथ विमोचनाचा समारंभ होता. साहित्यिकांच्या निवडक श्रोतृसभेत केशवसुतांबद्दल प्रा. विं. दा. करंदीकरांनी इंग्रजीत वक्तृत्व करून आपला प्रोफेसरी अभिप्राय दिला की, केशवसुतांच्या केवळ तीन-चार कविताच श्रेष्ठ साहित्यकक्षेत मोडतील वगैरे. यशवंतरावांनी अध्यक्षीय भाषणात केशवसुतांच्या प्रेरणादायी ओळीच्या ओळी उदधृत करून शेवटी म्हणाले ''कवी, प्राध्यापक, टीकाकार काही म्हणोत, तरुणपणी आम्ही ज्या ध्येयाने भारावून गेलो होतो त्या सामाजिक समतेची प्रेरणा केशवसुतांनी दिली. 'ब्राह्मण नाही हिंदूही नाही न मी एक पंथाचा-तेच पतित कीजे आखडती प्रदेश साकल्याचा' हा संदेश केशवसुतांचाच. स्वत:ला गाढ व्यासंगी म्हणविणार्या कित्येक विद्वानांना यशवंतरावांनी आपल्या मार्मिक वक्तव्याने सहज निष्प्रभ केले होते.
१९६५ साली नांदेड येथे ४७ वे मराठी नाटय संमेलन झाले होते. अध्यक्ष पु. ल. देशपांडे आणि उदघाटक होते यशवंतराव चव्हाण. या व्यासपीठावर आचार्य अत्रे यांचे प्रारंभी भाषण झाले. त्या भाषणात खोडसाळपणे अत्रे म्हणाले, ''मुंबईहून एवढा मोठा प्रवास करून मी आलो. रस्ते दगडधोंडयांनी भरलेले, धूळ तर अवर्णनीय होती. मराठवाडयातल्या रस्त्यावरली धूळ खात खात येथपर्यंत येऊन पोहोचलो. नामदार यशवंतरावांच्या राज्यात रस्त्याची ही स्थिती...!'' अत्र्यांच्या नंतर ना. यशवंतराव उभे राहिले नि हसत हसत त्यांनी सुरुवात केली, ''आचार्य अत्रे यांनी धुळीची तक्रार केली! पण नेहमी दुसर्याला धूळ चारणार्याने एकदा तरी स्वत: धूळ खावी ना!'' आणि आचार्य अत्रे यांच्यासह सर्वजण हास्यकल्लोळात बुडून गेले.
दि. ८ एप्रिल १९६६ रोजी कर्हाड येथे झालेल्या भाषणामध्ये 'राष्ट्राच्या सामर्थ्यावर' (विषय) यशवंतराव सांगून जातात-नवनव्या शोधांनी समाजातील गरिबी व दारिद्रय हटविता येते, असे अनुभवांती सिद्ध झालेले आहे. आपल्या देशात या कामाला प्रयत्नपूर्वक लागणारी आवश्यकता आहे. रशियासारखे देशही विधायक वृत्तीने शेती, शिक्षण यासारख्या प्रश्नांच्या प्रगतीचा विचार करतात. केवळ राजकीय विचाराने हे केले जाते किंवा करावे लागते असे नाही.'' ते पुढे सांगतात, ''वैज्ञानिक दृष्टिकोनातून ही प्रगती साध्य करता येते. आम्ही आमच्या देशातील राजांची राज्ये लोकराज्यात विलीन करण्याची क्रांती केली. इतर देशातही राजांची राज्ये नष्ट करणार्या क्रांत्या झाल्या, पण मानवी जीवनाला बदलण्याची क्रांती यापुढे करावयाची आहे. हिंदुस्थानमधील आर्थिक व सामाजिक गरिबी नाहीशी झाल्याशिवाय या देशातील लोकशाहीला अर्थ राहणार नाही. आज महागाई आहे, गरिबी आहे, इतरही अनेक प्रश्न आहेत., परंतु त्याचबरोबर देशाचाही प्रश्न आहे आणि या प्रश्नांच्या संदर्भातच इतर प्रश्न सोडवावयाचे आहेत.''