• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

विविधांगी व्यक्तिमत्व-६७

यशवंतरावांचे निसर्गप्रेम

निसर्ग म्हणजे पंचमहाभूतांचा नयनरम्य, अखंड नि अवर्णनीय हास्यविलास! त्याचा अपरंपार पसारा. नादरूप रसगंधस्पर्शादीचा अजस्त्र विस्तार, इंद्रियाच्या मिटलेल्या पोकळीत त्याचा बिंदू मात्र गवसला तरी धन्य धन्य!

यशवंतरावांसारख्या अभिजात रसिक मनाला निसर्गाचे खूप आकर्षण! राजकारणाच्या राजरस्त्यावरून प्रवास करताना झाडाझुडपात लपाछपी खेळणार्‍या नागमोडी पाऊलवाटावर यशवंतराव रेंगाळत असत. निसर्गाच्या सान्निध्यात स्वत:ला झोकून देत असत. जहाजावरून प्रवास करणारा समुद्रपक्षी जसा आभाळात इकडेतिकडे रमला, तरीही तो पुन्हा पुन्हा जहाजावरच उतरतो, तसे यशवंतरावांचे मन निसर्गाच्या निळया-सावळया निमंत्रणासाठी सतत अधीर असे.

'निसर्गा' विषयी यशवंतरावांना असलेल्या ओढीचे रसाळ वर्णन त्यांच्याच शब्दात पुढे देत आहे. आपल्या स्वत:च्या गावाच्या घडणीचे चित्र रेखाटताना यशवंतराव म्हणतात, ''सागरोबाचे शिवार हे देवदेवेंद्राला पडलेले एक स्वप्न आहे, असे मला नेहमी वाटते. स्वत:ला एखादे घरकुल असावे म्हणून जणू शोधाशोध करीत आलेली देवमंडळी या शिवारात पोहोचताच कायमची स्थिरावली असावीत आणि या शिवाराचे मग त्यांनी 'देवराष्ट्र' बनवून टाकले.''

यशवंतरावांचे जीवन विकसित होत गेले तसा देशविदेशात सफरी करण्याचाही योग आला. त्या सफरीत त्यांनी निसर्गाचा आस्वाद घेतला आणि त्याच वेळी त्यांचे कविमनही उचंबळून आले. अशा एका उत्स्फूर्त भावनोद्रेकात ते म्हणतात, ''माझ्या वाटयाला आलेल्या आठवणींच्या गुच्छातील फुले सर्व प्रकारची आहेत. त्यात मनाला कर्तव्यपूर्तीचे समाधान देणारी जशी फुले आहेत तशीच चांगल्या माणसाच्या सहवासाचा सुगंध देणारीही असंख्य आहेत....एकंदरीत नियतीने दिलेल्या माझ्या आठवणींचा गुच्छ समृद्ध आहे, आकर्षक आहे, कधी न सुकणारा आहे, हे माझ्या आयुष्यातील एक फार मोलाचे धन आहे.''

कृष्णेच्या काठची आठवण झाली, म्हणजे बालपणी आणि तरुणपणातील जीवनाची जडणघडण करणार्‍या काळाची आठवण येऊन मन आजही कसे हेलावून जाते. ते म्हणतात, ''लहानपणी मी संगमावर बसत असे. कोठून तरी येणारे आणि कोठेतरी जाणारे ते 'जीवन' मी रोज पाहात असे. कोणासाठी तरी ते धावत होते. त्यात खंड नव्हता. त्या 'जीवनाला' एक लय होती पण ते लयाला गेलेले मी कधीच पाहिले नाही. ते जीवन नित्य नवे होते. त्याचा जिव्हाळा कधी आटला नाही.''

''जीवन पराकोटीचे समर्पित असेल तर ते कधीच जीर्ण होत नाही. चंद्र कधी जुना होत नाही, सूर्याला म्हातारपण येत नाही, दर्या कधी संकोचत नाही. यातील प्रत्येकाच्या जीवनात पराकोटीचे समर्पण आहे., पण अनंत युगे लोटली तरी विनाश त्यांच्याजवळ पोहोचलेला नाही. काळाने त्यांना घेरलेले नाही. त्यांचा कधी कायापालट नाही. स्थित्यंतर नाही, ते नि:श्वसन अखंड आहे.'' वेरूळ येथील कैलास लेणी ज्यावेळी मी प्रथम पाहिली त्यावेळच्या माझ्या भावना मला आजही आठवतात. ते म्हणतात ''ती कैलास लेणी पाहून माझे मन भारावून गेले. आजूबाजूचे जे लोक मला त्यांच्यासंबंधी माहिती देत होते त्यांचे अस्तित्व देखील मी क्षणभर विसरून गेलो. माझे मी पण मी विसरलो आणि किंचितकाल एक स्वर्गीय अशा आनंदात रममाण झालो. मला वाटते, आजकालच्या धकाधकीच्या जीवनात व्यक्तीच्या आयुष्यात असा क्षण येणे हाच त्याला लाभणारा विरंगुळा होय. असा विरंगुळा प्रत्येकाच्या जीवनामध्ये जितका जास्त येईल तितके त्याचे जीवन अधिक सुखी बनेल. श्रेष्ठ कलाकृतींमध्ये जीवन फुलविण्याची अशी अमर्याद शक्ती असते.

संगम जिथे कुठे झालेला असेल ते ठिकाण माझ्या आवडीचे असते. यशवंतराव म्हणतात, ''मला ते रम्य वाटते, स्फूर्ती देणारे, जीवनाचा एक वेगळाच अर्थ सांगणारे असे भासू लागते. नद्यांचा संगम झालेले स्थान हिंदुस्थानात पवित्र मानले जाते. पण ते धार्मिक अर्थाने. मला ते भौतिक दृष्टीने पवित्र वाटते. ते मनाला काही वेगळेच सांगत असते. दोन नद्या एकात एक मिसळतात तेव्हा दोन शक्तींचे मीलन झाल्याचे ते दर्शन असते. दोघी एक होऊन, एकरूप, एकजीव होऊन पुढे जातात. आणि हजारोंचे जीवन संपन्न करीत असतात.'' ''माणसामाणसांचे जसे मीलन होईल, विचारांचा संगम होईल आणि माणसे एकजीव बनून कर्तृत्व करतील तर सारेच सुखाने नांदतील, त्यांचे जीवन संपन्न बनेल. राग, द्वेष, स्पर्धा, शत्रुत्व त्या संगमात मिसळून विरघळून जातील आणि विशुद्ध जीवनाचा स्त्रोतच पुढे जात राहील, असे निसर्गाने निर्माण केलेल्या संगमाच्या ठिकाणी उभे राहिले की माझे मन सांगू लागते.'' पुढे ऐतिहासिक वास्तूबद्दल ते म्हणतात, ''ऐतिहासिक वास्तू पाहताना तिच्या ललाटावरील लेख वाचण्याचा मी प्रयत्‍न करतो. मानवमात्रांच्या ललाटाप्रमाणेच अशा वास्तूंच्या ललाटावरही सटवाई काही तरी लिहून जात असली पाहिजे. तेथील माणसांच्या ललाटाप्रमाणे इतिहास घडतो, की वास्तूंच्या ललाटाचा लेख माणसाला घडवितो हे मला माहिती नाही.