• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व-मंत्रालयातील वर्षे-ch १७-२

पहिली संरक्षण योजना

भारत-चीन घटनेनंतर यशवंतरावजींना त्या वेळची आव्हानास्पद परिस्थिती हाताळण्यासाठी संरक्षणमंत्री म्हणून केंद्र सरकारने पाचारण केले.  त्यांनी तात्काळ संपूर्ण प्रशासनयंत्रणेत आमूलाग्र बदल केला.  अन्य काही व्यक्तींसमवेत मलाही त्यांनी महाराष्ट्रातून नेले.  त्या वेळी संरक्षण फळीतील जवानांचे धैर्य खचलेले होते.. तसेच साधनसामग्रीही जुनी झालेली होती.  संपूर्ण लष्कर, नौदल आणि हवाईदलाच्या साधनसामग्रीचे, त्यांच्या धोरणांचे, योजनांचे पुनर्निर्देशन करणे म्हणजे यशवंतरावजींच्या पुढे मोठा बाका प्रसंग उभा होता.  मला सहसचिव नेमले.  माझ्यावर धोरण व योजनेची जबाबदारी सोपविली.  देशाची पहिली संरक्षण योजना आम्ही आखली आणि यशवंतरावजींनी ती पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाकडून संमत करून घेतली.  या धोरणाच्या कार्यान्वयामुळेच १९७१ मधील स्थिती नुसती सावरलीच नाही तर भारताला निःसंशय विजय मिळाला.

मध्यवर्ती भूमिका

दूरदृष्टीने धोरणे आखण्यात आणि प्रशासकीय निर्णय घेण्याबाबत यशवंतरावजींनी मोठी महत्त्वाची कामगिरी बजावली.  समस्यांची उकल स्वतः सोडवून त्यवर त्वरित व स्वच्छ निर्णय घेण्यात त्यांच हातखंडा होता.  ते आपल्या अधिकार्‍यांशी मित्रत्वाच्या नात्याने वागत आणि आम्हीही त्यांच्याशी कोणत्याही विषयावर मोकळेपणाने चर्चा करीत असू.  एखादा मुद्दा त्यांना पटला नसला तर आपली नापसंतीही ते अशा खुबीने व्यक्त करीत की, आम्हालाही ते मानावेच लागे.  त्यामुळे सर्व अधिकारी त्यांच्याशी निष्ठेने, आदराने आणि प्रेमाने वागत.  त्यांच्या आकस्मित निधनाने राजकीय क्षितिजावर एक कायमची पोकळी निर्माण झाली आहे आणि त्याची तीव्रता महाराष्ट्राला प्रकर्षाने जाणवणार आहे.

डी.डी. साठे
(लोकराज्य, मार्च ८५)

प्रशासकांना बहुमोल मार्गदर्शन

कायदा व सुव्यवस्था राखण्यासंबंधी यशवंतरावांचे विचार निर्भय व खंबीर होते.  लोकहिताची, भाषणस्वातंत्र्याची चाड त्यांना असूनसुद्धा पोलिसांना त्यांचे अवघड व लोकांना अप्रिय पण पररिहार्य असे कार्य करताना संरक्षण मिळावे म्हणून त्यांनी पुष्कळ वेळा आपल्या राजकीय पक्षाला न पटणारेसुद्धा निर्णय घेतले व निर्भय धोरण पत्करले.  राज्याच्या व लोकसभेच्या लोकप्रतिनिधींपुढे विधानगृहात अगर लोकसभेत बोलताना त्यांनी पोलिसांची बाजू तितक्याच धिटाईने व समर्पक रीतीने मांडली.  पोलिसांचे नीतिधैर्य खचू दिले नाही.  कधीही घाईघाईने अगर प्रखर टीकेच्या आहारी जाऊन फुकाची आश्वासने देऊन ते मोकळे झाले नाहीत.  आम्हाला त्यांचा केवळा आधार वाटायचा, परंतु वेळ पडल्यास उच्च पोलिस अगर मुलकी अधिकार्‍यास सुद्धा ते खाजगीरीत्या चांगलीच तंबी देत व त्यांचे कुठे चुकते आहे ते दाखवून देत.  पण त्यांनी कोठली गोष्ट आकसाने केल्याचे आठवत नाही.  पोलिसांच्या प्रशिक्षणात त्यांनी मन घातले व अनेक उत्तम उत्तम सूचना केल्या.  ते भारत सरकारचे गृहमंत्री असताना मी केंद्रीय गुप्‍तहेर विभागात सी.आय.बी.मध्ये होतो.  गृहखात्यातील उच्च अधिकार्‍यास ते नियमाने सकाळी भेटत व त्यांचे म्हणणे ऐकून घेत, फार उद्‍बोधक असे प्रश्न विचारीत व सल्ला देत.

यशवंतरावांना वाचनाचा आणि सखोल अभ्यासाचा नाद होता.  कठीण दुर्मिळ पुस्तके ते प्रवासातसुद्धा भराभर वाचत आणि आत्मसात करीत.  समाजवादाचा त्यांच्या तरुण मनावर बराच पगडा होता हे तर सर्वश्रुत आहे.  पण ते तेवढेच उदारमतवादी होते.  त्यांच्या सुसंस्कृत मनाला धर्मवेडाच अगर जातीयवादाचा व त्यातून जन्मास येणार्‍या हेव्यादाव्यांचा कधीच स्पर्श झाला नाही.  ते पूर्णतया देशाभिमानी होते.  म्हणूनच संकुचित ब्राह्मणब्राह्मणेतर वादात त्यांची भूमिका स्पष्ट निर्भीड व उदारमतवादाची होती.  सत्यशोधक चळवळीबद्दलचे त्यांचे विचार प्रसिद्धच आहेत.  लोकमान्य टिळक, आगरकर, गोखले, केळकर ह्या पुढार्‍यांबद्दल त्यांना नितांत आदर होता.  श्री. लक्ष्मणशास्त्री जोशी, गोगटे ह्यासारखे अनेक विद्वान त्यांच्या खाजगी जीवनात मित्र व चाहते होते.  त्यांच्यासारखा निर्भय दूरदृष्टीचा व समंजस नेता त्या वेळी जर महाराष्ट्रात नसता, तर महाराष्ट्रातले जीवन जातीयवादाने दूषित झाले असते. जातिद्वेषाच्या रोगाची भयंकर कीड लागून महाराष्ट्राचा 'मद्रास' झाला असता.  ते समंजस तर होतेच, पण खास करून संभाषणचतुर व उत्तम वक्ते होते, म्हणूनच त्यांची ती सौजन्यमूर्ती माणसे जोडत असे, तोडत नसे. त्यांच्या आमदर्शनात दलित-सवर्णवादाला थारा मिळाला नाही.  आज जी खेडोपाडी व शहरांत ह्याबाबत शोचनीय कटुता आहे तेवढी तेव्हा नव्हती.  ''माणसे हेरून त्यांना आपलीशी करून ठेवण्याची यशवंतरावांची हातोटी होती'' असे प्रसिद्ध पत्रकार श्री. व्यं. वि. पर्वते आपल्या स्वानुभवावरून लिहितात.  त्यांनी यशवंतरावांची तुलना दुसर्‍या एका महान व्यक्तीबरोबर केली आहे.  कै. न. चिं. केळकर आणि यशवंतराव चव्हाण ह्या दोघांमधील साम्य दाखवताना ते म्हणतात, ''माझ्या मनासमोर तात्यासाहेब केळकरांची मूर्ती उभी राहते.  द्वेष न करता वागणे, होईल तितके आपल्या शक्तीप्रमाणे दुसर्‍याच्या उपयोगी पडणे हे गुण केळकर व चव्हाण यांच्यामध्ये मला सारखेच दिसून येतात.  काव्यशास्त्र, विनोद, साहित्यप्रेम हे गुण देखील दोघांमध्ये सारखेच दिसून येतात.''

कृ. पां. मेढेकर
(लोकराज्य, मार्च ८५)