• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व- यशवंतरावांचा राजकीय प्रवास-ch ९-१

मुख्यमंत्री या नात्याने यशवंतरावजी यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी भक्कम पाया उभारण्याचे काम केले.  महाराष्ट्रभर महत्त्वाच्या ठिकाणी औद्योगिक वसाहती निर्माण केल्या आणि कारखानदारीला चालना दिली.  सहकाराचा खास पुरस्कार केला.  सहकारी चळवळीला फायदा तळागाळातील गरीब शेतकर्‍याला मिळावा म्हणून सहकारी क्षेत्रात प्रक्रिया करणारे साखर कारखाने, स्पिनिंग मिल्स, ऑईल मिल्स यासारखे कित्येक उद्योग त्यांच्या कारकीर्दीत सुरू झाले.  सहकारी पतपेढ्या आणि विविध प्रकारच्या सहकारी संस्थांचे जाळे महाराष्ट्रभर निर्माण करण्यामागे यशवंतरावजींचीच प्रेरणा होती.  जिल्हा परिषदांमार्फत सत्तेचे विकेंद्रीकरण करण्याची सुरुवात महाराष्ट्रातच झाली.  हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम घोषणा होऊनही कित्येक राज्यांत अद्याप सुरू झालेला नाही.  सर्व जातिजमातींना जवळ घेण्याचे आणि नवबौद्धांना शासकीय सवलती देण्याचे पुरोगामी धोरण यशवंतरावजींच्या कारकीर्दीत साकार झाले.  संयुक्त महाराष्ट्र झाला तरी भावनात्मकदृष्ट्या विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण व मुंबई हे प्रदेश त्या अर्थाने अलग होते.  त्या सर्वांमध्ये भावनात्मक ऐक्य साधण्याचे उठावदार कार्य यशवंतरावजींच्या नेतृत्वाखाली झाले.  त्याची नोंद महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरानेच करावी लागेल.

१९६२ च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील शासन संघटनेचे यशवंतरावजी एकमुखी नेते होते.  निवडणुकीच्या काळात जाहिरनाम्यामार्फत आणि भाषणाभाषणांतून जनतेला दिलेली वचने पूर्ण करण्याचे काम मुख्यमंत्री झाल्याबरोबर यशवंतरावजींनी व काँग्रेस पक्षाने जोमाने हाती घेतले.  मोठ्या वेगाने ती कार्यवाही सुरू झाली.  त्याच काळात चीनचे भारतावर आक्रमण झाले आणि पराभवाची नामुष्की भारताला पत्करावी लागली.  पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्यावर त्यांच्या कारकीर्दीत झालेला तो असह्य आघात होता.  त्या वेळचे संरक्षणमंत्री श्री. कृष्ण मेनन हेसुद्धा त्या अपयशाला तितकेच जबाबदार होते.  श्री. कृष्ण मेनन यांच्या राजीनाम्याची मागणी खुद्द काँग्रेस पक्षात सुरू झाली. महावीर त्यागी, रामसुभग सिंग आदी नेत्यांच्या ''इंद्राय स्वाहा तक्षकाय स्वाहा'' या खंबीर भूमिकेपुढे मान झुकवणे पंडितजींना क्रमप्राप्‍त झाले आणि श्री. कृष्ण मेनन यांना संरक्षणमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.  त्या वेळी सैन्यामध्ये निर्माण झालेले वैफल्य घालवून त्यांच्यात नवा आत्मविश्वास निर्माण करील अशा खंबीर व कार्यक्षम नेत्याची गरज होती.  पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू आणि सर्व देशाच्या नजरेसमोर अग्रक्रमाने कोणते नाव आले असेल तर ते यशवंतरावजींचे होते.  त्यांनी केलेल्या कुशल कार्याचा आणि संघटनाचातुर्याचा तो खास गौरव होता.

यशवंतरावजींची संरक्षणमंत्री म्हणून नियुक्ती होताच सर्व सैन्यामध्ये विश्वासाचे वारे संचारू लागले.  सेनादल, वायुदल व नौदलाच्या प्रमुख सेनानींना यशवंतरावजींनी विश्वासात घेतले.  त्यांच्या कारभारात कोणत्याही प्रकारे ढवळाढवळ होणार नाही असा दिलासा दिला.  भारतीय संरक्षणाच्या आधुनिकीकरणास प्राधान्य देऊन संरक्षण व्यवस्थेची त्यांनी पुनर्रचना केली.  त्या काळात यशवंतरावजींच्या नेतृत्वाखाली आपल्या संरक्षण विभागाने जी चतुरस्त्र प्रगती केली त्यामुळेच १९६५ साली पाकिस्तानने केलेल्या आक्रमणाला चोख उत्तर देणे शक्य झाले.  त्या युद्धात आपल्या सैन्याने पाकिस्तानवर बिनतोड मात केली.  लाहोर अथवा रावळपिंडी येथील विमानतळावर विमाने उतरवण्यासाठी अथवा त्या तळावरून विमानांचे उड्डाण करण्यासाठी भारताची पूर्वपरवानगी घेण्याचा अवमानकारक प्रसंग पाकिस्तानवर आला.  संरक्षणमंत्री या नात्याने यशवंतरावजींची कारकीर्द मध्यवर्ती शासनातील त्यांच्या अन्य कोणत्याही मंत्रिपदापेक्षा सर्वश्रेष्ठ ठरली असे मला वाटते.  हिमालयाच्या सरंक्षणासाठी सह्याद्री धावून गेला हे विधान किती बरोबर होते ते यशवंतरावजींनी आपल्या कर्तृत्वाने सिद्ध केले.

यशवंतरावजी संरक्षणमंत्री असताना महाराष्ट्र प्रदेशच्या संसदीय मंडळाची बैठक सुरू होती.  पाकिस्तानने आक्रमण केले तेव्हा ती बैठक त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी सुरू होती.  पाकिस्तानचे हल्ल्याचे वृत्त समजताच ताबडतोब दिल्लीला जाणे आवश्यक होते.  त्या वेळी मी सुद्धा त्यांच्या बरोबर होतो.  खास लष्करी विमानाने आमचा प्रवास सुरू झाला.  सर्व शहरांमध्ये व विमानतळावर ब्लॅकआऊट होता.  विमानतळावर कोठेही उजेड दाखवण्याची परिस्थिती नव्हती.  एक क्षणभरही न थांबण्याचा आणि दिल्लीला रातोरात परतण्याचा निर्णय यशवंतरावजींनी घेतल्यामुळे त्यांची सर्व व्यवस्था करणे अपरिहार्य झाले.  प्रवासात धोक्याचा इशारा मिळाल्यामुळे आमचे विमान आग्रा विमानतळाकडे वळवावे लागले.  आग्र्याला आम्ही उतरलो.  तेथूनच मोटारीने दिल्लीला जाण्याचे आम्ही ठरवले.  तितक्यात लष्करी अधिकार्‍यांकडून क्लिअरन्स मिळाल्यामुळे त्याच विमानाने रातोरात आम्ही दिल्लीला पोहोचलो.  त्या प्रवासात यशवंतरावांची प्रक्षुब्ध मनःस्थिती व निर्धाराचे दर्शन मी जवळून घेऊ शकलो.  यशवंतरावजींचा निर्धार पुढील काळात मी केव्हाही पाहू शकलो नाही.